Menu Close

‘शारदा वाचवा समिती’कडून पाकव्याप्त काश्मीरमधील ‘शारदा यात्रा’ पुन्हा आरंभ करण्याचा प्रयत्न

मुळात सरकारनेच यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

‘शारदा वाचवा समिती’कडून नियंत्रण रेषेवर टीटवल या ठिकाणी शिलान्यास करताना

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या शारदा पिठाच्या यात्रेस पुन्हा आरंभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुपवाडा येथील मंदिर आणि धर्मशाळा यांच्या पुर्नउभारणीसाठी ‘शारदा वाचवा समिती’कडून नियंत्रण रेषेवर टीटवल या ठिकाणी शिलान्यास करण्यात आला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या दारक्सान अन्द्राबी यांच्या हस्ते हा शिलान्यास झाला. अन्द्राबी या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अखत्यारीतील वक्फ विकास समितीच्या अध्यक्षा आहेत. शारदा पीठ हे प्राचीन हिंदु विद्यापीठ आहे. हे ठिकाण वर्ष १९४७ पूर्वी शारदा यात्रेसाठी प्रसिद्ध होते.

१. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी सांगितले की, कर्तारपूर साहिब गुरुद्वारा या ठिकाणी जाणारा मी पहिला काश्मिरी आहे. जर भारत आणि पाकिस्तान हे कर्तारपूर साहिबसाठी काही व्यवस्था करू शकतात, तर मग शारदा पिठासाठी का करू शकत नाहीत ? कर्तारपूर साहिब गुरुद्वारा पाकिस्तानमध्ये असून येथे जाण्यासाठी पंजाबमधून महामार्ग निर्माण करण्यात आला आहे.

२. रवींद्र पंडिता पुढे म्हणाले की, ‘सध्याच्या नियमावलीत पालट करून काश्मीरच्या दोन्ही भागांत असलेल्या लोकांना त्यांच्या धार्मिक स्थळांच्या यात्रेस मुभा द्यावी. मुसलमान असल्यास त्यांना काश्मीरमधील हजरतबल आणि चरार शरीफ येथे जाण्याची अनुमती द्यावी, तर येथील लोकांना शारदा पीठ आणि गुरुद्वारा अली बेग येथे जाण्यास आडकाठी नसावी.

३. शारदा यात्रेला पुन्हा आरंभ करण्यासाठी पंडिता हे अनेक वर्षे भारत आणि पाकिस्तान सरकारांकडे प्रयत्न करत असून त्यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. त्यांच्याच प्रयत्नाने पाकव्याप्त काश्मीरमधील न्यायालयाने शारदा पिठाच्या जागेवरील अतिक्रमणे रोखण्याचा आदेश देत हे स्थळ तेथील पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आणले आहे.

प्राचीन शारदा पिठाचा इतिहास

ज्ञानाची देवता मानल्या जाणार्‍या श्री सरस्वतीदेवीचे, म्हणजेच श्री शारदेचे हे ठिकाण  आहे. नीलम खोर्‍यात ख्रिस्तपूर्व २७३ मध्ये या पिठाची स्थापना झाल्याचे मानले जाते, म्हणजेच तक्षशिला आणि नालंदा या विद्यापिठांपेक्षाही ते प्राचीन असल्याचा दावा केला जातो. हे विद्यापीठ असले, तरी येथील मंदिराची वार्षिक यात्रा महाराजा प्रताप सिंह आणि रणबीर सिंह यांच्या कारकीर्दीत प्रसिद्धीस आली होती. वर्ष १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतर ही यात्रा खंडित झाली आणि मंदिरही दुर्लक्षित झाले. सध्या लोकांना सीमा ओलांडून जाण्यास अनुमती नसली, तरी लवकरच ते शक्य होईल, अशी आशा रवींद्र पंडिता यांनी व्यक्त केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *