Menu Close

हिंदूंच्या ब्राह्मतेजाचे पुनरुज्जीवक !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्राच्या निमित्ताने निद्रिस्त हिंदु समाजातील क्षात्रवृत्ती पुनरुज्जीवित करण्याचे अत्युच्च कार्य करणारे ऋषितुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘एकमेवाद्वितीय’ आहेत. १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी बाबासाहेबांचा ‘केवळ पृथ्वीलोकातील प्रवास संपला’, असेच म्हणावे लागेल; कारण ‘देवाने १२५ वर्षांचे आयुष्य दिले, तर मी शिवचरित्र ब्रह्मांडाच्या पलीकडे नेईन’, असा दुर्दम्य आशावाद स्वतः बाबासाहेबांनीच व्यक्त केला होता.

साम्यवादाच्या वावटळीत हिंदुत्वाची ज्वाला पेटवणारे शिवशाहीर !

वर्ष १९४७. तो काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांना ‘वाट चुकलेले देशभक्त’ म्हणणारे आणि ‘हिंदु म्हणून जन्माला आलो’, याचा पश्चात्ताप करणारे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा ! भारतीय स्वातंत्र्यानंतर साम्यवादाचा पगडा असलेले शासनकर्ते हिंदुत्वाला मूठमाती द्यायला निघाले होते. साहित्य, कला, क्रीडा, राजकारण इत्यादी सर्वच क्षेत्रांत साम्यवादाचे वर्चस्व वाढत होते. हिंदु समाजाला ‘अहिंसेचे बाळकडू’ पाजून त्याला क्षात्रहीन बनवण्याचे षड्यंत्र पूर्णत्वास येऊ लागले होते. खोटा आणि धर्मांधांचे लांगूलचालन करणारा इतिहास बिंबवला जात होता; मात्र कंसाच्या पापाचा घडा वाढत असतांना जसे श्रीकृष्ण गोकुळात वाढत होता, तसे ऐन पंचविशीतील बळवंताला मात्र शिवचरित्राने झपाटले होते. ‘इतिहास संशोधक प्रा. ग.ह. खरे यांचा हा उमदा शिष्य पुढे जगाला शिवचरित्राचे वेड लावेल’, हे आई जगदंबेनेच ठरवले होते. छत्रपतींचे चरित्र लिहिणारे इतिहासकार तेव्हाही होते; मात्र समाजात ते रूजवण्यासाठी अपार कष्ट घेणारे बाबासाहेब अवलियाच म्हणावे लागतील.

अद्भुत सत्यान्वेषी शिवचरित्रकार !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपति ग्रंथ

सरदार घराण्यात जन्मलेले शिवशाहीर मूलतःच राष्ट्र आणि धर्म प्रेमी होते. त्यांनी इतिहासाच्या संशोधनासाठी प्रसंगी कोथिंबिरीच्या जुड्या विकून पैसा जमवला. ऐतिहासिक कागदपत्रांच्या व्यासंगातून त्यांनी घटनांचे तपशील शोधलेच; शिवाय जेथे जेथे त्या घटना घडल्या, तेथे तेथे साधारण तशाच हवामानात जाऊन त्यांचा पडताळाही घेतला. १२ जुलै १६६० या दिवशी छत्रपती पन्हाळगडावरून निसटले. पाऊस धो-धो पडत होता. किर्र अंधार होता. बाबासाहेब अनुमाने तीनशे वर्षांनंतर बहुधा तशाच हवामानात, त्याच तिथीला पन्हाळ्यातून निघाले होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात, व्याख्यानांत वा नाट्यरचनेत अतिशयोक्ती मुळीच नव्हती. अद्भुतता होती. इतिहास- संशोधकाचा आव न आणता त्यांनी सत्यान्वेषी संशोधन केले. अनेक मैल पायपीट केली. दुचाकीवर (कधी सायकलवर) हिंडले. कधी रोमांचकारी, तर कधी संकटग्रस्त घटनास्थळे प्रत्यक्ष त्या स्थळी जाऊन अनुभवली. त्यामुळेच शिवचरित्रावरील व्याख्याने ते जिवंत करू शकले. लाल महालात शिरणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आपणही असल्याचा भास बाबासाहेबांच्या शिवचरित्रातून होत असे. शाहिस्तेखानाची बोटे राजांच्या तलवारीने तुटून पडतांना आपसूकच आपणही ‘एक, दोन, तीन’ अशी ती मोजू लागतो, हे बाबासाहेबांनी केलेल्या इतिहासाच्या भक्तीरूपी साधनेचे यश होते.

हिंदु समाजातील वीरत्वाचे संजीवक !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

बाबासाहेबांनी शिवचरित्र जागवण्यासाठी शिवकाळातील चित्रे रेखाटून घेणे, नाटके लिहिणे, ‘जाणता राजा’सारखे महानाट्य उभे करणे, प्रसंगी अभिनय करणे, शिवसृष्टी उभी करणे इत्यादी पैलूंना यशस्वी गवसणी घातली. ‘मी भले आणि माझे भले’, असे म्हणणार्‍या मध्यमवर्गीय हिंदु समाजाला त्यांनी इतिहास समजावतांना इतिहासाचे सध्याच्या स्थितीला अनुसरून असलेले संदर्भही दिले. त्यांनी हिंदु समाजाचे पूर्वदिव्य उलगडून दाखवतांना भावी काळ आश्वासक व्हावा; म्हणून ऊर्मी निर्माण केली. हिंदु समाज जागृत झाला. ‘खरे’ धगधगते शिवचरित्र लोकांपर्यंत पोचले. हिंदुत्वाचा स्वाभिमान असलेल्या आणि धर्मांधतेला प्रतिकार करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ समाजाच्या निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे. आत्महत्या करायला निघालेल्या निराशाग्रस्त व्यक्तीने ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ वाचला आणि आत्महत्येचा विचार सोडून नव्याने जीवन चालू केले’, अशा घटना आजही अनेकदा ऐकायला मिळतात, इतके त्यांचे विचार प्रभावी आहेत. त्यामुळे शिवचरित्राप्रमाणेच बाबासाहेबांचे नाव अजरामर होणारच आहे. त्यासोबतच बाबासाहेबांनी शिवचरित्राच्या माध्यमातून घेतलेला ‘समाजजागृतीचा ध्यास’ हीच त्यांची समष्टी साधना ठरून त्यांच्या आत्म्याला पुढची गती प्राप्त करून देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

शासनकर्त्यांचे ऐतिहासिक दुर्लक्ष !

बाबासाहेबांनी समाजाला काय दिले ?, याचा अभ्यास करतांना समाजधुरिणांनी बाबासाहेबांच्या संदर्भात काय केले ?, याचाही विचार होणे आवश्यक आहे.  ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मविभूषण’ हे पुरस्कार द्यायला बाबासाहेबांची नव्वदी उलटावी लागणे’, हे भारतीय शासनकर्त्यांचे ऐतिहासिक दुर्लक्ष म्हणावे लागेल. बाबासाहेब तत्पूर्वीच या सर्व पदव्यांच्या पलीकडे गेले होते, हा भाग निराळा !

बाबासाहेबांचा अनेकदा सत्कार करणार्‍या शासनकर्र्त्यांंनीच ‘जात्यंध राजकारण’ करून बाबासाहेबांच्या तपश्चर्येला कवडीमोल ठरवण्याचे घाणेरडे राजकारण केले.  नव्वदी पार केलेल्या बाबासाहेबांना पुरस्कार घोषित केल्यानंतर त्यांना ‘अरे-तुरे’च्या भाषेत धमक्या दिल्या गेल्या. फुटकळ इतिहासकारांकडून पुरावे मागितले गेले. हे तत्कालीन शासनकर्त्यांना रोखता आले नसते ? अशा वेळी निष्क्रीय रहाणारे समाजधुरीण आणि तो संपूर्ण समाजच विनाशाच्या मार्गावर आहे, असे समजले जाते. बाबासाहेबांना धमक्या येत असतांना त्यांच्या पाठीशी रहाणार्‍यांची संख्या अत्यंत अल्प असणे, हे लज्जास्पद आहे.

इतिहास-संशोधनासह लोकसंग्रह आणि साधना आवश्यक !

बाबासाहेबांच्या जीवनातून खर्‍या इतिहास-संशोधकांनीही धडा घेतला पाहिजे. खर्‍या इतिहास-संशोधकांना आता केवळ संशोधन करून भागणार नाही, तर सत्याची बाजू लावून धरतांना तुम्हाला लोकसंग्रह करणेही आवश्यक आहे. बाबासाहेबांनी शिवचरित्र पोचवतांना त्यांच्याकडून मोठी समष्टी साधना घडली; म्हणून आई जगदंबेने त्यांचे नित्य रक्षण केले, हेही इतिहास-संशोधकांनी लक्षात घ्यावे. ईश्वराने आपले नित्य रक्षण करावे, यासाठी केवळ इतिहास-संशोधकांनीच नव्हे, तर प्रत्येक हिंदूने साधना करून खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक बनावे, ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *