Menu Close

मंत्रोच्चारामुळे बुद्धी तीक्ष्ण होते, तणाव न्यून होतो आणि हृदयाचे ठोके नियंत्रणात रहातात ! – संशोधनाचा निष्कर्ष

मंत्रोच्चारांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या नास्तिकतावाद्यांना चपराक !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील ‘संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मधील ‘जैव-वैद्यकीय संशोधन केंद्रा’ने बेंगळुरूच्या ‘क्राईस्ट युनिव्हर्सिटी’तील मानसशास्त्र विभागाच्या सहकार्याने वैदिक मंत्रोच्चारावर संशोधन केले आहे. त्याप्रमाणे ‘लहानपणापासून वैदिक मंत्राचे पठण करणार्‍यांची बुद्धी सामान्य लोकांपेक्षा तीक्ष्ण असते, त्यांची स्मरणशक्ती, समजण्याची क्षमता आणि मानसिक संतुलनही अधिक चांगले असते. मंत्रोच्चार केल्याने तणाव न्यून होतो आणि मनात अनेक सकारात्मक पालट होतात, असे लक्षात आले आहे. मेंदूच्या संरचनेवर आधारित वैदिक मंत्रोच्चाराचा हा देशातील पहिला अभ्यास असल्याचा संशोधकांचा दावा आहे. त्यांच्या मते या संशोधनाचे मानसिक आणि मेंदूशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी पुष्कळ साहाय्य होणार आहे.

संशोधनामध्ये संस्कृत समजणार्‍या आणि बोलणार्‍या युवकांचा समावेश

या संशोधनामध्ये काही मुलींसमवेत २१ ते २८ वयोगटातील ५० युवकांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी २५ युवकांनी अनुमाने ९ ते ११ वर्षे शासकीय गुरुकुलामध्ये चारही वेदांचे सतत अध्ययन केले असून ते प्रतिदिन वेदमंत्रांचे पठण करतात. त्यांचे अनुमाने २० सहस्र मंत्र आणि श्लोक तोंडपाठ आहेत. ते सर्वजण संस्कृत वाचतात, लिहितात आणि बोलतात.

दुसर्‍या गटात संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषा समजणारे; पण नियमितपणे मंत्रोच्चार न करणारे अशा २५ युवकांना सहभागी करून घेण्यात आले. या तरुणांच्या मानसिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले. समुपदेशनानंतर ‘एम्आयआर्’च्या साहाय्याने प्रत्येकाचे ‘ब्रेन मॅपिंग फंक्शनल’ करण्यात आले. संशोधकांनी या माहितीचे मूल्यांकन केले. संशोधकांच्या मते मंत्रोच्चार करणार्‍यांच्या मेंदूची स्मरणशक्ती सामान्यहून अधिक आढळून आली. त्याच वेळी त्यांच्या न्यूरॉन्सची (चेतापेशीची) जाडी अधिक असते, जी मेंदूपर्यंत वेगाने संदेश पोचवते आणि या लोकांमध्ये सामान्यांच्या तुलनेत आठवणीही अधिक असतात.

मंत्रोच्चार करणार्‍यांच्या तणावाची पातळी अल्प असल्याने ते पुष्कळ आनंदी असतात !

हरिद्वार येथील ‘ब्रह्मवर्चस संशोधन संस्थे’त विज्ञान आणि अध्यात्म यांच्या एकत्रीकरणासाठी वैदिक मंत्रांवर संशोधन केले जात आहे. महिला आणि पुरुष यांच्यावर मंत्रांचा काय परिणाम होतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न येथील संशोधक करत आहेत. वैदिक मंत्रांचा मानवी शरिरावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी ९ दिवसांचा आलेख सिद्ध करण्यात आला आहे. त्यात पहिल्या दिवसापासून ९ दिवसांपर्यंत मंत्र आणि साधनेसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

अभ्यासामध्ये सहभागी असलेल्या महिला आणि पुरुष यांच्या शरिरातील ऊर्जेची पातळी यंत्राने तपासली जाते. आतापर्यंत मिळालेल्या परिणामांप्रमाणे जे लोक मंत्रजप करतात, त्यांच्यात तणावाची पातळी अल्प असते आणि ते पुष्कळ आनंदी असतात. त्यांची स्मरणशक्ती आणि आठवण्याची क्षमताही चांगली असते. दुसरीकडे नियमितपणे मंत्र ऐकल्याने रक्तदाब, हृदयाची गती, मेंदूच्या लहरी आणि अँड्रेनालाईन (भीती) पातळी या गोष्टी नियंत्रित होतात.

मंत्रोच्चाराचा व्यक्तीवर होतो सकारात्मक प्रभाव !

हरिद्वार येथील ‘देव संस्कृती विद्यापिठा’च्या संस्कृती विभागाचे प्रमुख राधेश्याम चतुर्वेदी यांच्या मते ‘ओम्’चा नाद संपूर्ण विश्वात गुंजतो. तो नाद कुणीही बनवला नाही, ना त्याला कुणी नष्ट करू शकत. ‘ओम’चा जप केल्याने व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. संशोधनाप्रमाणे श्लोक आणि मंत्रपठण करतांना श्वासाच्या गतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूला संदेश पाठवणार्‍या न्यूरॉन्समध्ये हळूहळू पालट होत जातात, जे काही काळानंतर कायमस्वरूपी होतात. त्यामुळे मेंदू अधिक सक्रीयपणे काम करू लागतो.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *