‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ आणि हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात संत, लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना संपर्क !
पुणे – धर्म, अध्यात्म, तसेच साधना यांत रुची निर्माण व्हावी, मुलांवर सुसंस्कार व्हावेत, तसेच समाज धर्मपरायण व्हावा, या उद्देशांनी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवले जात आहे. याअंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्या संपर्क अभियानाच्या वेळी लोकप्रतिनिधी, उद्योजक, तसेच धर्म आणि अध्यात्म यांविषयी आस्था असणारे हिंदुत्वनिष्ठ यांची भेट घेऊन त्यांना ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची माहिती दिली. या वेळी लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी परिसरातील शाळा, महाविद्यालये, वाचनालये आदी ठिकाणी सनातनच्या ग्रंथांचे संच ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे, तसेच आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ग्रंथ भेट देण्याची सिद्धता दर्शवली. चित्रपट, नाटके, वेब सिरीज आदी माध्यमांतून होणारे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी कायदा करण्याविषयी विधानसभेच्या अधिवेशनात विषय मांडण्याची सिद्धता दर्शवली.
लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा सकारात्मक प्रतिसाद !१. भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार श्री. संग्राम थोपटे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. संपर्काच्या वेळी त्यांना महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय आणि राष्ट्रीय हिंदु अधिवेशन यांची माहिती देणारी चलचित्रफीत दाखवून सविस्तर विषय सांगितला, तसेच त्यांना महाविद्यालयांच्या वाचनालयासाठी ग्रंथ संच घेण्याचे सुचवले, तेव्हा त्यांनी याविषयी सकारात्मकता दर्शवली. २. पुण्यातील भाजपच्या आमदार सौ. मुक्ता टिळक यांना समितीच्या कार्याची विस्तृत माहिती देऊन समितीच्या ‘गडकिल्ले रक्षण’ मोहिमांविषयी अवगत करण्यात आले. ३. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विश्व हिंदु परिषदेचे श्री. अतुल सराफ, डुडुळगाव येथील श्री. रमेश वहिले, सांगावी येथील नगरसेवक श्री. शंकर जगताप, वारकरी संप्रदायाचे श्री. रामदास पडवळ, श्री. नंदकुमार भसे, कुरुंजाईमाता देवस्थान ट्रस्टचे श्री. विजय शिळीमकर, तळेगाव येथील बांधकाम व्यावसायिक श्री. रामदास काकडे आदींना समितीच्या कार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली असता सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. ४. समितीच्या वतीने कात्रज येथील आयुर्वेदाचार्य स्वानंद पंडित यांनी जिज्ञासेने समितीचे सर्व कार्य जाणून घेतले. तसेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात येणार्या आध्यात्मिक संशोधन, १४ कला ६४ विद्या या माध्यमातून ईश्वरप्राप्ती, अध्यात्मप्रसार यांविषयी व्यापक कार्याची माहिती दिल्यावर ते प्रभावित झाले आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. |
हलाल अर्थव्यवस्थेविरोधात कृती करण्यासाठी उद्युक्त झालेले उद्योजक आणि हिंदुत्वनिष्ठ !
१. उद्योजक श्री. राजेंद्र लुंकड यांनी हलालची भयावहता सर्वांपर्यंत पोचावी, या तळमळीतून लगेचच त्यांचे परिचित उद्योजक आणि प्रतिष्ठित यांच्यासाठी एक बैठक आयोजित केली. या बैठकीत उपस्थित सर्वांनी संघटित होण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी उद्योजक श्री. दिलीप मेहता यांनी यासंदर्भात हिंदूंच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून शासनदरबारी पोचवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी जैन समाजाचे मुख्य संघटक श्री. अचल जैन, त्यांचे मोठे बंधू श्री. जैन, श्री. रमेश राठोड, श्री. नरेंद्र बोरा, श्री. उगम आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचे व्यापक स्तरावर चाललेले कार्य समजून घेण्यासाठी त्यांची पत्नी आणि सून सहभागी झाल्या होत्या. श्री. राजेंद्र लुंकड यांची त्यांच्या डॉक्टरांशी पूर्वनियोजित भेट असतांनाही त्यांनी ती पुढे ढकलून बैठकीसाठी वेळ दिला. पुढीलप्रकारे सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अ. ज्ञानशक्ती प्रसार अभियानाबद्दल सांगितलेल्या सुत्रावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी ग्रंथ घेवून सोसायटीच्या सभागृहात ग्रंथालय चालू करणार.
आ. दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक चालू करणार.
इ. लव्ह जिहादविषयी बैठक घेऊन महिलांसाठी अवगत करणार.
२. बिबवेवाडी येथील भाजपच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्री. महेंद्र व्यास यांनी हलाल विषयासंदर्भात जागृती करण्यासाठी व्यापार्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. श्री. सुनील घनवट यांनी त्यांना जिहादचे विविध प्रकार, मंदिर सरकारीकरण, प्रतिवर्षी गोवा येथे होणारे राष्ट्रीय हिंदु अधिवेशन याविषयी अवगत करून आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
३. केडगाव येथील डॉ. नीलेश लोणकर यांनी त्यांच्या परिचयातील धर्मप्रेमी आणि व्यापारी यांसाठी हलालच्या दुष्परिणामांविषयी बैठक आयोजित केली.
४. ‘सिंहगड युवा प्रतिष्ठान’चे श्री. महेश पवळे यांना समितीच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच ‘विशाळगड’ मोहिमेची चित्रफीत दाखवून गड किल्ल्यांच्या संदर्भात समिती राबवत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
या वेळी आमदार श्री. टिंगरे यांनी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ ग्रंथालयांना देण्याविषयी प्रयत्न करून पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी महापौरांनी ‘महानगरपालिकेच्या क्षेत्रात ग्रंथ पोचवण्यासाठी प्रयत्न करता येतील’, असे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रतिष्ठितांचे अभिप्राय१. केळवडे, नसरापूर येथील शिवसेनेचे कुलदीप तात्या कोंडे यांनी ग्रंथांचे संच प्रायोजित करणार आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी प्रयत्न करणार, असे सांगितले. २. पुणे कॅन्टोन्मेंट (कॅम्प) परिसरातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी कार्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले. ‘विशाळगड रक्षण’ मोहिमेच्या संदर्भात माहिती सांगतांना त्यांनी ‘हा विषय सर्वांना समजायला हवा’, या उद्देशाने त्यांच्या कार्यकर्त्यांनाही बोलावले. |
प्रतिष्ठितांचा कृतीशील सहभाग१. सातारा रस्ता येथील डॉ. खंडागळे यांनी सनातनच्या ग्रंथांचे संच वितरित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डॉ. खंडागळे यांनी एका कार्यक्रमात उपस्थित १०० जणांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले. २. भोसरी येथील धर्मप्रेमी आणि बांधकाम व्यावसायिक श्री. दिनेश शेडगे यांनी ग्रंथांचा एक संच स्वतःसाठी घेतला, तसेच मित्रांनाही या अभियानात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणार असल्याचे सांगितले. |
हिंदुत्वनिष्ठ लेखकांचा सकारात्मक प्रतिसाद !हिंदुत्वनिष्ठ लेखक डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी त्यांच्या नियतकालिकात हलालविषयीचे प्रबोधनपर लेख छापण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. त्यांना ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या कार्यक्रमाला झालेला विरोध आणि समितीने त्यासंदर्भात केलेले प्रयत्न याविषयी ‘पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन’ दाखवून सविस्तर माहिती देऊन ‘विशाळगड रक्षण’ मोहिमेविषयी अवगत केले. या वेळी त्यांना ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ हा ग्रंथ आणि ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. ‘आत्मघातकीय दहशतवाद’ या पुस्तकाच्या लेखिका सौ. रूपाली भुसारी, ‘तप्तपावन अग्नीदिव्य’ या ग्रंथाच्या लेखिका कु. ऐश्वर्या अभ्यंकर (वय १० वर्षे), ‘महाराष्ट्राची शोधयात्रा’ या ग्रंथाचे लेखक श्री. अनुराग वैद्य, ‘गजापूरचा रणसंग्राम’ या ग्रंथाचे लेखक श्री. शंतनु परांजपे यांची श्री. सुनील घनवट यांनी भेट घेऊन हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. |
अन्य विशेषमंदिर सरकारीकरणाच्या विरोधात सुप्रसिद्ध बनेश्वर मंदिर येथे मंदिराच्या विश्वस्तांमध्ये जागृती !नसरापूर येथील श्री बनेश्वर मंदिर येथे ‘श्री बनेश्वर महादेव ट्रस्ट’चे सचिव श्री. अनिल गयावळ, उपाध्यक्ष श्री. तात्या कदम, विश्वस्त श्री. आबा यादव आणि श्री. भाऊ जंगम यांच्या समवेत बैठक झाली. या वेळी श्री. घनवट यांनी ‘मंदिरांचे सरकारीकरणाच्या माध्यमातून देवनिधीची कशी लूट केली जात आहे ?’, हे सांगितले. मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात समिती करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या वेळी विश्वस्तांनी मंदिरात धर्मशिक्षणविषयक फलक लावण्याचे आश्वासन दिले. त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. |