Menu Close

श्री तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात डान्सबार चालवणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

  • विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदारांची मागणी !

  • डान्सबारचा परवाना रहित करण्यात आल्याची गृहराज्यमंत्र्यांची माहिती !

मुळात तुळजापूरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री डान्सबार अन् तत्सम प्रकार चालूच कसे दिले जातात ? – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – महाराष्ट्राची कुलदेवता श्री तुळजाभवानीदेवीच्या तुळजापूर नगरामध्ये डान्सबार चालवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी २३ डिसेंबर या दिवशी सर्वपक्षीय सदस्यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही लक्षवेधी मांडली. यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी डान्सबार आणि परमिट रूम यांचा परवाना रहित करण्यात आल्याची माहिती दिली.

‘या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून ६४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे, तसेच नृत्याचा परवाना रहित का करू नये ? अशी नोटीसही पाठवण्यात आली आहे’, असेही ते म्हणाले.

धार्मिक स्थळाचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी ! – अंबादास दानवे, आमदार, शिवसेना

तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर हे देशातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. अशा ठिकाणी डान्सबार चालू करणारे आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर, अशा प्रकारे धार्मिक स्थळाचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

मुंबई आणि ठाणे परिसरात डान्सबार चालू ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

राज्यात डान्सबारवर बंदी असतांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी डान्सबार चालू आहेत. याविषयी गृहमंत्र्यांनी माहिती घ्यावी. पोलिसांच्या सहकार्याविना डान्सबार चालू शकत नाहीत. या प्रकरणी पोलिसांवर काय कारवाई करणार ?

या प्रकरणी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘वरिष्ठांना जाब विचारावा, तसेच आवश्यकता असल्यास त्यांचे निलंबन करावे’, असे निर्देश दिले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *