Menu Close

विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीचे पूजन न करताच यंदा होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ !

दीपप्रज्वलनालाही फाटा देणार !

  • आयोजक जर सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन डावलत असतील, तर यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो. अशा प्रकारे कथित पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी भारतीय संस्कृतीला डावलणे, हा भारतीय संस्कृती आणि लोकशाही यांचा अवमान आहेच; पण वैचारिक दिवाळखोरीही आहे ! आयोजकांच्या या हिंदुद्वेषी निर्णयाला समस्त धर्मप्रेमी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रत्येक वर्षी होणार्‍या नवनव्या वादांमुळे या संमेलनाची प्रतिमा पार धुळीस मिळाली आहे ! एका साध्या संमेलनाचेही व्यवस्थित आणि निर्विवाद आयोजन करू न शकणारे मराठी भाषेचे जतन अन् संवर्धन काय करणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

मुंबई – ‘संतांची भूमी’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात कथित पुरोगामीत्वाच्या नावाखाली विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीचे पूजन न करताच नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. पुरोगामीत्वाचे पुरस्कर्ते असल्याचे भासवण्यासाठी कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलनालाही फाटा देण्यात येणार आहे, असे खात्रीलायक वृत्त प्राप्त झाले आहे. हा प्रश्न प्रसिद्धीमाध्यमांनी उचलून धरला असतांनाही आयोजकांनी याविषयीची भूमिका स्पष्ट केली नाही.

साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांच्याशी दूरभाषवर संपर्क साधला असता त्यांनी याविषयी ‘काहीही कल्पना नाही. हा विषय उद्घाटन समितीकडे येतो’, असे सांगून माहिती देण्याचे टाळले. उद्घाटन समितीतील संबंधित सदस्यांचा संपर्क मागितला असता, ‘अनेक समित्या असल्यामुळे मला ‘नावे ठाऊक नाहीत’, तसेच अन्य कार्यक्रमात व्यस्त आहे’, असे सांगून जातेगावकर यांनी तो दिला नाही.

काही वृत्तापत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात जातेगावकर यांनी ‘संमेलनात श्री सरस्वतीपूजन करायचे किंवा कसे ?’ याविषयी स्वागताध्यक्ष तसेच विद्यमान मंत्री छगन भुजबळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे. यासह वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाध्यक्ष असल्याने ‘दीपप्रज्वलन करायचे किंवा कसे ?’, याविषयी संमेलनाध्यक्षांना विचारून निर्णय घेण्यात येणार आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सभागृहाच्या मंडपालाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार नाही !

साहित्य संमेलनस्थळी असलेल्या सभागृहाच्या मंडपालाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार नसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

विद्येची उपासना नाकारणारे संमेलन भाषा आणि संस्कृती यांचे उत्थान साधेल का ? – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

साहित्य संमेलन हा सरस्वतीपुत्र आणि मराठीप्रेमी यांचा उत्सव आहे, अशी आपली भारतीय परंपरा मानते. त्यामुळे ‘सरस्वतीपूजन’ हा त्यातील अविभाज्य घटक आहे. जेव्हा आपण सरस्वतीदेवीचे पूजन नाकारतो, तेव्हा आपण विद्येची उपासना नाकारतो. अशा प्रकारे विद्येची उपासना नाकारणारे संमेलन खरोखरच भाषा आणि संस्कृती यांचे उत्थान साधेल का ? आमची आयोजकांना विनंती आहे की, त्यांनी परंपरेने चालू असलेले सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन करून साहित्य संमेलनाचा आरंभ करावा.


दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करून साहित्य संमेलनाच्या परंपरेचे जतन करावे !

हिंदु जनजागृती समितीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना आवाहन

निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदनदेतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक

नाशिक – आजवर ९३ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली. या सर्व संमेलनांचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीपूजन यांनी झाले आहे. या संमेलनातही दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करून साहित्य संमेलनाच्या परंपरेचे जतन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या विषयी १ डिसेंबर या दिवशी समितीच्या कार्यकर्त्यांनी  निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर या कृतींमागे विशिष्ट शास्त्रही आहे. त्यामुळे ते रहित करणे, हे खरे पुरोगामीत्व नव्हे. उलट यातून एकप्रकारे वैचारिकतेच्या अभावाचे प्रदर्शन होईल.

२. संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी ‘संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर वैज्ञानिक आहेत, तर सरस्वतीपूजन कसे करणार ?’ असे विधान केल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. जातेगावकर यांचे असे बोलणे अतिशय हास्यास्पद आहे. डॉ. नारळीकर हे वैज्ञानिक असण्याचा आणि दीपप्रज्वलन अन् सरस्वतीपूजन यांच्याशी काय संबंध ? डॉ.  नारळीकर यांच्या पूर्वीही कितीतरी मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत, त्यांनी कधी या कृतींना विरोध केला नाही.

३. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कधी ‘सरस्वतीपूजन’ आणि ‘दीपप्रज्वलन’ यांवर आक्षेप घेतला नाही. याउलट ते अतिशय श्रद्धावान होते. शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक असणे, हा त्यांच्या कार्यक्षेत्राचा परिचय असू शकतो; परंतु त्यांनी कधी या गोष्टींना विरोध केला नाही.

४. दीपप्रज्वलनासारख्या सर्व धार्मिक कृतींमागे शास्त्र आहे. ते समजून घेऊन त्यावर बोलायला हवे. वैज्ञानिक असल्यामुळे ‘पूजन नको’, असे म्हणणे ही एक ‘वैज्ञानिक अंधश्रद्धा’च आहे. यातून आयोजकांची नास्तिकता प्रकट होत आहे. त्यांच्या नास्तिकतेला कृपया वैज्ञानिकतेचा लेप लावू नये अन्यथा मराठी साहित्य संमेलनाला ‘नास्तिकांचे संमेलन’ असे नाव देऊन संमेलन घ्यावे.

५. सर्वधर्मीय बहुसंख्य समाज हा आस्तिक आहे. त्यांच्यावर स्वतःच्या नास्तिकतावादाची विचारसरणी लादणे, म्हणजे एकप्रकारे साहित्यक्षेत्रातील हुकूमशाहीच मानावी लागेल. अशा नव्या हुकूमशाहीचा उदय आपणाकडून होऊ नये.

६. साहित्य आणि त्याविषयीचे संमेलन हे सामाजिक सलोखा राखणारे हवे, तसेच सर्व समाजाला एकजूट करणारे हवे. येथे स्वत:ची व्यक्तीगत विचारसरणी अन्यांवर लादून हेतूतः समाज विघटित होईल किंवा समाजात वादंग निर्माण होतील, अशी वक्तव्ये किंवा कृती होता कामा नये.

७. दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीपूजन रहित केल्याने संमेलनाची परंपरा खंडित झाल्यास समाजात वाद निर्माण होऊन साहित्य संमेलनाची प्रतिष्ठाही लयाला जाईल. संमेलनाध्यक्ष कुणीही असो; पण संमेलनाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे.

८. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषा, लेखक, कवी, साहित्य-संस्कृती आदींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याला कोणत्याही प्रकारच्या वादाचे गालबोट लागणे अयोग्य आहे.

९. या संमेलनातून मराठी साहित्याची वृद्धी व्हावी, त्याची गुणवत्ता वाढावी, नवसाहित्यिकांना स्फूर्ती मिळावी, वाचन संस्कृतीला चालना मिळावी आदी विविध दृष्टींनी प्रयत्न व्हायला हवेत; मात्र या गोष्टींकडे कानाडोळा होतांना दिसत आहे.

.. तर हिंदु जनजागृती समिती वैध मार्गाने विरोध करणार !

आयोजकांनी शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन संमेलनात दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीपूजन टाळू नये अन्यथा हिंदु जनजागृती समिती याला वैध मार्गाने विरोध करील, अशी चेतावणीही यात देण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *