Menu Close

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचा ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यात कृतीशील सहभाग !

सिंधुदुर्ग – व्यापार आणि भारतीय अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. हिंदु जनजागृती समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध स्तरांवर प्रबोधन करत आहेत. या धोक्याविषयी माहिती मिळाल्यामुळे जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ आदी विविध स्तरांवर कार्य करणारे हिंदू सतर्क होत असून ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद व्हावी, यासाठी कृतीशील होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याचा अर्थ हिंदूंना त्यांच्यावरील संकटांची योग्य पद्धतीने जाणीव करून दिली, तर तेही पद, पक्ष, संघटना आदी विसरून हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणाचे कार्य करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे येतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

श्री. मनोज खाडये

वेंगुर्ला, मालवण आणि कुडाळ येथे उद्योजकांसाठी चर्चासत्र झाले. मालवण, देवगड, कुडाळ आदी ठिकाणी व्यापारी, उद्योजक, विविध संघटना यांनी ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात शासनाला निवेदन दिले. कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. या वेळी श्री. मनोज खाडये यांनी ‘हलाल’ म्हणजे काय ? ‘हलाल प्रमाणपत्र’ म्हणजे काय ? त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय दुष्परिणाम होणार आहे ? शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुणालय, गृहसंस्था अशा कोणकोणत्या स्तरांवर ही यंत्रणा कार्यरत आहे आदी सूत्रांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

मालवण येथे धर्मप्रेमी आणि उद्योजक यांच्यासाठी चर्चासत्र

मालवण – येथील उद्योजकांसाठी २ डिसेंबर या दिवशी येथील कन्याशाळेच्या कै. गंगुबाई कृष्णराव देसाई सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी धर्मप्रेमी आणि उद्योजक असे २६ जण उपस्थित होते.

उपस्थित धर्मप्रेमी आणि उद्योजक

उपस्थितांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

१. श्री. दशरथ कवटकर, मालक, कवटकर ट्रेडर्स – मी आतापासूनच कुठल्याही दुकानात गेल्यावर ‘हलाल’ ठसा (लोगो) असणारे उत्पादन घेणार नाही, तसेच चुकून जरी आणले, तरी ते मी परत करीन.

२. श्री. रविंद्र जोशी, विस्तारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मालवण – कार्यक्रम खूपच चांगला झाला. उद्बोधक आणि जागृती करणारा वाटला. याचा पाठपुरावा करण्याचा विचारही करूया. ‘हिमालया’ हे आस्थापनही धर्मांध व्यक्तीचे असून तिची उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाईड’ आहेत. त्यावरही आपण बहिष्कार घालूया. हे सर्वांनी करणे आवश्यक आहे.

३. अधिवक्ता सुदर्शन गिरसागर, मालवण – ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात हिंदूंनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे.

४. श्री. रत्नाकर कोळंबकर, मालवण – हा विषय सर्व हिंदूंपर्यंत पोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पुन्हा आम्ही मालवणमध्ये लोकांना एकत्र करून याविषयी जनजागृती करू.


कणकवली येथे पत्रकारांशी संवाद

कणकवली येथे २ डिसेंबर या दिवशी ‘मातोश्री मंगल कार्यालया’त ‘पत्रकारांशी संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी दैनिक ‘पुढारी’चे प्रतिनिधी श्री. अजित सावंत, ‘तरुण भारत’चे श्री. तुषार हजारे, ‘रत्नागिरी टाइम्स’चे श्री. लक्ष्मीकांत भावे, ‘कोकण नाऊ’चे श्री. दिगंबर वालावलकर, ‘आपली सिंधुदुर्गनगरी’चे श्री. उमेश परब उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी पत्रकारांना ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे देशात चालू असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि हिंदु धर्मियांना कसा धोका निर्माण होत आहे, याविषयी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. संदेश गावडे उपस्थित होते.

अभिप्राय – या वेळी दैनिक ‘पुढारी’चे श्री. अजित सावंत म्हणाले, ‘‘मी माझ्या संपर्कातील ज्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांचे ‘हलाल अर्थव्यवस्थे’विषयी प्रबोधन करणार आहे. आपण एकजुटीने याला विरोध केल्यास हे संकट परतवून लावू शकतो.’’


वेंगुर्ला येथे व्यापारी, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी चर्चासत्र पार पडले !

वेंगुर्ला – वेंगुर्ला येथील उद्योजक श्री. कुणाल वरसकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘साईदरबार हॉल’ येथे ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी श्री. मनोज खाडये यांच्या चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रात व्यापारी, उद्योजक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी येथील नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्री. खाडये यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे गिरीष पाठक, आशिष पाडगावकर, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा अधिवक्त्या सुषमा खानोलकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उपाख्य बाळू देसाई, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, व्यापारी बाळा शिरसाट, भय्या शिरसाट, मिलिंद शिवलकर, उद्योजक बिपिन वरसकर, शिवदत्त सावंत, कुणाल वरसकर, आपा धोंड, देवेंद्र प्रजापती, संजय पुनाळेकर, रवि शिरसाट, विकी आजगावकर, पी.के. कुबल, सनातन संस्थेचे सर्वश्री प्रवीण कांदळकर, महेश जुवलेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संदेश गावडे, गोपाळ जुवलेकर आदींसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. सर्वांनी या चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विषय ऐकल्यावर सर्वांनीच ‘हा विषय गंभीर असून आम्ही आमच्या स्तरावर याविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो’, असे सांगितले.

नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना श्री. मनोज खाडये

चर्चासत्रापूर्वी श्री. मनोज खाडये यांनी वेंगुर्लाचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, व्यापारी आशिष पाडगावकर यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी श्री. खाडये यांनी नगराध्यक्ष गिरप यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले.

उपस्थित व्यापारी, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ

उपस्थितांचे अभिप्राय

१. श्री. प्रसन्ना उपाख्य बाळू देसाई, जिल्हा सरचिटणीस, भाजप – हिंदु म्हणून अशा मोहिमांमध्ये आम्ही नेहमी पुढे रहाणार आहोत. अशा वेळी आम्ही पद, पक्ष, कोण काय म्हणेल ? याचा विचार करत नाही आणि करणारही नाही. ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी आम्ही तहसीलदार यांना निवेदन देणार आहोत.

२. श्री. दिलीप गिरप, नगराध्यक्ष, वेंगुर्ला – हिंदु जनजागृती समितीमुळे ‘हलाल अर्थव्यवस्था’ म्हणजे काय हे समजले. हिंदु म्हणून आम्ही हिंदूविरोधी कृतींना नेहमीच विरोध केला आहे आणि यापुढेही करू. तुम्हाला चांगल्या गोष्टींसाठी आमचे सहकार्य राहील.

३. श्री. आशिष पाडगावकर, व्यापारी – आज वेगवेगळ्या वाहिन्यांवर हिंदूंच्या विरोधात कार्यक्रम दाखवले जात आहेत. ते पहाण्यापेक्षा ‘सुदर्शन’ वाहिनीवर चालू असलेला ‘बिंदास बोल’ हा कार्यक्रम पाहिला पाहिजे.

वेंगुर्ला येथील उद्योजक श्री. कुणाल वरसकर यांनी कुडाळ येथे श्री. मनोज खाडये यांचे ‘हलाल प्रमाणपत्रा’वरील व्याख्यान ऐकले होते. त्या वेळी त्यांना वेंगुर्ला तालुक्यातही याविषयी प्रबोधन व्हायला हवे, असे वाटले. त्यानुसार त्यांनी एक ‘पोस्ट’ (लिखाण) बनवली आणि त्यांच्या ‘व्हॉट्सअप’वरून प्रसारित केली, तसेच काही सहकार्‍यांनाही संपर्क करून हा विषय सांगितला. त्यानंतर सर्वांच्या पुढाकाराने वेंगुर्ला येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

पावशी (कुडाळ) येथे धर्मप्रेमींसाठी चर्चासत्र

कुडाळ – तालुक्यातील पावशी येथील श्री सातेरीदेवी मंदिरात ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्राला गावचे सरपंच श्री. भिकाजी उपाख्य बाळा कोरगावकर यांच्यासह एकूण २२ धर्मप्रेमी उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी काही जणांनी व्यक्त केलेले अभिप्राय

१. श्री. पुंडलिक उपाख्य दादा वासुदेव तवटे, मंदिर व्यवस्थापक – धर्मांधांनी चालवलेले हे छुपे आर्थिक युद्ध हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून लक्षात आले. समाजात जागृती करण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करणार ! अशा बैठका गावागावात झाल्या पाहिजेत.

२. श्री. विद्याधर वाळके, निवृत्त शिक्षक (केंद्रप्रमुख) – एवढे भीषण षड्यंत्र आम्हाला ठाऊक नव्हते. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हा विषय समजला. प्रत्येक व्यावसायिक, व्यापारी यांच्यापर्यंत हा विषय पोचणे आवश्यक आहे.

३. श्री. प्रकाश वाळके, पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ – मी हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत, तसेच व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करीन. हा विषय लवकरात लवकर तळागाळापर्यंत प्रत्येक व्यापारी, नागरिक यांना समजेल, यासाठी प्रयत्न करणार. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यासाठी मी सर्वतोपरी साहाय्य करीन.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *