नगर – ‘प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त तुमचे दुःख आनंदात बदलणारच’, अशा आशयाचे विज्ञापन नगर जिल्ह्यामधील फलकावर लावलेले आहे, तसेच सदर विज्ञापनाचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर सर्वत्र प्रसारित झालेले आहे. ‘ढोरजळगाव आशीर्वाद सभा २०२१’ या कार्यक्रमासाठी असलेल्या वरील विज्ञापनाचा मूळ उद्देश हा वरील प्रकारच्या अवैध विज्ञापनाद्वारा, भूलथापा मारून ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मपरिवर्तन करणे हाच आहे. वरील विज्ञापन पूर्णपणे अवैध असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे, त्याकरिता योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन ‘परभणी अधिवक्ता संघटने’च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना ३० नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले. त्या वेळी १५ ते २० अधिवक्ता एकत्रित आले होते. अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. सदर निवेदन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातून, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर यांना ‘फॅक्स’ करण्यात आले.
सुनील गंगावणे आणि शैला गंगावणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्वसामान्य जनतेस या विज्ञापनाद्वारा जाहीर आवाहन करण्यात आले आहे आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेस ‘तुम्ही आजारी आहात का ? तुम्ही त्रासात आणि सैतानाच्या बंधनात आहात ? तुम्ही दुःखी आहात का?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील, असेही सांगण्यात आले आहे.
नगर येथील स्थानिक निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अरुण ठाणगे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रामेश्वर भुकन, संतोष गवळी, संजय गायकवाड उपस्थित होते.