अशा विधानासाठी केवळ क्षमायाचना पुरेशी नाही, तर त्यांची आमदारकी रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी याविषयी बोलले पाहिजे अन्यथा ‘त्या महिला असूनही असंवेदनशील आहेत’, असेच जनता समजेल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
उजवीकडे काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकच्या विधानसभेत बोलतांना ‘बलात्कार थांबवू शकत नसाल, तर झोपा आणि मजा करा’, असे विधान करणारे काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर त्यांनी क्षमा मागितली आहे. ‘या गंभीर गुन्ह्याला हसण्यावारी नेण्याचा किंवा ‘तो क्षुल्लक आहे’, असे सांगण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. ती केवळ एक टिप्पणी होती. यापुढे मी माझे शब्द योग्य प्रकारे निवडेन’, असे ट्वीट रमेश कुमार यांनी केले आहे.
राज्यात पावसामुळे झालेल्या हानीवर बोलण्यासाठी विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार वेळ मागत होते; मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी ते टाळण्याचा प्रयत्न करत होते. कागेरी म्हणाले, ‘मी विचार करत आहे की, आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.’ (जर राज्यात पावसामुळे हानी झाली असेल, तर ‘त्यावर चर्चा झाली पाहिजे’, असेच जनतेला वाटणार. ‘त्याला विधानसभा अध्यक्ष नकार कसे देतात ?’, असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) यावर प्रतिक्रिया देतांना आमदार रमेश कुमार यांनी म्हटले, ‘एक म्हण आहे, ‘जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो, तेव्हा झोपा आणि मजा करा.’ तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.’ त्यांच्या या विधानावर सभागृहात उपस्थित असलेले काही आमदार हसतांना दिसले.
यापूर्वीही रमेश कुमार यांनी बलात्काराविषयी केले होते विधान !
फेब्रुवारी २०१९ मध्ये विधानसभेचे अध्यक्ष असतांना रमेश कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. ते म्हणाले होते, ‘माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे. बलात्कार केवळ एकदाच झाला. तिथे सोडले असते, तर ते संपले असते. बलात्कार झाल्याची तक्रार केल्यावर आरोपीला कारागृहात टाकले जाते. खटल्याच्या शेवटी, पीडिता म्हणते, ‘बलात्कार प्रत्यक्षात एकदाच झाला होता; परंतु न्यायालयात उलटतपासणीच्या वेळी अनेक वेळा झाला. माझीही अवस्था अशीच झाली आहे.’ या वेळी त्यांच्या पक्षाच्या महिला आमदारांनी या विधानाचा निषेध केला होता.