Menu Close

श्री विठ्ठलाला अर्पण केलेले दागिने वितळवण्याऐवजी ते जतन करा आणि दागिन्यांच्या घोटाळ्यांचा अहवाल प्रसिद्ध करा !

हिंदु जनजागृती समितीकडून सोलापूरच्या उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार (आसंदीत बसलेल्या) यांना निवेदन देतांना श्री. राजन बुणगे आणि श्री. विनोद रसाळ

सोलापूर – राज्य सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाला भाविकांनी अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्यासाठी मंदिर समितीस अनुमती दिली आहे. वर्ष १९८५ पासून ते आतापर्यंतचे दागिने वितळवण्यात येणार आहेत. यामध्ये २८ किलो सोन्याचे, तर ९९६ किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. शासनाच्या आदेशानुसार या दागिन्यांतून शुद्ध सोने आणि चांदी यांच्या विटा बनवण्यात येऊन त्या मंदिर समितीकडे सुपुर्द केल्या जाणार आहेत. ‘वास्तविक भक्तांनी श्रद्धेने दिलेले दागिने वितळवण्याचा अधिकार मंदिर समितीला कुणी दिला ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे हे पुरातन काळातील आणि मौलीक दागिने शिवकालीन, होळकरकालीन, पेशवेकालीन किंवा शिंदे सरकार यांनी दिलेले असून ते जतन करण्यात यावेत, तसेच आतापर्यंत या दागिन्यांसंदर्भात लक्षात आलेल्या घोटळ्याचा अहवाल प्रसिद्ध करावा, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन १५ नोव्हेंबर या दिवशी सोलापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन बुणगे, विक्रम घोडके, दत्तात्रय पिसे, विनोद रसाळ आदी उपस्थित होते.

समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. नित्यपूजेतील दही आणि दूध यांसाठी वापरण्यात येणार्‍या मोठ्या पराती, महानैवेद्याचे भांडी आदींशी भाविकांच्या धार्मिक भावना निगडीत असल्याने ते जतनच होणे आवश्यक आहे. अशा पुरातन वस्तू आता दुर्मिळ असून त्या वितळवण्याऐवजी त्यांचे एक चांगले प्रदर्शन भरवून येणार्‍या भावी पिढीला महाराष्ट्र राज्यातील वारकरी परंपरेचा इतिहास दाखवता येऊ शकतो. इंग्लंड आणि अमेरिकेत मोठ्या व्यक्तींच्या पेनसारख्या लहानसहान वस्तूंचेही संरक्षण करून ते ठेवा म्हणून जपले जाते, मग आपली मंदिर समिती पुरातन दागिने का जतन करू शकत नाही ?

२. अशाच प्रकारचा निर्णय तामिळनाडू सरकारनेही घेतला होता आणि मंदिरातील २ सहस्र १३८ किलो सोने वितळवण्याची प्रक्रिया चालू केली होती. यास न्यायालयात आव्हान दिल्यावर मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांचे सोने वितळवण्यास प्रतिबंध केला होता. सोने वितळवण्याच्या प्रक्रियेत कोणताही अपहार झाल्यास त्याचे दायित्व कुणाचे ? त्यामुळे श्री विठ्ठलाला अर्पण केलेले दागिने वितळवण्याऐवजी ते जतन करावेत.

दागिने वितळवल्यास अलंकारांतील काही गोष्टी गहाळ झाल्याच्या वर्ष २०१२ मधील प्रकरणाचे अन्वेषण करणे अशक्य !

वर्ष २०१२ मध्ये विधी विभागाने देवाच्या दागिन्यांची पहाणी केली असता त्यांतील काही अलंकारांतील काही गोष्टी गहाळ झाल्याचे आढळून आले होते; मात्र पुढे हा अहवालच दडपण्यात आला. हा अहवाल प्रसिद्ध करून सत्य जनतेसमोर आले पाहिजे. त्यामुळे वर्ष १९८५ ते वर्ष २०१२ या कालावधीत काही दागिने गहाळ झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता दागिने वितळवले गेल्यास वर्ष २०१२ च्या प्रकरणातील अहवालाचे अन्वेषण करणे शक्य होणार नाही, तसेच यात भ्रष्टाचार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *