Menu Close

‘किल्ले वंदनगड’चे ‘पीर किल्ले वंदनगड’ करण्याचा धर्मांधांचा डाव फसला; वन विभागाकडून खुलासा

छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसणार्‍यांपासून सावध राहून धर्मांधांचे षड्यंत्र रोखा ! – हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांचे आवाहन

वाई (जि. सातारा)   तालुक्यातील ऐतिहासिक ‘किल्ले वंदनगड’चे नाव पालटून ‘पीर किल्ले वंदनगड’ असे करत इतिहास पालटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने तत्परतेने मा. मुख्यमंत्री, पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांना निवेदन देत हा गंभीर विषय उघडकीस आणला. तसेच किल्ल्याचे नाव ‘किल्ले वंदनगड’ असेच नाव राहिले पाहिजे, अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार वाई (जि. सातारा) वनपरिक्षेत्र अधिकारी एस्.एस्. मगर यांनी ‘वनविभागाकडून कधीही ‘किल्ले वंदनगडा’चे नाव पालटण्यात आले नाही आणि यापुढे पालटण्यात येणारही नाही’, अशी लेखी हमी पत्राद्वारे हिंदु जनजागृती समितीला दिली. या संदर्भात ‘धर्मांधांचा ‘पीर किल्ले वंदनगड करण्याचा डाव फसला आहे. छत्रपती शिवरायांचे गडकोड हा आपला स्वाभिमान, पराक्रम, शौर्य यांचे प्रतिक आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसणार्‍यांपासून सावध राहून धर्मांधांचे षड्यंत्र रोखले पाहिजे’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.

वाई तालुक्यामध्ये ‘किल्ले वंदनगड’ या ठिकाणी हिंदूंचे पुरातन शिवमंदिर आहे. गडाच्या पायथ्याशी असणार्‍या काही शिवप्रेमींनी या ठिकाणी भाविकांसाठी पत्र्याचे शेड उभारले होते. याविषयी काही धर्मांधांनी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार वाई वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली होती. या वेळी वनविभागाशी पत्रव्यवहार करताना धर्मांधांनी ‘किल्ले वंदनगडा’चा उल्लेख हेतुपुरस्सर ‘पीर किल्ले वंदनगड’, असा केला होता. ही गोष्ट हिंदु जनजागृती समितीला समजल्यानंतर याची दखल घेत समितीने याविषयी निवेदन दिले होते. या निवेदनात म्हटले होते की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अनेक गडकोट, दुर्ग बांधले. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत या गडकोटांचा मोलाचा वाटा आहे. हे गडकोट महाराष्ट्राचा अनमोल वारसा आणि ऐतिहासिक ठेवा आहेत. असे असतांना गडकोटांचे नाव जाणीवपूर्वक पालटून समाजात तणाव निर्माण करण्याचे काम काही धर्मांध आणि त्यांच्या षड्यंत्राला बळी पडत काही शासकीय विभागांतून होतांना दिसत आहे. वन विभागाने ‘किल्ले वंदनगडा’चा ‘पीर किल्ले वंदनगड’ असा उल्लेख करणे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे. ‘पीर किल्ले वंदनगड’ असा पत्रात उल्लेख का केला, याचा खुलासा वन विभागाने करावा अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याची चेतावणी समितीने दिली होती.

याबाबत वन विभागाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासकीय पत्रव्यवहारामध्ये कोणतेही पत्र किंवा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ‘जसाच्या तसा’ उल्लेख केला जातो. त्यामुळे तक्रार अर्जाच्या कार्यवाहीसाठी पत्रव्यवहारामध्ये ‘पीर किल्ले वंदनगड’ असा उल्लेख करण्यात आला होता, तसेच ‘यापुढे काळजी घेऊ’, असे अत्यंत बेजबाबदार उत्तरही वन विभागाच्या पत्रात दिले आहे. हा अक्षम्य बेजबाबदारपणा असून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही श्री. घनवट यांनी या वेळी केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *