पी.एफ्.आय. कार्यकर्त्यांकडून कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘मी बाबरी आहे’ असे लिहिलेल्या बिल्ल्यांचे वाटप
पठाणथिट्टा (केरळ) – येथील कट्टंगलमधील सेंट जॉर्ज शाळेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना ६ डिसेंबर या बाबरी ढाचा पाडल्याच्या दिनानिमित्त ‘मी बाबरी आहे’ असे लिहिलेले बिल्ले वाटले. याची नोंद घेत पोलिसांनी पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सेंट जॉर्ज माध्यमिक शाळेतील ‘पालक शिक्षक संघटने’नेही याविषयी तक्रार केली आहे. याखेरीज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी.के. कृष्णदास यांनीही ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’कडे तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, या शाळेतील विद्यार्थी हिंदु आणि ख्रिस्ती आहेत. त्यांच्यामध्ये द्वेष भावना वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
१. पोलिसांनी सांगितले की, शाळेच्या प्रवेशद्वारावर हे बिल्ले वाटण्यात येत होते. या विद्यार्थ्यांना त्यांच्या गणवेशावर हे बिल्ले लावण्यासाठी बाध्य करण्यात येत होते. याप्रकरणी पी.एफ्.आय.ची राजकीय संघटना असलेल्या ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या (एस्.डी.पी.आय.च्या) मुनीर नजर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चौकशीनंतर आवश्यकतेनुसार त्यांना अटक करण्यात येऊ शकते.
२. ‘कट्टंगल पंचायतीत एस्.डी.पी.आय.च्या पाठिंब्याने माकपचे शासन आहे. त्यामुळे गुन्हेगारांविरुद्ध पोलीस कारवाई करत नाहीत’, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे.