दक्षता म्हणून श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक आणि पदाधिकारी यांना अटक आणि सुटका
कोलार (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी चिकमगळुरू येथील दत्तापिठाकडे निघालेल्या दत्तमाला धारण करणार्यांच्या बसवर धर्मांधांकडून करण्यात आलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ कोलार येथे पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. येथील दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवत ते या ‘बंद’मध्ये सहभागी झाले. प्राणघातक आक्रमण करणार्या धर्मांधांना अटक करण्यासाठी कोलारचे जिल्हाधिकारी सेल्वीमणी आणि पोलीस अधीक्षक डी.के. किशोर बाबू यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीराम सेनेचे प्रधान कार्यदर्शी श्री. अरुण प्रकाश, विभागीय अध्यक्ष श्री. रमेश राज, कार्यकर्ता सुप्रित, हिंदु जागरण वेदिकेचे श्री. किशोर राममूर्ती, बजरंग दलाचे श्री. बाबू, श्री. बालाजी ॐ शक्तीचे श्री. चळपती इत्यादींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डी.के. किशोर बाबू यांच्या निरीक्षणाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी कोलारचे जिल्हाधिकारीही उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत मोर्चा काढला. श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक येथे येणार असल्याचे कळाल्यावर जिल्हाधिकार्यांनी त्यांना प्रवेशबंदी केली होती. तरीही मुतालिक यांनी कोलारमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच त्यांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली.
‘बंद’च्या निमित्ताने जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
१. कोलार शहरातील ‘क्लॉक टॉवर’ येथे मटक्याचा धंदा मोठ्या प्रमाणात चालत असून तो त्वरित रोखावा, तसेच गुन्हेगारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.
२. येथील इदगाह मैदानाजवळ हिंदु नागरिकांना ये-जा करणे त्रासाचे होत असल्याने तेथे पोलीस चौकी स्थापन करावी. इदगाह मैदान आणि रेल्वे येथील हॉटेल, टी स्टॉल, कँटीन आणि अवैध कृत्ये करणारी दुकाने रात्री २-३ वाजेपर्यंत उघडी असतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
३. शहरात निर्माण करण्यात आलेली गोमांसाची विक्री करणारी अनधिकृत दुकाने तत्परतेने हटवण्यात यावीत.
४. कोलार शहरात विनाअनुज्ञप्ती रिक्शा चालवण्यात येतात. अशी वाहने त्वरित शोधून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
५. कोलार शहरातील मशिदींवर ध्वनीक्षेपक लावण्यात आले असून त्यांना कोणतीही अनुमती नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते त्वरित काढून टाकावेत.
६. कोलार शहरातील टॉवर बस स्थानक येथे बससाठी आलेल्या महिलांशी असभ्य वर्तन करण्यात येते. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. (या सर्व मागण्या का कराव्या लागतात ? पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांना हे दिसत नाही कि ते आंधळे आणि बहिरे आहेत ? भाजपच्या राज्यात हिंदूंना असे निवेदन द्यावे लागू नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)