Menu Close

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

मुंबई – वर्ष २०१२ मध्ये मुंबईत रझा अकादमीने केलेल्या दंगलीत कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रीय संपत्तीची हानी झाली. त्याची वसूली अजूनही बाकी आहे. आता पुन्हा त्रिपुरातील (तथाकथित) घटनेचे कारण देऊन महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, नांदेड आणि अन्य भागांत विनाअनुमती मोर्चे काढून हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली. हिंदूंच्या संपत्तीची, तसेच राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यात आली. रझा अकादमीचा इतिहास पहाता दंगलीतील सहभागाविषयी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी परभणी (महाराष्ट्र) येथील अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ नोव्हेंबर या दिवशी ‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

अधिवक्ता सतीश देशपांडे

या चर्चेत अमरावती येथील दैनिक ‘नवभारत’चे उपसंपादक श्री. अमोल खोडे, त्रिपुरा येथील ‘हिंदु जागरण मंच’चे प्रदेशाध्यक्ष श्री. उत्तम दे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे सहभागी झाले होते. सूत्रसंचालन समितीचे श्री. वैभव आफळे यांनी केले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम ३ सहस्र ८७६ जणांनी पाहिला.

अमरावती येथील धर्मांधांच्या मोर्च्याला राजकीय समर्थन होते ! – अमोल खोडे, उपसंपादक, दैनिक ‘नवभारत’

श्री. अमोल खोडे

अमरावती येथे सर्व नियम धाब्यावर बसवून काढलेल्या मोर्च्यात धर्मांधांनी तलवारी, हत्यारे घेऊन हिंदु व्यापार्‍यांना लक्ष्य केले. संपूर्ण शहरात धर्मांधांनी उत्पात माजवला होता. या उग्र जमावाला थोपवण्यास पोलीस-प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले. या दंगलीमुळे हिंदूंवर झालेले घाव कधीही भरून निघणारे नाहीत. धर्मांधांच्या या मोर्च्याला राजकीय समर्थनही होते.

अफवांच्या आधारे महाराष्ट्रात उद्रेक घडवला जातो, हे आश्चर्यजनक ! – उत्तम दे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु जागरण मंच, त्रिपुरा

श्री. उत्तम दे

बांगलादेशमध्ये हिंदू आणि मंदिरे यांवर होणार्‍या अत्याचारी आक्रमणांच्या विरोधात त्रिपुरामध्ये ठिकठिकाणी शिस्तबद्ध मोर्चे काढण्यात आले; मात्र राष्ट्रविरोधी शक्तींनी काही प्रसारमाध्यमांना हाताशी धरून मुसलमानांवर अत्याचार झाल्याचे खोटे चित्र निर्माण केले. त्रिपुरामध्ये असे काही (मुसलमानांवर अत्याचार) झाले नसतांना अफवांच्या आधारे महाराष्ट्रात उद्रेक घडवला जातो, हे आश्चर्यजनक आहे.

धर्मांधांच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी हिंदूंनी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड या ठिकाणांच्या दंगलींतून धर्मांधांना दहशत निर्माण करायची होती, हा उद्देश स्पष्ट झाला आहे. या दंगलीत हिंदु बांधवांसह पोलिसांनासुद्धा घायाळ करण्यात आले. भविष्यात धर्मांधांची अशी आक्रमणे झाल्यास त्यांपासून रक्षण होण्यासाठी हिंदूंनी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे.

पोलिसांनी हिंदु संघटनावर दबाव निर्माण केला

महाराष्ट्रातील या दंगलखोरांच्या विरोधात कडक कारवाई करावी, यासाठी ठिकठिकाणी पोलीस-प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत; मात्र काही ठिकाणी पोलिसांनी ‘निवेदने देण्यापूर्वी आमची अनुमती घ्यावी लागेल. निवेदन दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांना देऊ नका’, असे सांगून हिंदु संघटनांवर दबाव निर्माण केला. हिंदूंना त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात घटनात्मक मार्गाने आवाज उठवण्याचा राज्यघटनेने दिलेला अधिकारही ‘सेक्युलर’ भारतात शिल्लक नाही का ?

______________________________

‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’
या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद पाहण्यासाठी इथे क्लिक करा
__________________________________________

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *