Menu Close

काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्‍वनाथ धामचे भावपूर्ण वातावरणात लोकार्पण

  • गंगानदीमध्ये स्नान करून गंगाजल घेऊन काशी विश्‍वनाथाची केली पूजा !

  • काशीचे कोतवाल श्री कालभैरावाचे घेतले दर्शन !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची शक्ती दाखवून देतात. इंग्रजांच्या काळातदेखील काशीच्या लोकांनी वॉरेन हेस्टिंग याचे काय हाल केले, हे येथील लोकांना ठाऊक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्‍वनाथ धामचे लोकार्पण केल्यानंतर केले.
लोकार्पणाच्या वेळी शेकडो साधू, संत, महंत, तसेच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या, दिनेश शर्मा आदी उपस्थित होते. लोकार्पण करतांना पंतप्रधान मोदी यांनी गंगानदीमध्ये स्नान करून गंगाजल घेऊन श्री काशी विश्‍वानथ मंदिरात जाऊन विधीवत् पूजा केली. काशी विश्‍वनाथ धाममध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी येथील श्री कालभैरव मंदिरात पूजा-अर्चा केली. त्या वेळी लोकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तेथून पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगानदीमधील अलकनंदा या क्रूझच्या माध्यमांतून काशी विश्‍वनाथ धाम येथील ललिता घाटावर गेले.

सायंकाळी पंतप्रधान मोदी हे दशाश्‍वमेध घाटावरील गंगानदीच्या आरतीला उपस्थित होते. १४ डिसेंबरला होणार्‍या भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्‍वनाथ धामचे भावपूर्ण वातावरणात लोकार्पण

मोदी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मांडलेली सूत्रे

विनाश करणार्‍यांची शक्ती भारताच्या शक्ती-भक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही !

प्रत्येक भारतियाच्या हातांमध्ये अकल्पनीय असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची शक्ती आहे. आम्हाला तप आणि तपस्या ठाऊक आहे. आम्हाला देशासाठी रात्रंदिवस कष्ट करायचे ठाऊक आहे. आव्हाने कितीही मोठी असेना, आम्ही भारतीय ती पेलू शकतो. विनाश करणार्‍यांची शक्ती कधीही भारताच्या शक्ती आणि भक्ती यांच्यापेक्षा मोठी असू शकत नाही. ज्या दृष्टोकोनातून आपण जगाकडे पहातो, त्याच दृष्टीकोनातून जग आपल्याकडे पहाते, हे लक्षात ठेवा.

भारत गुलामगिरीच्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे !

अनेक वर्षांच्या गुलामगिरीने आपल्यावर परिणाम केला होता. भारताला हीन भावनेने भरून टाकले होते; मात्र आजचा भारत त्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे. आजचा भारत केवळ श्री सोमनाथ मंदिराचे सौंदर्यीकरणच करत नाही, तर समुद्रात सहस्रो किलोमीटर ‘ऑप्टिकल फायबर’देखील पसरवत आहे. आजचा भारत श्री केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धारच करत नाही, तर स्वतःच्या हिमतीवर अंतराळात भारतियांना पाठवण्याच्या सिद्धतेत आहे. आजचा भारत केवळ अयोध्येत प्रभु श्रीरामांचे मंदिरच बनवत नाही, तर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयही बनवत आहे.

पालखी मार्गांचेही काम चालू !

पंढरपूर येथील भगवान विठ्ठलाच्या कोट्यवधी भक्तांच्या आशीर्वादाने संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम यांच्या पालखी मार्गांचेही काम काही आठवड्यांपूर्वी चालू झाले आहे.

स्वच्छता, सृजनशिलता आणि आत्मनिर्भर भारत यांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे वचन द्या !

पंतप्रधान मोदी लोकार्पणानंतर बोलतांना म्हणाले की, ‘स्वच्छता, सृजनशिलता आणि आत्मनिर्भर भारत यांसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न कराल’, अशी ३ वचने तुम्ही मला द्या.

काशी विश्‍वनाथ धामची वैशिष्ट्ये

१. श्री काशी विश्‍वनाथाचे मंदिर आता थेट गंगानदीशी जोडले गेले आहे. जलासेन, मणिकर्णिका आणि ललिता या घाटांवर गंगानदीत स्नान करून भाविकांना थेट मंदिरात प्रवेश करता येणार आहे.

२. येथे ३ ‘यात्री सुविधा केंद्रां’मध्ये भाविकांना त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्याची, बसण्याची आणि आराम करण्याची सुविधा मिळणार आहे.

३. २ मजली इमारत सांस्कृतिक उपक्रमांसाठी बनवण्यात आली आहे.

४. भाविकांसाठी योग आणि ध्यान केंद्र स्वरूपात ‘वैदिक केंद्र’ स्थापित करण्यात आले आहे.

५. या धामच्या परिसरात बाहेरून येणार्‍या भाविकांसाठी धार्मिक ग्रंथांचे ‘अध्यात्मिक ग्रंथ केंद्र’ हे नवे केंद्र असणार आहे.

६. भक्तांसाठी प्रसादलाय निर्माण करण्यात आले आसून येथे  १५० भाविक एकत्र बसून प्रसाद ग्रहण करू शकतील, अशी व्यवस्था आहे.

७. काशी विश्‍वनाथ धाममध्ये ‘मुमुक्षु भवन’ बांधण्यात आले आहे.

८. काशी विश्‍वनाथ धाममध्ये प्रवेश करण्यासाठी ४ महाकाय दरवाजे बनयण्यात आले आहेत.

९. सुरक्षेसाठी अत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून संपूर्ण धाम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

१०. या धाममध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधांपासून ते रुग्णवाहिकेपर्यंतची व्यवस्था करण्यात येणार आहे.

११. एक जिल्हा – एक उत्पादन दुकान, हस्तकला वस्तूंची दुकाने आणि खाद्यपदार्थांची दुकाने हीदेखील उभारण्यात आली आहेत.

१२. या परिसरात महादेवाचे आवडते रुद्राक्ष, बेल, पारिजात वनस्पती, तसेच अशोक यांची झाडे लावण्यात येत आहेत.

१३. काशी विश्‍वनाथ धाममध्ये वृद्धांच्या सोयीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. धाममध्ये ‘एस्केलेटर’सारख्या (सरकत्या जीन्यांसारख्या) अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *