Menu Close

संपूर्ण आयुष्य केवळ धर्मासाठी देऊन धर्मविरोधी शक्तींच्या विरोधात लढा देणार ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

आळंदी (पुणे) येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा पार पडली !

आळंदी (पुणे) – पालघरमध्ये ज्या साधूसंतांच्या हत्या झाल्या, त्या घटनेचा मी निषेध करतो. हत्याप्रकरणाची चौकशी संथ गतीने चालू आहे, त्याविषयी खेद वाटतो. न्यायालयीन लढा चालू असून त्याचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल; परंतु येणार्‍या काळात धर्मविरोधी शक्तींना हद्दपार केल्याविना स्वस्थ बसणार नाही. साधूंच्या हत्या झाल्या, त्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी काम करतात. ५०० ते १ सहस्र रुपयांसाठी गोरगरीब जनता बळी पडते. त्यांच्या घरातील देव बाहेर काढून टाकले जातात. कीर्तने बंद पाडली जातात. रावणाची पूजा केली जाते. अशा प्रकारच्या धर्मविरोधी शक्तींना हद्दपार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य धर्मासाठी समर्पित करीन आणि साधूंची हत्या झालेल्या ठिकाणी हिंदु शक्तीपिठाची निर्मिती करणार, असा संकल्प वृंदावन धामचे हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड यांनी या वेळी केला. आळंदी (जिल्हा पुणे) येथील देविदास धर्मशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृतीमंदिर येथे १ डिसेंबर या दिवशी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त १६ वे वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

महाअधिवेशनाचा प्रारंभ ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे यांनी म्हटलेल्या संस्कृत श्लोकाने झाला. १६ व्या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी आणि मान्यवर यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘सकल संतचरित्र’ या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा करून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना आश्रय दिल्याविषयी केंद्रशासनाचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण महाराज पिंपळे यांनी केले, तर अधिवेशनाची सांगता पसायदानाने झाली.

हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड म्हणाले…

१. विज्ञापने, चित्रपट यांमधून देवतांचे विडंबन आणि मोगलांचे उदात्तीकरण होत आहे. ते थांबले पाहिजे. साधू-संतांचे तत्त्व, छत्रपती शिवरायांचे शौर्य वारकर्‍यांनी अंगीकारले पाहिजे.

२. तोंड वर काढणार्‍या राष्ट्र आणि धर्म विरोधी शक्तींना वेळीच आवरले पाहिजे.

३. गुरुवर्य पू. वक्ते महाराज यांना वारकरी संप्रदाय ‘पितामह भीष्म’ संबोधतात. त्यांनी वारकरी संघटनेच्या माध्यमातून १६ वर्षांपूर्वी या राष्ट्रीय वारकरी परिषदेची स्थापना केली. वारीमध्ये सर्व साधू-संत, साधक एकत्र यावेत, विचारांचे चिंतन आणि मंथन व्हावे, यासाठी आगामी काळातही अशी अधिवेशने होणे आवश्यक आहे.

महाअधिवेशनात मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन

हिंदु धर्म, मंदिरे आणि स्त्रिया यांचे रक्षण व्हायला हवे ! – सुरेशभाऊ आगे, अध्यक्ष, शिवप्रहार प्रतिष्ठान

छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र घरात ठेवून नव्हे, तर त्यांचा आदर्श घेऊन हिंदु धर्माचे रक्षण केले पाहिजे. मंदिरांचे रक्षण झाले पाहिजे. हिंदु स्त्रियांचे रक्षण करण्याचे दायित्वही आपण घेतले पाहिजे. गोमातांची हत्या थांबण्यासाठी गोमातेचे रक्षण केले पाहिजे. ‘संस्कृतीचे जतन करत स्वभाषा जिवंत रहाण्यासाठी प्रयत्न करणे’, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे.

शिक्षण व्यवस्थेतील पालट ही आगामी काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

आगामी काळात शिक्षणव्यवस्थेत पालट होणे अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या शिक्षणपद्धतीने हिंदु धर्मियांचा इतिहास दडपला गेला आहे. त्यामुळे सध्याच्या पिढीला भारतीय संस्कृती आणि हिंदूंचा इतिहास शिकायलाच मिळत नाही. किंबहुना त्यांना तो ठाऊकही नाही. शिक्षणपद्धतीत हिंदूंचा इतिहास शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. आमच्या मागण्या ज्या सरकारकडून पूर्ण होतील, त्याला वारकरी संप्रदाय साहाय्य करेल. जिथे गायरान आहे, तिथे गोशाळा चालू करा. शासनाच्या भूमी गोशाळेला दिल्या पाहिजेत. (या वेळी त्यांनी सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी खंत व्यक्त केली.)

विश्व हिंदु परिषदेचे वारकरी संप्रदायाला आश्वासन ! – संजय आप्पाजी बारगजे, देवगिरी प्रांत अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

विश्व हिंदु परिषद पूर्ण शक्तीनिशी वारकरी संप्रदायाच्या पाठीशी उभी राहील. आवश्यक तेथे साहाय्य दिले जाईल.

भारत हा जगातील वैशिष्ट्यपूर्ण असा देश ! – पू. विष्णू पादानंदजी महाराज, रामकृष्ण मिशन

भारत हा वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. जगात असा एकच देश आहे, जो कोणत्याही देशाला त्रास देत नाही. सर्व जगासाठी प्रार्थना करणारा, आत्मदृष्टी देणारा, असा भारत देश आहे. ‘जग भारताला गुरुस्थानी पाहील’, असे दिवस येतील. आत्म्याचे दर्शन घडायचे असेल, तर ते भारतभूमीतच शक्य आहे. भारतभूमी मोक्षभूमी आहे. भारतामागे ईश्वरी शक्ती आहे म्हणून आपले कार्य शांत राहून केले पाहिजे. आपल्या पाठीशी भगवंताचे अधिष्ठान आहे.

भारतामध्ये वारकरी पंथासारखा दुसरा पंथ नाही. धर्मकार्यासाठी सर्वांना शुभेच्छा !

सर्व संप्रदाय एकत्र आले, तर हिंदु धर्माचा झेंडा सर्व जगावर राज्य करेल ! – ह.भ.प. केशव महाराज उखळीकर

वारकरी महाअधिवेशनामुळे मला पुष्कळ प्रेरणा मिळाली. ‘पुन्हा एकदा धर्मरक्षणासाठी सज्ज व्हावे’, असे मला वाटू लागले आहे. मी धर्मकार्यासाठी तन-मन-धनाने पूर्ण पाठीशी उभा राहीन. काहीही अल्प पडू देणार नाही. चरण तयाचे धरा जयाचे आचरण चांगले ! शेतकरी आणि वारकरी संघटित झाल्यास तो जगावर सत्ता गाजवू शकतो. आपल्यातीलच माणसे आपलाच विरोध किंवा हेरगिरी करत असतील, तर त्यांना वेळीच ओळखा. त्यांना गारगोटीसारखे रत्नातून बाहेर काढा.

सर्व संप्रदाय एकत्र आले, तर हिंदु धर्माचा झेंडा सर्व जगावर राज्य करेल. धर्मासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास मी सिद्ध आहे. अंथरुणावर पडून मरण्यापेक्षा झेंडा घेऊन वारकर्‍यांचे तत्त्व घेऊन विरोधकांना टक्कर देण्यासाठी आपणही उभे राहूया.

वारकरी महाअधिवेशनात मांडण्यात आलेले ठराव

१. देव, संत, व्रत, ग्रंथ आणि हिंदु धर्म यांचा अवमान, तसेच विडंबन करणारे यांच्या विरुद्ध कठोर कायदा करावा.

२. काश्मीर आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी अल्पसंख्यांक झालेल्या भागांतील हिंदूंना सुरक्षा देणारा कायदा करावा.

३. गायरान भूमीवरील अतिक्रमण हटवून त्या संगोपनासाठी सुरक्षित कराव्यात.

४. धर्मांतरबंदी कायदा करून धर्मांतर केलेल्यांची चौकशी करून ते लाटत असलेल्या सवलती बंद कराव्यात.

५. पोलिसांवर आक्रमण करणारे, दंगली घडवून गुंडगिरीद्वारे दहशत निर्माण करणार्‍यांच्या विरुद्ध कठोर कायदा करावा.

धर्मावरील आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे ! – पराग गोखले, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. पराग गोखले

हलाल प्रमाणपत्राद्वारे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र चालू आहे. हलाल म्हणजे काय ?, हलाल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किती रक्कम लागते ?, यातून मिळालेले पैसे कुठे खर्च होतात ?, कुठल्या संघटनांकडे ते जातात ?, त्यांचा विनियोग कसा केला जातो ?, हिंदूंचाच पैसा हिंदूंच्या विरोधात कसा वापरला जातो ?, याचा हिंदूंनी विचार करावा. असे प्रकार थांबवणे, तसेच देव, देश आणि धर्म वाचण्यासाठी भारत हिंदु राष्ट्र घोषित होण्याची आवश्यकता आहे.

क्षणचित्र

पुणे जिल्ह्यातील पाषाण येथील दीपक पावशे हे स्वतःच्या पाठीशी कोणतीही संघटना आणि कार्यकर्ते नसतांना देवता, राष्ट्रपुरुष किंवा धर्म यांविषयी काही विडंबनात्मक गोष्टी आढळल्यास पोलिसात लगेच तक्रार प्रविष्ट करतात. अधिवेशनस्थळी त्यांनी निषेधाचे लिखाण असलेला टी शर्ट परिधान केला होता. त्यावर लिहिले होते, ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव बिडीसाठी वापरल्याविषयी मी जाहीर निषेध करतो.’

विशेष सहकार्य आणि आभार

ह.भ.प. निरंजन महाराज कोठेकर यांनी देवीदास धर्मशाळेची जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आणि धर्मसभा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

उल्लेखनीय

वर्षभरात ज्यांनी धर्मरक्षणाचे कार्य केले, अशांचा सत्कार आणि सन्मान या धर्मसभेत करण्यात आला. शिवप्रहार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुरेशभाऊ आगे, तसेच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. कमलेश कटारिया यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष सेवा

ह.भ.प. अभिषेक महाराज राऊत, श्याम महाराज उमटकर, तसेच आळंदीतील काही तरुण यांनी बैठक, तसेच वीज व्यवस्था, आवरणे आणि स्वच्छता या सेवा चांगल्या प्रकारे केल्या.

विशेष सहकार्य : ह.भ.प. बापू महाराज रावकर

विशेष उपस्थिती

श्री. कमलेशजी कटारिया, ह.भ.प. एकनाथ महाराज पठाडे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष ह.भ.प. राहुल महाराज कडू, प्रचारक ह.भ.प. नवनाथ महाराज विखे, ह.भ.प. विठ्ठल महाराज अभंग, वेणुनाथ महाराज विखे, तसेच ह.भ.प. आकाश महाराज खोकले, ह.भ.प. प्रदीप महाराज पाटील यांसह पालघर आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

वैकुंठवासी गुरुवर्य पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सभा  !

वैकुंठवासी गुरुवर्य पूजनीय (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वारकरी महाधिवेशन आणि धर्मसभा १० डिसेंबर २०२१ या दिवशी आईसाहेब मंगल कार्यालय लोणी, संगमेश्वर रोड, जिल्हा नगर येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार असून या धर्मसभेला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या वेळी कोविड योद्ध्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व हिंदु बांधवांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदचे राज्य प्रसारक ह.भ.प. वेणुनाथ महाराज विखे यांनी केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *