महाराष्ट्र आणि गोवा येथे ‘शिवप्रतापदिना’निमित्त आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाला धर्माभिमानी, धर्मप्रेमी अन् शिवप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानरूपी दैत्याचा वध करून आतंकवाद कसा संपवायचा, हे आपल्याला शिकवले; पण आज तोच इतिहास आपल्यापासून लपवला जात आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर (निधर्मी) होते’, असे विधान करून आज हिंदु समाजाचे शौर्य नष्ट करण्याचा कट रचला जात आहे. लव्ह जिहाद, महिलांवरील बलात्कार आणि हिंदूंवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन स्वतःमधील शौर्य जागृत केले पाहिजे. त्यांचा आदर्श केवळ मनातच नाही, तर कृतीत आणून राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठी आपण वेळ द्यायला हवा. ज्याप्रमाणे शिवछत्रपतींनी सतत भवानीमातेचे स्मरण करत स्वराज्याची लढाई लढली, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंमधील शौर्य आणि भक्ती यांचा जागर होणे आवश्यक आहे. तेजस्वी, शौर्यशाली पुत्र जन्माला येण्यासाठी प्रत्येक घरात एक जिजाऊ सिद्ध व्हायला हवी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. ‘शिवप्रतापदिना’निमित्त ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
भक्ती आणि शक्ती यांचा संगम असलेल्या या व्याख्यानाचा महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, जळगाव, नाशिक, विदर्भ, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, मुंबई, सातारा हे जिल्हे आणि गोवा राज्य येथील १ सहस्राहून अधिक धर्माभिमानी, धर्मप्रेमी आणि शिवभक्त यांनी लाभ घेतला. कार्यक्रमात अफझलखान वधाचा प्रसंग व्हिडिओच्या (चलचित्राच्या) माध्यमातून दाखवण्यात आला.
धर्मप्रेमींचे अभिप्राय
१. सौ. भाग्यश्री बाबर, पुणे – मार्गदर्शन ऐकून सद्यःस्थितीत आध्यात्मिक आणि शारीरिक बळ वाढवले पाहिजे, हे लक्षात आले. यासाठी मी स्वतः प्रशिक्षण घेऊन इतरांना स्वरक्षणाचे महत्त्व सांगून त्यांना प्रशिक्षण शिकण्यासाठी उद्युक्त करणार.
२. कु. प्राजक्ता वाणी, जळगाव – महाविद्यालयातून आल्याने मला थकवा आला होता आणि डोके दुखण्याचाही त्रास होत होता; पण व्याख्यान चालू झाल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि त्यातून थकवा जाऊन उत्साह अन् सकारात्मकता वाढली, तसेच संघटित होण्याचे महत्त्व लक्षात आले.
३. श्री. दीपक पाटील, नाशिक – व्याख्यान पुष्कळ प्रेरणादायी होते. अशी व्याख्याने सर्वत्र व्हायला हवीत. सर्वांपर्यंत हा विषय पोचवायला हवा. आज अशा व्याख्यानांची आवश्यकता आहे. पुष्कळ मार्मिकपणे विषय सांगितल्याने खरा इतिहास काय आहे, ते समजले. आजच्या युवा पिढीला अशा व्याख्यानांच्या माध्यमातून घडवण्याची आवश्यकता आहे.
४. श्री. गोकुळ सपकाळे, सरपंच, आवार ग्रामपंचायत, जळगाव – व्याख्यान पुष्कळच चांगले झाले. स्वरक्षण प्रशिक्षण येणे काळाप्रमाणे पुष्कळ आवश्यक उपक्रम आहे. सर्व युवकांनी चालू होणार्या प्रशिक्षणवर्गाला उपस्थित रहावे. (सरपंच श्री. गोकुळ सपकाळे स्वतः प्रशिक्षणवर्गाला उपस्थित होते.)
५. सौ. श्यामल गराडे, पुणे – जिज्ञासूंना साधनेचे आणि स्वरक्षणाचे महत्त्व सांगून उद्युक्त करणार. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी पुढाकार घेऊन राष्ट्र आणि धर्म यांसाठी १ घंटा वेळ देणार.
६. महेश कांबळी, सिंधुदुर्ग – छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आजच्या व्याख्यानातून शिकायला मिळाला.
७. सचिन चंदूरकर, रत्नागिरी – विशाळगडावर गेल्यावर तेथील मशीद बघितली आणि पुष्कळ वाईट वाटले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावर मशीद होते; मात्र आम्हाला राममंदिर उभारण्यासाठी मागणी करावी लागत होती, हे दुर्दैवी आहे. हिंदूंमध्ये धर्मशिक्षण नसल्याने हे होत आहे. यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात आले, तसेच हिदूंचे संघटन कसे करायचे ? हे या व्याख्यानातून समजले.
८. सौ. गीतांजली गुरव, मुंबई – पुष्कळ छान वाटले. शौर्यजागृती झाली आणि आपण मुलांनाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य अन् पराक्रम सांगायला हवेत, हे लक्षात आले.
९. कु. धनश्री दिवटे, मुंबई – व्याख्यान चांगले होते. व्याख्यान ऐकल्याने खरा इतिहास समजला आणि आत्मविश्वास वाढला, तसेच आपण भक्ती वाढवली पाहिजे, हे लक्षात आले. व्याख्यानातून प्रोत्साहन मिळाले. ‘याविषयी इतरांनाही सांगावे’, अशी इच्छा निर्माण झाली.
१०. कु. दीप धामणेकर – व्याख्यान ऐकत असतांना शरिरावर शहारे येऊन शौर्यजागृती होत होती. धर्मांधाविषयी, राष्ट्र-धर्मावर होणार्या आघातांविषयी मनात प्रचंड चीड निर्माण होत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवकांचे संघटन करावे, बाहेर जाऊन हे धर्मकार्य झोकून देऊन करावे, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. व्याख्यान चालू झाल्यावर वक्त्यांचा आवाज येत नव्हता. भ्रमणभाषचे ‘नेटवर्क’ व्यवस्थित असतांनाही अडथळे येत होते. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी सांगितलेला नामजप केल्यावर थोड्याच वेळात सर्व अडथळे दूर होऊन व्याख्यान निर्विघ्नपणे पार पडले.
२. जळगाव जिल्ह्यातील हिंगोणा, यावल, जळगाव शहर येथील धर्मप्रेमींनी प्रतिदिन बलोपासना करणे, धर्मसेवा, धर्माचरण आणि साधना करण्याचे ठरवले.
३. तिथीनुसार शिवप्रतापदिन आणि अन्य ऐतिहासिक घटनाक्रम अन्य पंचांगात दिसत नसल्याने वाठोडा शुकलेश्वर (जिल्हा अमरावती) येथील धर्मप्रेमींनी लगेचच ‘सनातन पंचांग २०२२’ विकत घेतले.
४. सोलापूर येथील सर्व धर्मप्रेमींचा उत्साह चांगला होता. शौर्यवर्ग चालू करण्यासाठी सगळ्यांनी उत्साहाने सिद्धता दर्शवली.
५. सातारा येथील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यांनी स्वत:हून स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.