कोल्हापूर : कोल्हापूर येथील शाहू कुस्ती मैदान येथे ३० एप्रिल २०१६ या दिवशी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग झाला. या नाटकातून राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ, संत, देवता, ऐतिहासिक प्रसंग इत्यादींचे विडंबन दिसून आल्यास नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, निधी देणारे आणि संबंधित यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याविषयी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, या नाटकाच्या नावावरून आणि मिळालेल्या माहितीवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ, संत, देवता यांचे विडंबन करण्यात आल्याचे समजते. असे करणे कायद्याने गुन्हा आहे. धर्मश्रद्धांची विटंबना करण्याचा कोणालाही अधिकार नाही. याकरिता या नाटकाची संहिता मागवून घ्यावी, तसेच अवलोकन करून, ध्वनीचित्रीकरण करून संहितेप्रमाणे आहे का, हे तपासून पहाणे आवश्यक आहे. निवेदन देतांना सर्वश्री शिवाजीराव ससे, चंद्रकांत बराले, संजय पौडकर, बाळासो निगवेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात