Menu Close

नक्षलवाद्यांचा बीमोड !

नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी प्रयत्नशील महाराष्ट्राकडून अन्य राज्यांनी दिशा घ्यावी !

गडचिरोलीमध्ये १३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी नक्षलवादी आणि पोलीस यांमध्ये झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी चळवळीतील हे मोठे यश आहे. यात महत्त्वाचा भाग म्हणजे पोलिसांना हवा असलेला एक मोठा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे हा या चकमकीत ठार झाला आहे. मिलिंद तेलतुंबडे याच्यावर ५० लाख रुपयांचे पारितोषिक होते. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार म्हणून त्याची पोलिसांत नोंद आहे. त्याच्यावर हत्या, देशद्रोह असे विविध गुन्हे नोंद असून नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य होता. त्याचा भाऊ प्राध्यापक आनंद तेलतुंबडे सध्या कारागृहात आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सी-६०’ या कमांडो पथकाने ही कामगिरी बजावली आहे. घनदाट जंगलात झालेल्या या चकमकीत काही पोलीसही घायाळ झाले आहेत.

नक्षलवाद हा देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत नक्षलवादाचा बीमोड करण्याविषयी बैठक घेतली. या बैठकीत अमित शहा यांनी सर्व राज्यांना वर्षभरात नक्षलवाद संपुष्टात आणण्याविषयी कृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागांत कार्यरत ‘सी-६०’ या कमांडो पथकाच्या कामगिरीचा आलेख नेहमी चढता राहिला आहे. छत्तीसगडसारख्या नक्षलवाद्यांचे अधिक प्राबल्य असलेल्या भागात नक्षलवादी वरचढ होऊन पोलीस आणि सैनिक यांच्या अधिक संख्येत हत्या करतात, तेच महाराष्ट्रात मात्र पोलीस आणि कमांडो पथक वरचढ ठरून अधिक संख्येत नक्षलवादी मारले जातात. नक्षलवादी त्यांच्यावर केलेल्या प्रत्येक कारवाईचा प्रतिशोध कधी ना कधी तरी घेऊन आणखी हिंसा करतात. महाराष्ट्रात प्रारंभी दोन्ही बाजूकडील म्हणजे नक्षलवादी ठार व्हायचे, तर कधी पोलीस हुतात्मा व्हायचे. राज्यातील सुरक्षादले आता अधिक सतर्क झाली आहेत. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षादले यांच्या समन्वयाने नक्षलवाद्यांच्या आगामी आक्रमणाची चाहूल लागते अथवा त्यांच्या ठावठिकाणाची माहिती मिळते. परिणामी वेगवान हालचाली करून नक्षल्यांना कंठस्थान घालणे शक्य होत आहे.

नक्षलवाद्यांना सर्वसामान्यांमध्ये राहून बळ पुरवणारे म्हणजे शहरी नक्षलवादी यांना पोलिसांनी अटक केली आहे. परिणामी ती कुमक नक्षलवाद्यांना मिळणे बंद झाले आहे. नक्षलवादी प्रशिक्षित असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य पोलीस नव्हे, तर कमांडोच नियंत्रणात आणू शकतात, हे महाराष्ट्रात पहायला मिळते. महाराष्ट्राकडून दिशा घेऊन अन्य राज्यांनी प्रयत्न केल्यास नक्षलवादाचे भारतभरातून उच्चाटन करणे सहज शक्य होईल, हे खरे !

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *