बिपिन रावत यांच्यानंतर त्याच क्षमतेचे नवीन नेतृत्व देशाला मिळेल ! -ब्रिगेडियर हेमंत महाजन
भारताचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सी.डी.एस्.) जनरल बिपिन रावत यांनी तिन्ही दलाचे एकत्रिकरण करून देशाच्या आंतर-बाह्य शत्रूंच्या विरोधात एक प्रभावी यंत्रणा तयार केली होती. उरी, म्यानमार आणि डोकलाम येथे यशस्वी सैन्य कारवाई केली होती. त्यांच्या चालू असलेल्या प्रयत्नांमुळे येत्या दोन-अडीच वर्षांत देशाच्या सर्व अडचणी दूर झाल्या असत्या; मात्र त्यांच्या अकाली जाण्यामुळे त्यावर परिणाम झाला असला, तरी सी.डी.एस्. रावत यांच्यानंतर त्याच क्षमतेचा, अभ्यासू, तज्ञ, अनुभवी, कौशल्य असलेला नवीन सैन्याधिकारी सी.डी.एस्. पदावर निवडला जाईल आणि तो त्यांचे राहिलेले कार्य यशस्वीपणे पुढे नेईल. भारताच्या पुढील कार्यावर विपरित परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे प्रतिपादन युद्ध सेवा पुरस्कार प्राप्त तथा (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘बाह्य शत्रू आणि अंतर्गत देशद्रोही यांच्यापासून भारताची सुरक्षा’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.
या वेळी संवादामध्ये बोलतांना सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पृथ्वी चौहान म्हणाले की, सी.डी.एस्. बिपिन रावत हे ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत तिन्ही सैन्य दलाचे सक्षमीकरण करत होते. अडीच आघाड्यांवर म्हणजे एक मोर्चा पाकविरोधात, दुसरा मोर्चा चीनविरोधात आणि अर्धा मोर्चा देशद्रोह्यांच्या विरोधात ते लढत होते. जिहादी नेत्यांना घरात घुसून मारले जात होते. त्यामुळे रावत यांच्या निधनावर जिहादींना आनंद होत आहे; मात्र देशप्रेमींनी एकत्र येऊन त्यांना उत्तर द्यायला हवे.
‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर म्हणाले की, सी.डी.एस्. बिपिन रावत यांच्या निधनावर आनंद व्यक्त करणारे जे जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत. ते पूर्वी सैन्यदलावर बलात्काराचे, काश्मीरमधील वाट चुकलेल्या तरुणांना ठार मारत असल्याचे आरोप करून त्यांचे खच्चीकरण करायचे. त्यांच्या जोडीला कम्युनिस्ट, चीनसमर्थक, आतंकवादी आणि फुटीरतावादी लोक विविध वृत्तवाहिन्यांवर चर्चा करून सैन्याचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करत होते. जे सैन्य स्वत:चे जीवन धोक्यात घालून देशाचे रक्षण करत आहे, त्याविषयी अवमानकारक बोलणे चुकीचे आहे.
हिंदु जनजागृती समितीचे मध्य प्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया म्हणाले की, आता युद्धात बदल झाला आहे. त्यामुळे सीमेवरील शत्रूंसह अंतर्गत देशद्रोह्यांशी सैन्याला लढावे लागत आहे. त्रिपुरामध्ये झालेल्या घटनांवरून महाराष्ट्रात 6 ठिकाणी धर्मांधांनी दंगली केल्या. पुढे अशा घटना आणखीन वाढतील. या अराजकता वाद्यांबरोबर देशवासियांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सैन्याचा अपमान आणि देशाच्या विरोधात लढणार्या अंतर्गत शत्रूंवर कठोर कारवाईसाठी केंद्रशासनाने नवीन कायदा केला पाहिजे. तसेच सर्व देशप्रेमींनी एकत्र येऊन या देशद्रोह्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे, असेही श्री. जाखोटिया म्हणाले.