आदिवासींना धर्मांतरापासून वाचवणारे स्वामी असिमानंद यांचा आरोप
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – हिंदु वनवासी, आदिम जाती-जमाती यांना धर्मांतरीत होण्यापासून आम्ही थांबवले. ते हिंदु धर्मातच रहावेत यासाठी प्रयत्न केले. ‘हिंदु आतंकवाद’ असा कोणताही प्रकार नसतांना खोटे षड्यंत्र रचून आम्हाला विविध प्रकरणांत गुंतवून तत्कालीन सरकारने हिंदु समाजावर अन्याय केला होता; मात्र आम्ही सर्व न्यायालयांमध्ये निर्दाेष मुक्त झालो आहोत. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आम्ही या लोकांची सेवा करत आहोत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे उद्गार स्वामी असिमानंद यांनी काढले. ते पंढरपूर वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी त्यांनी हिंदू महासभा भवनलाही सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी हिंदुमहासभेचे नेते अभयसिंह कुलकर्णी इचगावकर, विवेक बेणारे, बाळासाहेब डिंगरे, महेश खिस्ते, वनवासी कल्याण आश्रमाचे सुरेश कुलकर्णी, विठ्ठल बडवे, महंत मोहन महाराज नेर्लेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रथम असिमानंद यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे यांच्या प्रतिमांचे पूजन केले. असिमानंद पुढे म्हणाले की, या देशातील काही निधर्मी लोकच या देशाची खरी समस्या आहेत, हे आता हिंदूंना हळूहळू समजू लागले आहे. एक दिवस सर्व हिंदूंना हे समजले, तर देशातील अनेक समस्या समाप्त होतील.