हिंदु जनजागृती समितीची राज्यातील किल्ल्यांच्या रक्षणासाठी मोहीम
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा राष्ट्रीय स्मारक किल्ले विजयदुर्ग ही महाराष्ट्राची अस्मिता आहे; मात्र छत्रपतींच्या महाराष्ट्रात असलेल्या या किल्ल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाल्याने विजयदुर्ग किल्ला पाहायला जाणार्या दुर्गप्रेमींची मान शरमेने खाली जाते; मात्र किल्ल्याच्या संवर्धनासाठी असलेल्या पुरातत्त्व खात्याची अनास्था चीड आणणारी आहे. राज्यातील गडकोट हा आपला ऐतिहासिक वारसा असून हिंदु जनजागृती समितीने राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासनाने तातडीने कृती करावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, तसेच शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी २९ डिसेंबर या दिवशी राज्यव्यापी आंदोलन छेडणार, असा इशारा समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथील पत्रकार परिषदेत दिला. या वेळी समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. संदेश गावडे आणि हिंदु विधिज्ञ परिषदेच्या सौ.अस्मिता सोवनी उपस्थित होत्या.
श्री. घनवट पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या सिंधुदुर्गातील जलदुर्गांपैकी एक असलेला दुर्ग म्हणजे विजयदुर्ग किल्ला होय. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. हे किल्ले सध्याच्या पिढीला प्रेरणा देतात; मात्र या किल्ल्यांची योग्य देखभाल होत नसल्याने त्यांची पडझड होत आहे. त्यामुळे हा आपला ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
किल्ल्याची दुरावस्था : किल्ल्याची पहिली तटबंदी अनेक ठिकाणी ढासळली आहे. महाद्वारासमोरील दुसरी तटबंदीही ढासळली असून एक वर्षाहून अधिक काळ लोटला, तरी त्याची डागडुजी केलेली नाही. त्याची पहाणी करण्याकरता राजकीय नेते, लोकप्रतिनिधी येथे येऊन गेले. पुरातत्त्व खात्यानेही आश्वासने दिल्याचे कळते; मात्र अद्यापही या तटबंदीचे काम करण्यात आलेले नाही. किल्ल्याच्या महाद्वाराला दरवाजेच नाहीत. सदरेच्या तटबंदीवर एक वर्षांपूर्वी कोसळलेला वड त्याच स्थितीत आहे. वड कोसळून तटबंदी दुभंगली आहे. किल्ल्याचा परिसर पहात असतांना अनेक ठिकाणी झाडांची पाळेमुळे बुरुज आणि तटबंदीत घुसून ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत. दर्या बुरुजाच्या तटबंदीचा तळाकडील भाग समुद्राच्या पाण्यामुळे आतपर्यंत पोखरला गेला असून बुरुज कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. धुळपांचे भुयार बुजलेल्या स्थितीत आहे. भुयारी मार्ग मोकळा केल्यास शिवकालीन इतिहासातील बर्याच गोष्टी समजून येण्याची शक्यता आहे.
हा किल्ला जिंकून घेतल्यावर निशाणकाठी टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते पवित्र भगवा ध्वज फडकावला होता. आज या ठिकाणी भगवा ध्वज न लावता वादळाचा बावटा लावण्यात येतो. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यास आडकाठी कोण करत आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्यदैवत श्री भवानी मातेची मूर्ती असलेल्या ठिकाणी मंदिर किल्ल्यावर का नाही ? असे प्रश्न श्री. घनवट यांनी उपस्थित केले.
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या सौ. अस्मिता सोवनी यांनी सांगितले की, विजयदुर्ग किल्ल्यापासून ३ किमी परिसरात समुद्रात दगडाची भिंत उभी केलेली आहे, असे नॅशनल इन्सिट्यूट आॅफ ओशनोग्राफी (NIO) च्या संशोधनात आढळून आले. त्याचे जतन, संशोधन आणि प्रदर्शन होणे आवश्यक आहे. याच परिसरात मराठ्यांच्या आरमाराच्या गोदी आहेत. त्याचा वापर मराठी आरमाराच्या युद्धनौका दुरूस्तीसाठी व्हायचा. त्याचेही संशोधन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे.
विजयदुर्ग किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने खालील मागण्या करत आहोत –
१. किल्ले विजयदुर्गची संबंधित शासकीय अधिकारी, किल्ल्यांशी संबंधित तज्ञ व्यक्ती, स्थानिक ग्रामस्थ यांच्यामार्फत संपूर्ण पाहणी करून त्याचा अहवाल त्वरित देण्यात यावा.
२. विजयदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती, संवर्धन आणि देखभाल यांसाठी तातडीने शासकीय निधी उपलब्ध करून मिळावा आणि त्याचे काम तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आणि तज्ञ व्यक्तींमार्फत त्वरित सुरू करण्यात यावे.
३. विजयदुर्गजवळ वाघोटन खाडीच्या मुखाशी असलेली सागरातील संरक्षक भिंत आणि आरमाराची गोदी यांचे जतन आणि संवर्धन करण्यात यावे.
४. किल्ले विजयदुर्गबाबात आतापर्यंत ज्या शासकीय अथवा खाजगी संस्थांनी संशोधन केले आहे, त्या संशोधनाला व्यापक प्रसिद्धी दिली जावी.
५. विजयदुर्गशी संबंधित युद्धांच्या आणि स्थानांच्या इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकांतही करण्यात यावा.
६. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संकेतस्थळावर आणि राज्य शासनाच्या संकेतस्थळावर विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास रोचक पद्धतीने छायाचित्रांसह प्रसिद्ध केला जावा.
७. किल्ल्याशी संबंधित शिवकालीन वस्तूंचे वस्तुसंग्रहालय (म्युझियम) किल्ल्यावर उभारले जावे.
८. विजयदुर्ग किल्ल्याचा आणि आजूबाजूच्या प्रदेशाचा अभ्यास अन् पहाणी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ या गोवास्थित शासकीय संस्थेने वर्ष १९९८ मध्ये केली होती. या पहाणीमध्ये त्यांना काही महत्त्वाचे शोध लागले. त्यांनी ते प्रसिद्ध केले आहेत. या संशोधनाला आधारभूत धरून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अजून पुढील संशोधन केले जावे.