Menu Close

तीव्र विरोधानंतर गीतकार जावेद अख्तर यांना उद्घाटक म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  • पानिपतकार विश्वास पाटील करणार उद्घाटन

  • अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी साहित्य संमेलन आणि वाद किंवा विरोध हे समीकरण बनले असतांना हे चित्र पालटण्यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 

नाशिक – येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असून या वेळी गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी २० नोव्हेंबर या दिवशी घोषित केले. उद्घाटक म्हणून जावेद अख्तर यांचे नाव प्रथमपासून घेतले जात होते; मात्र विविध स्तरांतून त्यांच्या नावाला विरोध होऊ लागल्यावर अख्तर यांना आता प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. (मराठी भाषेसाठी योगदान देणार्‍यांनाच मराठी साहित्य संमेलनाला निमंत्रित करणे उचित आहे ! गेल्या अनेक वर्षांपासून तसे होत नसल्यामुळेच साहित्य संमेलनाची पत झपाट्याने घसरत आहे ! याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )

येथील ‘भुजबळ नॉलेज सिटी’च्या प्रांगणात ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाला मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित रहाणार आहेत, तर समारोपाच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित रहातील.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी पाठपुरावा चालूच आहे ! – डॉ. भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा चालूच आहे. आम्ही संसदेत आवर्जून मराठी बोलतो. स्वतःची सूत्रे स्वतःच्या भाषेत मांडताना आत्मविश्वासही येतो. त्यामुळेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी महाराष्ट्रातील खासदारांचे विशेष पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.

महानगरपालिकेकडून संमेलनासाठी २४ लाख रुपयांचा निधी !

साहित्य संमेलनासाठी आयोजकांनी महानगरपालिकेकडे ५० लाख रुपयांचा निधी मागितला होता; मात्र महानगरपालिकेच्या नियमानुसार तिला केवळ २ लाख रुपयांचा निधी देता येतो. अधिकचा निधी देण्यासाठी महापालिकेकडून राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंत्र्यांनी संमती दिली. त्यानुसार ‘आता महापालिकेकडून साहित्य संमेलनासाठी २४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे’, असे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले.

९३ वर्षांत प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बाल मेळाव्याचे आयोजन !

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ९३ वर्षांनंतर प्रथमच ‘बाल साहित्य मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. मेळावा समितीचे पदाधिकारी म्हणाले की, ४ डिसेंबर या दिवशी सकाळी १० ते ११ या वेळेत ‘बाल साहित्य मेळाव्या’चे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी. शेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आदी उपस्थित रहाणार आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *