Menu Close

हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ ‘मनुस्मृती’चे हिंदुद्रोह्यांकडून दहन !

मनुस्मृति ही स्त्रीविरोधी असल्याचे सांगणार्‍यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट !

मनुस्मृतीच्या विरोधात आणि त्याच्या समर्थनार्थ ट्विटरवर ‘ट्रेंड’ !

  • कोणताही धर्मग्रंथ जाळणे, हा कायद्याने गुन्हा आहे. हिंदूंचा धर्मग्रंथ जाळला जात असतांना आणि त्याविषयी सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित केले जात असतांना पोलीस झोपा काढत आहेत का ?
  • हिंदूच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी ईशनिंदा विरोधी कायदा करणे अत्यावश्यक झाले आहे. भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आता संघटित होऊन अशी मागणी करायला हवी !

नवी देहली – २५ डिसेंबर या दिवशी ‘मनुस्मृति दहन दिवस’ या नावाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा दिवस साजरा करण्याचे काही हिंदुद्रोह्यांनी आवाहन केले. यामध्ये ‘बीबीसी हिंदी’च्या माजी पत्रकार मीना कोतवाल यांनी मनुस्मृतीचे दहन करून त्याचा व्हिडिओ ट्विटरद्वारे प्रसारित केला आणि समाजाला मनुस्मृति जाळण्याचे प्रक्षोभक आवाहन केले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘मी आज ज्याप्रकारे मनुस्मृतीचे दहन केले, तसे तुम्ही केले का ? असे करण्यात पुष्कळ मजा आहे. आता आपण असे नियमित करत जाऊ आणि केवळ तिचे दहन न करता तिच्यातील विचारांनाही नष्ट करून टाकू. बाबासाहेब (आंबेडकर) यांनीही हेच केले होते.’ (एकांगी माहिती प्रसारित करणार्‍या कोतवाल ! घटनाकार डॉ. आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले असले, तर त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ सिद्ध केले. कोतवाल यांच्यासारख्या हिंदुद्रोही महिला ही गोष्ट जाणीवपूर्वक लपवून ठेवत आहेत, हे लक्षात घ्या !  – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मीना कोतवाल यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटले, ‘‘जो नीच मनू महिला आणि क्षूद्र यांना प्राणीसमान समजायचा, त्या मनूला मी ‘महानीच’ म्हणीन. जो ग्रंथ भेदभावावर आधारित आहे, त्याला जाळल्याने तुम्हाला वाईट का वाटते ?’’

(वरील व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. – संपादक)

मनुस्मृतीच्या दहनाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचा ट्विटर ट्रेंड !

यानंतर ट्विटरवर ट्रेंड ‘#मनुस्मृति_दहन_दिवस’ आणि ‘#हम_मनुस्मृति_दहन_करेंगे’ अशा प्रकारे हिंदुद्रोह्यांकडून ट्विटर ट्रेंड (ट्विटरवर एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा.) करण्यात आले. यांत अखिल भारतीय परिसंघ आदी हिंदुविरोधी संघटनांनी त्याच्या समर्थनार्थ ट्वीट्स केल्या. याला प्रतिवाद करण्यासाठी  हिंदुत्वनिष्ठांनीही मनुस्मृति या महान आध्यात्मिक ग्रंथाचे महत्त्व प्रतिपादणार्‍या ट्वीट्स करत ‘#हम_मनुस्मृति_पूजेंगे’ या हॅशटॅगने ट्रेंड केला. त्याला भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन प्राप्त झाले. (आता ‘ट्रेंड’ करून जागृती करण्यासमवेतच प्रत्यक्ष आंदोलन करून हिंदुविरोधी तत्त्वांना वैध मार्गाने धडा शिकवण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

स्त्रियांचा आदर करायला शिकवणारी अद्वितीय ‘मनुस्मृति’ !

मनुस्मृतीतील स्त्रियांचा आदर करायला शिकवणारे काही श्‍लोक येथे दिले आहेत. यातून आजच्या काळातील हिंदुविरोधीच नव्हे, तर स्त्रीवादी उपटसूंभ यांची मनुस्मृती अन् एकूणच हिंदु धर्म यांच्या विरोधात केली जाणारी गरळओक ही कशा प्रकारे निराधार, कपोलकल्पित आणि खोटी आहे, हे लक्षात येईल. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी संकलित केलेला ‘मनुस्मृति जाळावी की अभ्यासावी ?’ या लघुग्रंथातील माहिती येथे साभार प्रकाशित करत आहोत.

१. मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक २६७-२७१ : आई, बहीण आणि पत्नी यांना अन् त्यांच्या संदर्भात इतर पुरुषांना शिवी देणार्‍यास इतर प्रकारच्या शिव्या देण्याच्या दंडापेक्षा दुप्पट दंड सांगितला आहे.

२. मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ११४ : नवविवाहित वधू, अविवाहित रुग्ण मुलगी आणि गरोदर स्त्री यांना वेळप्रसंगी अतिथीच्याही आधी भोजन द्यावे.

३. मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक ४०४-४०७ : बोटीतून प्रवास करणार्‍या स्त्रियांकडून भाडे घेऊ नये.

४. मनुस्मृति, अध्याय ९, श्‍लोक १६ : पुरुषांनी पैसे कमवावे, ते ठेवायला पत्नीकडे द्यावे आणि पैशांचा विनियोग स्त्रीच्या माध्यमातून (स्त्रीच्या संमतीने) व्हावा.

५. मनुस्मृति, अध्याय ९, श्‍लोक ३ : पिता बालपणी, पती तारुण्यात आणि पुत्र वृद्धावस्थेत स्त्रीचे रक्षण करतो; म्हणून तिला स्वातंत्र्य देऊ नये. (न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ।)

२ सहस्र ३०० वर्षांपूर्वी स्त्रीचे रक्षण करण्यासाठी शारीरिक क्षमता अत्यावश्यक होती. त्या काळी स्त्री अधिक अबला होती; कारण तेव्हा पिस्तुले इत्यादी शस्त्रे नव्हती. त्या काळात स्त्रीरक्षणाचा हा फार मोठा विचार मनूने सांगितला. पिता, पती आणि पुत्र यांनी स्त्रीचे रक्षण केले पाहिजे, हे मनूने ठासून सांगितले. ही पार्श्‍वभूमी लक्षात न घेता ‘मनु स्त्रीस्वातंत्र्याचा वैरी होता’, असे म्हणून मनुस्मृति जाळणे, ही वैचारिक दिवाळखोरीच झाली !

६. मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ५७ : ज्या कुळातील स्त्री दुःखी असते, त्या कुळाचा नाश होतो.

७. मनुस्मृति, अध्याय २, श्‍लोक १४५ : उपाध्यायापेक्षा आचार्य दहापटींनी, आचार्यापेक्षा पिता शंभरपटींनी, तर पित्यापेक्षा माता सहस्रपटींनी श्रेष्ठ आहे.

८. मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ५६ : जेथे स्त्रीची पूजा केली जाते, तेथे देव रममाण होतात.

९. मनुस्मृति, अध्याय ९, श्‍लोक ११८ : वडिलापोर्जित संपत्तीमधील स्वतःच्या भागातील चौथा भाग बहिणीला देणे, हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे. त्याचे पालन न करणारा भाऊ पतित मानला जातो.

(संदर्भ : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे लिखित ‘मनुस्मृति जाळावी की अभ्यासावी ?’ या लघुग्रंथातून साभार)

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *