Menu Close

मंदिरे अर्थकारणाचे नाही, धर्मकारणाचे स्थान ! – आनंद जाखोटिया, समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स (संगम) २०२१’ परिसंवादात ‘मंदिर अर्थशास्त्र : भारताचे वैभव असलेली मंदिरे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !

जयपूर (राजस्थान) – मंदिरांचे सरकारीकरण होत आहे. ‘मंदिरांचे अर्थशास्त्र’ या विषयावर चर्चा होते, पण मंदिर अर्थकारणाचे नाही, तर धर्मकारणाचे स्थान आहे. धर्म विसरून जर आपण मंदिरांच्या अर्थकारणाच्या मागे लागलो, तर अनर्थ होईल. उपजिविका आणि अर्थकारण यांसाठी मंदिरांकडे पहाणे, ही साम्यवादी विचारसरणी आहे. आज मंदिरात प्रवेश करताच हार-फुलांसाठी मागे लागलेले व्यापारी, जलद दर्शनासाठी पैसे आकारणारे मंदिर विश्वस्त भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोचवत आहेत. केवळ मंदिरांच्या दानपेटीवर डोळा ठेवून मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. मंदिरांमध्ये भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार करून मंदिर संस्कृती उद्ध्वस्त केली जात आहे. मंदिरांच्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी आणि मंदिरांच्या जिर्णाेद्धारासाठी व्हायला हवा. नव्या पिढीला मंदिरांचे महत्त्व वैज्ञानिक भाषेत पटवून द्यायला हवे, अन्यथा आपण मंदिर संस्कृतीचा वारसा पुढे घेऊन जाऊ शकणार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. ते ‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स २०२१’ या परिसंवादात बोलत होते.

श्री. आनंद जाखोटिया

जयपूर (राजस्थान) येथील श्री. निधीश गोयल यांच्या ‘जम्बू टॉक्स’ या यू-ट्यूब वाहिनीवर २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत ५ दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २५ डिसेंबर या दिवशी ‘मंदिर अर्थशास्त्र : भारताचे वैभव असलेली मंदिरे’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिर स्थापत्य विषयातील तज्ञ डॉ. जी.बी. देगलूरकर आणि मंदिरांशी आधारित कलाविषयातील तज्ञ असलेले भारतीय प्रशासकीय अधिकारी श्री. राजेश कुमार सिंह यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. श्री. निधीश गोयल यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

काश्मीरमधील मंदिरे उद्ध्वस्त झाल्याने तेथील गौरवही नष्ट झाला ! – राजेश कुमार सिंह, मंदिरांशी आधारित कला विषयातील तज्ञ

भारतीय संस्कृती संशोधक आणि जिज्ञासू वृत्तीची आहे. मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूनंतर तो कुठे जाणार? इथपर्यंतची माहिती भारतीय संस्कृतीत दिली आहे, जी शाश्वत आणि सनातन आहे. भारतियांचे पूर्वज (ऋषिमुनी) मानवी मूल्यांचे आदर करत वैज्ञानिक आधारावर मनुष्याला एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करत आले आहेत. मंदिरे ही भारतीय सृजनतेचे उदाहरण आहेत; परंतु वैभवशाली काळाविषयी भारतियांना अत्यंत अल्प माहिती असणे, हे दुर्दैव आहे. मंदिरांप्रती लोकांमध्ये अज्ञान आहे.

काश्मीरमधील मंदिरांविषयी निघालेल्या एका चित्रपटात मंदिरांना ‘डेन ऑफ डेव्हिल’ (राक्षसाचे घर) असे दाखवले गेले. यामुळे काश्मीर मानसिकदृष्ट्या भारतापासून वेगळे झाला. काश्मीरमध्ये अनेक गौरवशाली मंदिरे होती. तेथील मंदिरे उद्ध्वस्त झाली, तसा तेथील गौरव सुद्धा गेला. आपल्या पूर्वजांच्या अनेक वर्षांच्या निरंतर चिंतनाच्या सृजनशक्तीचे प्रतीक म्हणजे ही मंदिरे आहेत. मंदिरांना काही अंशी जरी आपण समजू शकलो, तरी समाजासाठी चांगले कार्य करू शकतो.

मंदिरांच्या व्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करू नये ! – डॉ. जी.बी. देगलूरकर, मूर्तिशास्त्र अभ्यासकआणि मंदिर स्थापत्य तज्ञ

मंदिर निर्मितीसाठी गणित, भूमिती, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र या सर्वांची आवश्यकता असते. मंदिरांच्या कलाकृतीतून मनुष्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचा बोध होत असतो. मंदिरे ही हिंदु संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. मंदिरांच्या व्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करू नये. मंदिरांचा निधी हा मंदिरांसाठी वापरला गेला पाहिजे; पण सरकारीकरण झालेल्या मंदिरांचा निधी दुसरीकडे वापरला जातो, जे योग्य नाही. मंदिरे ही हिंदु संस्कृतीचे पालन करणार्‍या लोकांच्या हातात असली पाहिजेत.

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *