Menu Close

कुन्नूर (तमिळनाडू) येथे सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ‘सी.डी.एस्.’ जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू

(डावीकडे) ‘सी.डी.एस्.’ जनरल बिपीन रावत (उजवीकडे) अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष

कुन्नुर (तमिळनाडू) – भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असलेले जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे सैन्याचे ‘एम्.आय. १७ व्ही ५’ हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर येथील नीलगिरीच्या डोंगरावर कोसळून त्याला आग लागल्याने त्यातील रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. यात रावत यांच्या पत्नीचाही समावेश आहे. या अपघातात ४ जण घायाळ झाले होते. त्यांच्यावर घटनास्थळापासून ९ किलोमीटर अंतरावर असणार्‍या वेलिंग्टन सैन्यतळावरील रुग्णालयात उपचार चालू असतांना त्यांतील तिघांचा मृत्यू झाला. एकावर अद्याप उपचार चालू आहेत. बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या ‘डिफेंस स्टाफ कॉलेज’मध्ये जात होते. मृत्यू झालेल्यांचे मृतदेह आगीमुळे ८० टक्के होरपळले असून त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्यांची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करून ओळख पटवण्यात येणार आहे.

१. हे हेलिकॉप्टर तमिळनाडूतील सुलूर येथून कुन्नुर येथे जात असतांना दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. या अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी वाईट हवामान आणि धुके यांमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सैन्याकडून या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या अपघाताविषयी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या, ९ डिसेंबर या दिवशी संसदेत अधिकृत माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल बिपीन रावत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

 

२. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर घटनास्थळी बचावकार्य चालू करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने हेलिकॉप्टरला लागलेली आग दीड घंट्यांच्या प्रयत्नानंतर विझवण्यात आली. हा भाग डोंगराळ असल्याने तेथे पोचण्यात अडचणी येत होत्या.

३. या घटनेतील जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल्.एस्. लिद्दर, लेफ्टनंट के. हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नायक बी. साई तेजा आणि हवालदार सतपाल ही नावे अधिकृतपणे सांगण्यात आली आहे.

जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (तिन्ही सैन्यदलांचा प्रमुख) !

जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ होते. त्यांनी १ जानेवारी २०२० या दिवशी हे पद स्वीकारले. जनरल रावत यांनी ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ या काळात सैन्यदलप्रमुखपद भूषवले होते. त्यांच्या सैन्यदलप्रमुख पदाच्या काळातच पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला होता.

बिपीन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ मध्ये डेहराडून येथे झाला होता. रावत यांचे वडील एल्.एस्. रावत हेही लेफ्टनंट जनरल होते. बिपीन रावत यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यातील ‘सेंट एडवर्ड स्कूल’मध्ये झाले. त्यानंतर बिपीन रावत यांनी ‘इंडियन मिलिटरी अकादमी’मध्ये प्रवेश घेतला. या अकादमीतील त्यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ हे पहिले सन्मानपत्र मिळाले. त्यानंतर बिपीन रावत यांनी अमेरिकेत ‘सर्व्हिस स्टाफ कॉलेज’मध्ये पदवी प्राप्त केली. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर ते सैन्यात भरती झाले. त्यांची भारतीय सैन्याच्या ‘गोरखा रायफल्स’च्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा नेमणूक करण्याच आली. त्यांनी सैन्याच्या अनेक पदांवर काम केले. या काळात बिपीन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यात परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, अतीविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदक यांचा समावेश आहे.

‘एम्.आय. १७ व्ही ५’ या अत्याधुनिक हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये !

‘एम्.आय. १७ व्ही ५’ हेलिकॉप्टर

‘एम्.आय. १७ व्ही ५’ हेलिकॉप्टर हे जगातील अत्याधुनिक हेलिकॉप्टर मानले जाते. यांचे अपघात होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. वर्ष २०१२ या हेलिकॉप्टरचा भारतीय सैन्यादलात समावेश केल्यापासून एक अपघात झालेला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासाठीही याच  हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. सैनिक आणि अधिकारी यांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी याचाच वापर केला जातो. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचे आहे. भारतीय वायूदल ‘एम्.आय.’ मालिकेतली अनेक हेलिकॉप्टर वापरत आहे. वर्ष २००८ मध्ये संरक्षणमंत्रालयाने अशी ८०  हेलिकॉप्टर विकत घेण्याचा करार केला होता. एका हेलिकॉप्टरची किंमत १२१ कोटी रुपये आहे.

अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमधून २ – ३ जण बाहेर पडले ! – प्रत्यक्षदर्शीची माहिती

कृष्णासामी या व्यक्तीने हे हेलिकॉप्टर पडतांना पाहिले. त्याने सांगितले की, अचानक एक मोठा आवाज आला. यामुळे मी घरातून बाहेर आलो, तेव्हा एक हेलिकॉप्टर एका झाडावर आदळून नंतर दुसर्‍या झाडावर आदळले आणि पेटले. जेव्हा ते आदळत होते, तेव्हा त्याला आग लागली होती. याच वेळी २ – ३ जण त्या हेलिकॉप्टरमधून उडी मारत होते. त्या सर्वांचे शरीर आगीने वेढलेले होते.

या शूरवीरांच्या आत्माला शांती लाभावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि समवेतच्या लष्करी अधिकार्‍यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला आहे. या शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी, तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्दैवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !


जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन ही अतिशय दुर्दैवी घटना !

शत्रूराष्ट्राने घातपात घडवून आणल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे लागेल ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

पुणे – भारतीय सैन्याचे सर्वांत मोठे अधिकारी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सी.डी.एस्.) जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. बिपीन रावत यांचे वडील ‘११ गोरखा रायफल्स् बटालियन’मध्ये होते. ते त्यामध्ये सहभागी झाले होते. यावरून त्यांचे देशप्रेम दिसून येते. त्यांचे संपूर्ण सैनिकी जीवन भारत-पाक सीमा, भारत-चीन सीमा, ईशान्य भारत सीमा अशा अतीसंवेदनशील ठिकाणी व्यतीत झाले आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक शौर्यपदकांनी सन्मानित करण्यात आले. वर्ष २०१६ मध्ये ‘सैन्यदलप्रमुख’ (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) झाल्यानंतर कठीण काळात सैन्याचे उत्कृष्ट नेतृत्व करणारे जनरल रावत होते. अनेक तथाकथित तज्ञ, स्वघोषित मानवाधिकार कार्यकर्ते यांचा विरोध झुगारून त्यांनी बाणेदारपणे कार्य केले.

कोणतीही ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटना होण्यामागे यांत्रिकी बिघाड, परिस्थितीजन्य, वैमानिकाची चूक आणि हवामान पालट ही ४ प्रमुख कारणे असतात. यात ‘शत्रूराष्ट्राने घातपात घडवून नाही आणला ना ?’, याची माहिती आपल्याला पुढील चौकशीत मिळेल. जर तसे असेल, तर आपण शत्रूराष्ट्राला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे लागेल. शत्रूराष्ट्रांना मवाळ भाषा कळत नाही. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ झिया उल् हक यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर हा अपघात अमेरिकेची गुप्तहेर संस्था ‘सीआयए’ हिने घडवून आणल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे असे घातपात केले जाऊ शकतात. आता ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’चा पदभार तातडीने दुसर्‍या सक्षम अधिकार्‍याला सोपवण्यात येईल; कारण हे पद रिक्त असणे देशाच्या सुरक्षेसाठी हानीकारक ठरू शकते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *