Menu Close

मुंबईतील प्रभादेवी मंदिरासमोर ‘सेंट थॉमस चर्च’ उल्लेख असणारा महापालिकेने नव्याने बसवलेला ब्रिटीशकालीन मैलाचा दगड हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर प्रशासनाने हटवला !

ब्रिटीशकालीन मैलाच्या दगडांचा संवर्धन करणारा महानगरपालिकेचा पुरातन वास्तू जतन विभाग कधी हिंदूंच्या ऐतिहासिक वस्तूंचे जतन करतो का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

महापालिकेने बसवलेला ब्रिटीशकालीन मैलाचा दगड

मुंबई – येथील प्रभादेवी या पुरातन मंदिराच्या समोर ‘सेंट थॉमस चर्च’ असा उल्लेख असलेला मैलाचा दगड मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून नुकताच लावण्यात आला होता. मंदिरात जाण्याच्या मार्गात मध्येच, तसेच चर्चचा उल्लेख असलेला दगड लावण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तात्पुरते कह्यात घेतले. हिंदुत्वनिष्ठांच्या प्रक्षोभामुळे अंततः महानगरपालिका प्रशासनाने हा दगड हटवला आहे.शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीही हा मैलाचा दगड हटवण्याची मागणी केली होती. हा दगड मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून मैलाचे अंतर दर्शवण्यासाठी अशा प्रकारचे १५ दगड लावण्यात आले आहेत, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

ब्रिटीशकालीन पुरातन मैलाच्या दगडांची प्रशासनाकडून पुनर्स्थापना !

या दगडांवर ‘माईल्स फ्रॉम सेंट थॉमस चर्च’ असे इंग्रजी अक्षरांमध्ये लिहिण्यात आले असून त्या दगडावर ‘रोमन’ अंकात क्रमांक लिहिला आहे. या प्रत्येक दगडाच्या खाली ‘मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन कक्षाद्वारे ‘जतन-संवर्धन सन २०२१ साली पूर्ण’ या उल्लेखाची धातूची पट्टी बसवण्यात आली आहे.

याविषयी माहिती घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांनी पुढील माहिती दिली.

१. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्ष १८३६-३७ मध्ये मैलाचे अंतर समजावे, यासाठी मुंबईतील ‘हॉर्निमल सर्कल’ येथील ‘सेंट थॉमस चर्च’ येथून मैलाचे अंतर मोजण्यात आले.

२. या चर्चपासून प्रत्येक मैलावर अशा प्रकारे दगड बसवून त्यावर अनुक्रमे अंक लिहिण्यात आले. यांतील पहिला दगड काळबादेवी, दुसरा दगड गिरगाव असे प्रत्येक मैलाच्या अंतरावर दगड लावण्यात आले होते.

३. मुंबईत अशा प्रकारे १५ दगड होते. कालांतराने हे दगड गहाळ झाले. मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन कक्षाद्वारे हे दगड पुन्हा शोधण्यात आले असून पूर्वी असलेल्या ठिकाणी ते पुन्हा लावण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्या अंतर्गत हे दगड लावण्याचे काम चालू आहे.

आक्रमणकर्त्या ब्रिटिशांचे उदात्तीकरण कशासाठी ?

खरेतर मैलाचे अंतर मोजण्यासाठी बसवलेल्या या दगडांवर ब्रिटिशांना भारतात त्या वेळी अस्तित्वात असलेल्या ठिकाणाचा उल्लेख करता आला असता; मात्र त्यांनी जाणीवपूर्वक स्वत:च्या प्रतिकाचा म्हणजे ‘सेंट थॉमस चर्च’चा उल्लेख केला. असे असतांना स्वातंत्र्योत्तर काळात आपण आपल्या प्राचीन भारतीय प्रतिकांचा उल्लेख का करू नये ? ब्रिटिशांचे उदात्तीकरण करण्याऐवजी प्रशासनाने भारतातील प्राचीन वास्तूंचा उल्लेख दगडांवर करणे अपेक्षित होते. यापूर्वी ‘व्हिक्टोरीया टर्मिनस’, ‘एल्फीन्सस्टन’, ‘बॉम्बे’ आदी अनेक ब्रिटीश नावे मुंबई महानगरपालिकेने पालटली आहेत, मग या मैलांच्या दगडांचे जतन करतांना ब्रिटिशांचे उदात्तीकरण कशासाठी ? त्यामुळे या दगडांवरील ‘सेंट थॉमस चर्च’चा उल्लेख काढून जेथून हे मोजमाप प्रारंभ करण्यात आले आहे, तेथील भारतीय वास्तूचा उल्लेख करावा, अशी भारतीय म्हणून देशवासियांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *