Menu Close

‘सनातन धर्म प्रतिनिधी सभा, देहली’चे कार्यकारी अध्यक्ष श्री. भूषणलाल पराशर यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट !

श्री. भूषणलाल पराशर (मध्यभागी) यांना ‘सनातन पंचांग’ भेट देताना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देहली – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था अत्यंत मूलभूत अन् आवश्यक कार्य करत आहेत. तुमच्याकडे सर्व विषयांचे ग्रंथ आहेत. आज हिंदू त्यांचे सण, परंपरा, आचार-विचार यांविषयी अनभिज्ञ आहेत. विशेषतः शहरांमध्ये रहात असलेले हिंदु धर्मापासून दूर जात आहेत. आज शुद्ध स्वरूपात धर्म सांगणारे उपलब्ध नाहीत. हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही, तर पुढच्या पिढीला काहीच कळणार नाही. आपण देहलीमध्ये एकत्रितपणे धर्मकार्य करू. भविष्यात होणार्‍या ‘अर्चक’ शिबिरांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चित आमंत्रित करू’, असे उद्गार जनकपुरी येथील श्रीराम मंदिराचे अध्यक्ष तथा सनातन धर्म प्रतिनिधी सभा, देहलीचे कार्यकारी अध्यक्ष श्री. भूषणलाल पराशर यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच श्री. पराशर यांची सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्यासह या वेळी सनातन संस्थेच्या देहली येथील प्रवक्त्या कु. कृतिका खत्री याही उपस्थित होत्या.

‘सनातन धर्म प्रतिनिधी सभा’ ही संघटना देहली क्षेत्रातील २ सहस्र मंदिरांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करते. ‘मंदिरांतील पूजकांचे वर्तन, व्यवहार आणि पौरोहित्य उत्तम असावे, यासाठी परिषद १५ दिवसांचे ‘अर्चक’ शिबिर आयोजित करते’, असे श्री. पराशर यांनी सांगितले. वयाच्या ८५ व्या वर्षीही श्री. पराशर विविध प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये सक्रीय असून त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल, असा आहे.

क्षणचित्रे

१. श्री. पराशर यांनी तेथील मंदिरातील प्रभु श्रीरामाच्या मूर्तीला अर्पण केलेला पुष्पहार प्रसादस्वरूपात सद्गुरु डॉ. पिंगळे यांना घालून त्यांचा सन्मान केला.

२. सदगुरु डॉ. पिंगळे यांनी श्री. पराशर यांना ‘वर्ष २०२२ चे सनातन पंचांग’, तसेच सनातनचे हिंदी भाषेतील काही ग्रंथ भेट दिले.

३. ‘आम्ही सनातनचे ग्रंथ देहलीच्या प्रमुख मंदिरामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करू’, असे श्री. पराशर यांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *