- नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा !
- पाण्याचा अपुरा पुरवठा
- चोर्यांमुळे साधू-संत अप्रसन्न
उज्जैन : सिंहस्थपर्वासाठी मध्यप्रदेश शासानाने उज्जैन शहरापासून १९ किमीपर्यंत परिसरात विविध आखाडे, खालसे, संप्रदाय आदींना जागा उपलब्ध करून दिली आहे. यात सुमारे ५ सहस्रांहून अधिक मोठे मंडप उभारण्यात आले आहेत; मात्र ठिकठिकाणी बॅरीकेट्स (अथडळे) लावणे, सार्वजनिक वाहनाची सोय नसणे आणि कडक उन्हाळा यांमुळे सिंहस्थपर्वामध्ये येणार्यांची उपस्थिती अपेक्षेपेक्षा पुष्कळ अल्प आहे. पहिले अमृत (शाही) स्नान होऊन पाच दिवस झाल्यानंतरही सिंहस्थपर्वामध्ये लोकांची उपस्थिती खूपच अल्प आहे.
पुरेशी वाहनव्यवस्था नसल्यामुळे ५-६ कि.मी. अंतर चालून भाविकांना प्रवास करावा लागत आहे. पर्वणीच्या काळात तर पुष्कळ हाल होतात. पोलीस प्रशासनही विशेष पास नसेल, तर वाहनांना अटकाव करतात. त्यामुळे शहरातील वाहने कुंभक्षेत्री येत नाहीत. सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत प्रचंड उष्णतेचा त्रास होत असल्यामुळे लोक बाहेर पडत नाहीत. सायंकाळी ५.३० नंतर लोक फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत.
मंडप अन् विद्युत रोषणाई यांसाठी १० लाख ते १ कोटी रुपयांचा खर्च !
येथील शासनाने १९ कि.मी. परिसरात मोठ्या विविध आखाड्यांना जागा उपलब्ध करून दिलेली आहे. यात बहुतांश आखाड्यांनी १० लाख ते १ कोटी रुपये खर्च करून भव्य मंडप, मोठ्या कमानी, विद्युत् रोषणाई केलेली आहे. मुंबई-पुण्यातील गणेशोत्सवाप्रमाणे झगमगाट करण्यावर खर्च केलेला आहे; मात्र भाविकांची उपस्थिती खूपच अल्प आहे. आखाड्यांमध्ये ५०० लोकांचे जेवण सिद्ध केले जात आहे; पण उपस्थित १०० च्या आसपास असल्यामुळे ४०० लोकांचे अन्न टाकून द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी कथा-प्रवचने चालू आहेत; मात्र लोकांची उपस्थिती फारच अल्प आहे.
शासनाच्या वतीने विद्युत् पुरवठा करण्यात आलेला असला, तरी सकाळी आणि दिवसाही अनेक ठिकाणी आवश्यकता नसतांना दिवे, हॅलोजन चालू असल्याचे दिसत आहेत.
उपलब्ध करून दिलेली साधने विनावापर पडून कोट्यवधी रुपयांची हानी !
५ सहस्रांहून अधिक विविध संस्था, संप्रदाय, आखाडे आणि खालसे यांनी सिंहस्थपर्वाच्या ठिकाणी जागा अधिग्रहीत केली असली, तरी अनेक ठिकाणी अद्यापही मंडप बांधून पूर्ण झालेले नाहीत. अनेक ठिकाणी संस्था आणि संत यांनी मागणी केल्यानुसार त्यांना जागा दिलेली आहे. त्या जागेसह ५ शौचालये, ५ स्नानगृहे, पाण्याचा नळ, २ मोठ्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत; मात्र अनेकांनी त्या जागेचा वापर न केल्यामुळे जागा आणि साधन-सुविधा विनावापर पडून आहे. या माध्यमांतून शासानचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात आहे.
नरवर या जागेवर २ कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक आरोग्यकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे; मात्र त्याचे लोकार्पण न झाल्याने लोकांना उपयोग होत नाही.
पाणी पुरवठा आणि अन्य सोयी-सुविधा यांचा अपुरा पुरवठा !
ज्या ठिकाणी साधू, महंत, महामंडलेश्वर आणि आध्यात्मिक संस्था आलेल्या आहेत, त्या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा नाही. त्यामुळे अंघोळ आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यासाठी तक्रारी कराव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या सुविधा नाहीत. आखाड्यांसाठी केलेली बांधकामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे शौचालयाच्या नलिका (पाईप) फुटलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. केवळ प्रमुख १३ आखाड्यांकडे (१० शैव आखाडे आणि ३ वैष्णव आखाडे यांच्याकडे) शासनाचे विशेष लक्ष आहे. त्यांना कोणतीही चणचण भासू नये म्हणून पूर्ण अधिकारी वर्ग त्यांच्या दिमतीला असतो. अन्य ठिकाणी शौचालयाची दारे तुटलेली आहेत. शौचालयात पाणीपुरवठा नाही. सार्वजनिक शौचालय आणि स्नानगृह यांठिकाणी नळ बंद केलेले नसल्यामुळे तेथील पाणी वाहून जात असल्यामुळे नंतर पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी साधू-संत त्रस्त आहेत. शासन याकडे लक्ष देत नसल्याने २३ एप्रिल २०१६ या दिवशी बडनगररोड येथे साधू-संतांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आम्हाला तहान लागली आहे, पाण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. जवळजवळ २ घंटे साधू-संत रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते. विभागीय दंडाधिकारी यांनी दोन दिवसात समस्यांचे निराकारण करण्याचे आश्वासन दिल्यावर अांदोलन थांबवण्यात आले.
सिंहस्थपर्वातील २५ हून अधिक साधू-संत, तर १ सहस्र १०० हून अधिक भाविक रुग्णालयात प्रविष्ट !
सिंहस्थपर्वासाठी आलेल्या साधू-संतांपैकी २५ जण, तर १ सहस्त्र १०० भाविक रुग्णालयात प्रविष्ट झालेले आहेत. या रुग्ण साधूंची विचारपूस करण्यासाठी मध्यप्रदेश शासनाचे मंत्री भूपेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या ठिकाणी साधू-संतांना पुरेशी फळे देण्यात येत नसल्याची तक्रार आहे. मंत्री भूपेंद्र सिंह म्हणाले की, शासनाने पुरेशी आर्थिक तरतूद केलेली असतांना संतांना पुरेशी फळे मिळाली पाहिजेत. या संदर्भातील आदेश त्यांनी प्रशासनाला दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात