Menu Close

भाजप शासनाने सत्तेसाठी मातृभाषेचा सौदा करून विश्‍वासघात केला ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

  • गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍नी भाभासुमंची साखळी येथे सभा !

  • सभेस ३ सहस्र ५०० मातृभाषाप्रेमींची उपस्थिती !

subhash_velingkarसाखळी : भाजप शासनाच्या भूलथापांवर विश्‍वास ठेवल्यामुळे आम्ही फसलो गेलो आहोत. त्यांनी सत्तेसाठी मातृभाषेचा, तसेच आईच्या अब्रूचा सौदा केला, असा घणाघाती आरोप भाभासूमंचे ज्येष्ठ नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी येथे केले.

इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे अनुदान रहित करण्याच्या मागणीसीठी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या (भाभासुमंच्या) वतीने वसंतनगर, साखळी येथील वैश्य भवनाजवळील मैदानात ३० एप्रिल या दिवशी सभेचे आयोजन करण्यात आले होते. साखळी मतदारसंघातील भाजपचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांचा हा मतदारसंघ आहे.

प्रा. वेलिंगकर पुढे म्हणाले, शासनाने विश्‍वासघात केल्यामुळे ३ वर्षांनंतर आम्हाला पुन्हा आंदोलन उभारावे लागले. आता या सत्तांध राजकर्त्यांनी भाभासुमं आणि माझ्यावर वयैक्तिक स्तरावर आरोप करण्यास प्रारंभ केला आहे. यावर राज्यकर्त्यांनी प्रायश्‍चित्त घेतले पाहिजे. आम्ही येथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही.

निर्णय मागे न घेतल्यास भाजपला धडा शिकवू ! – अधिवक्त्या स्वाती केरकर,  महिला प्रमुख, भाभासुमं

sabha_lok
सभेला उपस्थित जनसमुदाय

शासनाने साखळी येथील रवींद्र भवनाची जागा ऐनवेळी कशी नाकारली, याविषयी पुराव्यासहित माहिती अधिवक्त्या सौ. स्वाती केरकर यांनी उपस्थितांसमोर मांडली. सौ. स्वाती केरकर म्हणाल्या, मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेणे हा जागतिक सिद्धांत आहे. नागालॅण्ड, मिझोरम ही राज्ये सोडून अन्य कुठल्याही राज्यात प्राथमिक शिक्षणाला अनुदान दिले जात नाही. नागालॅण्ड, मिझोरम या राज्यांना स्वत:ची प्रगत भाषा नाही; मात्र गोव्यात मराठी आणि कोकणी या भाषा आहेत. भाऊसाहेब बांदोडकर यांनी चालू केलेल्या शाळा भाजप शासनाच्या अल्पसंख्यांकधार्जिण्या धोरणामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. डायोसेसन संस्थेच्या इंग्रजी शाळेमध्ये शिकणारे २९ सहस्र विद्यार्थी मायभाषेला मुकले आहेत. हे शासनाचे पाप आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर भाजपला धडा शिकवू.

अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी बहुसंख्यांकांवर अन्याय ! – स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली

श्री. नागेश करमली म्हणाले, गोव्याच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आम्ही या आंदोलनात उतरलो आहोत. अल्पसंख्यांक म्हणून फसवू नका. केवळ चर्चसंस्थेच्या शाळा सांभाळण्यासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत, हे जनतेला सांगा. राज्यकर्ते अल्पसंख्यांकांना सांभाळण्यासाठी ७० टक्के बहुसंख्यांकांवर अन्याय करत आहेत. भाभासुमंच्या आंदोलनामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. गोव्याच्या स्वांतत्र्यासाठी अनेक लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे. केरळ, तमिळनाडू, छत्तीसगड येथील ख्रिस्ती वेगळ्या भाषेची मागणी कधीच करत नाहीत, मग गोव्यातील ख्रिस्ती समाज वेगळी मागणी का करत आहे ? हे धर्मांध लोक आहेत. हे समाजात फूट पाडू पहात आहेत. आम्ही असे होऊ देणार नाही. प्राण गेला, तरी आम्ही गोव्याचे अराष्ट्रीयीकरण होऊ देणार नाही.

चीन, रशिया, फ्रान्स आदी देशांत तेथील मातृभाषेतून शिक्षण असतांना गोव्यात का नको ? – पुंडलिक नायक, साहित्यिक

पुंडलिक नायक यांनी भाभासुमंच्या सभेत आडकाठी आणणारे भाजपचे आमदार प्रमोद सावंत, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आदी नेत्यांवर प्रखर टीका केली. पुंडलिक नायक म्हणाले, चीन, रशिया, फ्रान्स आदी देशांत तेथील मातृभाषेतून शिक्षण दिले जाते; मात्र गोव्यात मातृभाषेतून शिक्षण का नको ? शशिकला काकोडकर यांनी मुख्यमंत्री असतांना इंग्रजी शाळांना अनुदान नाकारले होते. तशीच धडाडी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दाखवायला हवी. प्रारंभी प्रास्ताविकात प्रा. रत्नाकर लेले म्हणाले, धर्माप्रमाणे वर्तन न करणार्‍या सत्तांध सत्ताधार्‍यांना दंड देण्याचा अधिकार लोकांना आहे. सर्व भाषाप्रेमींनी शासनाला त्याची जागा दाखवावी.

इंग्रजी शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा विचार करणारे संरक्षणमंत्री प्राथमिक शिक्षण घेणार्‍या १ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणार आहेत का ? – श्री. अरविंद भाटीकर

निवृत्त सनदी अधिकारी अरविंद भाटीकर म्हणाले, राजकारण्यांना मातृभाषेच्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडा. इंग्रजी शाळांना देण्यात येणारे अनुदान मागे घेतल्यास त्यांत शिकणार्‍या २९ सहस्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय होणार ?, असा प्रश्‍न उपस्थित करणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर राज्यात प्राथमिक शिक्षण घेणार्‍या १ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणार आहेत कि नाही ? माध्यमप्रश्‍नी पर्रीकर यांनी दुतोंडीपणा करू नये. काँग्रेसने अनुदान देऊन केलेली चूक सुधारू शकत नाही, असे म्हणणार्‍या मुख्यमंत्र्यांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही.

या वेळी अरविंद भाटीकर म्हणाले, सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी इंग्रजी शाळांचे अनुदान कायम ठेवले असून भाभासुमं सलोखा बिघडवत आहे, असा आरोप आमच्यावर केला जात आहे. तथापि भाभासुमं सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्याची मागणी करत आहे. शैक्षणिक क्षेत्रात ख्रिस्ती आणि हिंदु, असा भेद का केला जात आहे ?

सभेत इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. या भाषणांमध्ये पुढील सूर उमटला, गोव्यात कोणत्याही पक्षाचे शासन असो ते आर्चबिशपच चालवतात. गोव्याला देशापासून तोडण्याचे षड्यंत्र चालू असून भाजपचे आमदार मतांसाठी हे षड्यंत्र पुढे नेत आहेत. म्हणूनच प्रत्येक भाषाप्रेमीने भाजपच्या आमदारांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. भाजप शासनाने देशी भाषांना अनुदान दिले म्हणून देश आणि भाषा प्रेमी त्यांच्यापुढे लाचार होणार नाहीत. आज आमचे आदर्श राजकारणी नव्हे, तर तत्त्व पाळणारे श्रीराम, श्रीकृष्ण, स्वामी विवेकानंद हे आहेत. मातृभाषेच्या रक्षणासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू.

दडपशाहीने राज्य करणार्‍या काँग्रेसप्रमाणे उद्या पुन्हा स्थिती निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको !

सभा बारगळावी, यासाठी शासनाने दडपशाही केल्याचा आरोप

भाभासुमंची साखळी येथील सभा होऊ नये, यासाठी शासनाकडून दडपशाही केली गेली, असा आरोप भाभासुमंच्या अधिवक्त्या स्वाती केरकर यांनी केला आहे. साखळी येथे ३० एप्रिल या दिवशी वीजपुरवठा खंडित ठेवण्याचा निर्णय मातृभाषाप्रेमींच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे मागे घेण्यात आला. यामुळे खंडित वीजपुरवठा ३ मे या दिवशी करणार असल्याचे वीज खात्याने म्हटले आहे, तसेच लोकांना आकर्षित करण्यासाठी रवींद्र भवन येथे तमाशाचा विनामूल्य कार्यक्रम आणि पाळी-कोठंबी येथील एका विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे अधिवक्त्या केरकर यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *