Menu Close

समाजाचा उत्कर्ष साधून राष्ट्रोद्धाराचा सुलभ मार्ग दाखवणारी ‘मनुस्मृति’ !

‘मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे’, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये व्यक्त केले. ‘मनस्मृति’ हा स्त्रीविरोधी, शूद्रांना हीन लेखणारा आणि समाजात दुही माजवणारा ग्रंथ आहे’, असा विखारी प्रसार करणार्‍यांना ही चपराक होय ! भारतात आजही २५ डिसेंबर या दिवशी ‘मनुस्मृति दहन दिवस’ या नावाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा दिवस साजरा करण्याचे आवाहन हिंदुद्रोह्यांकडून केले जाते. ‘२ सहस्र ३०० वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ जाळणार्‍यांनी त्याचा अभ्यास तर सोडाच, तो वाचलेला असतो का ?’, हा संशोधनाचा विषय आहे. ‘या ग्रंथाच्या विरोधात केलेली गरळओक किती खोटी आहे’, हे जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी संकलित केलेल्या ‘मनुस्मृति जाळावी कि अभ्यासावी ?’ या लघुग्रंथातील काही निवडक माहिती येथे प्रकाशित करत आहोत.

१. ‘मनुस्मृती’त शूद्रांचा सन्मान केला असल्याचे दर्शवणारे श्लोक !

अ. मनुस्मृति, अध्याय १०, श्लोक ५७ : शूद्रापेक्षा कनिष्ठ अशा कुळात जन्मलेल्याचा आचार चांगला असल्यास त्याला मान द्यावा.

आ. मनुस्मृति, अध्याय ४, श्लोक २५३ : शेतीवरील कूळ, पिढ्यान्पिढ्या स्नेहभाव असलेला, नोकर आणि न्हावी हे शूद्र असले, तरी त्यांनी त्यांच्या दोषांची स्वीकृती देऊन ते काढून टाकले, तर त्यांना भोजनाच्या पंक्तीस आपल्या बरोबर बसवावे.

इ. मनुस्मृति, अध्याय ४, श्लोक २५३ : शूद्रांकडील भोजन इतर वर्णियांनी ग्रहण करावे.

ई. मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक २३ : यात वसिष्ठ आणि मंदपाल ऋषी यांच्या पत्नी म्हणून अक्षमाला अन् शारंगी यांचा उल्लेख आहे. (त्या शूद्राहूनही कनिष्ठ अशा कुळातील होत्या. तेव्हा समाजात अशा विवाहाला मान्यता होती.)

उ. मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक १३ : ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वर्णियांनी सून म्हणून शूद्रकन्येचा स्वीकार करावा.

ऊ. मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक ६२ : ब्राह्मणांना नव्हे, तर शूद्रांना साक्ष देण्याचा अधिकार आहे.

सध्याच्या कोणत्याही पक्षाच्या शासनापेक्षा मनूने शूद्रांना सर्वांत अधिक लाभ दिले होते. तरीही मनूने शूद्रांवर अन्याय केला म्हणून मनुस्मृति जाळली जाते.

श्री. रमेश शिंदे

२. स्त्रियांचा आदर करायला शिकवणारी अद्वितीय ‘मनुस्मृति’ !

अ. मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक २६७-२७१ : आई, बहीण आणि पत्नी यांना अन् त्यांच्या संदर्भात इतर पुरुषांना शिवी देणार्‍यास इतर प्रकारच्या शिव्या देण्याच्या दंडापेक्षा दुप्पट दंड सांगितला आहे.

आ. मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ११४ : नवविवाहित वधू, अविवाहित रुग्ण मुलगी आणि गरोदर स्त्री यांना वेळप्रसंगी अतिथीच्याही आधी भोजन द्यावे.

इ. मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक ४०४-४०७ : बोटीतून प्रवास करणार्‍या स्त्रियांकडून भाडे घेऊ नये.

ई. मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक १६ : पुरुषांनी पैसे कमवावे, ते ठेवायला पत्नीकडे द्यावे आणि पैशांचा विनियोग स्त्रीमार्फत (स्त्रीच्या संमतीने) व्हावा.

उ. मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ३ : पिता बालपणी, पती तारुण्यात आणि पुत्र वृद्धावस्थेत स्त्रीचे रक्षण करतो; म्हणून तिला स्वातंत्र्य देऊ नये. (न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति।)

२ सहस्र ३०० वर्षांपूर्वी स्त्रीचे रक्षण करण्यासाठी शारीरिक क्षमता अत्यावश्यक होती. त्या काळी स्त्री अधिक अबला होती; कारण तेव्हा पिस्तुले इत्यादी शस्त्रे नव्हती. त्या काळात स्त्रीरक्षणाचा हा फार मोठा विचार मनूने सांगितला. ‘पिता, पती आणि पुत्र यांनी स्त्रीचे रक्षण केले पाहिजे’, हे मनूने ठासून सांगितले. ही पार्श्वभूमी लक्षात न घेता ‘मनु स्त्रीस्वातंत्र्याचा वैरी होता’, असे म्हणून मनुस्मृति जाळणे, ही वैचारिक दिवाळखोरीच झाली !

३. न्यायव्यवस्था आणि मनुस्मृति

अ. आदर्श न्यायप्रणाली सांगणारी मनुस्मृति : न्यायदान, वादाचे विषय (मुद्दे), न्यायाधीश, निरनिराळे अपराध आणि त्यांना शासन, जकाती, कारागृहे इत्यादींसंबंधी माहिती मनुस्मृतीत दिली आहे.

आ. मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक ४-१५ : यात अदखलपात्र गुन्हे, खंडपीठ, खोटी साक्ष, १६ वर्षे वयापर्यंत अपराध्याला अपराधासंदर्भात अज्ञानी समजणे, कोणाची साक्ष ग्राह्य धरू नये ? इत्यादी सूत्रे दिली आहेत.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

(संदर्भ : ‘मनुस्मृति जाळावी कि अभ्यासावी ?’ या लघुग्रंथातून)

कुठे मनुस्मृतीचे महत्त्व जाणल्याने तिचा सन्मान करणारे विदेशी, तर कुठे मनुस्मृतीच्या विरोधातील विखारी प्रसाराला बळी पडून ती जाळणारे काही नतद्रष्ट भारतीय !

१. नीत्शे या जर्मन तत्त्ववेत्त्याने त्याच्या एका ग्रंथात प्रजोत्पादन, स्त्री, विवाह इत्यादी ज्या गोष्टींचा विचार ख्रिस्ती धर्म गावंढळपणे दडपून टाकतो, त्या सर्वांचे मनुस्मृतीत गंभीरपणे विवेचन केल्याचे नमूद केले आहे.
२. ऑस्पेन्स्की हा पाश्चात्त्य पंडित ‘अ न्यू मॉडेल ऑफ दि युनिव्हर्स’ या ग्रंथात म्हणतो – ‘मनूचे विवाहविषयीचे नियम फार महत्त्वाचे आहेत. ज्या जातींचे स्वभावधर्म मूलतःच भिन्न आहेत, अशा जातींच्या वधू-वरांचे मिश्र विवाह झाल्यास त्यांचे बरे-वाईट काय परिणाम होतात, ते मनूने निःसंदिग्धपणे सांगितलेले आहेत.’
३. मॉरिस मेटरलिंक या बेल्जियन पंडिताने आपल्या ‘दि ग्रेट सीक्रेट’ या ग्रंथात मनूने प्रतिपादिलेले नीतिनियम आध्यात्मिक स्वरूपाचे असल्याची प्रशंसा केली आहे. या नियमांच्या पालनाला बक्षीस आणि उल्लंघनाला शिक्षा स्वतःच्या अंतःकरणातच मिळते. आपला स्वतःचा आत्मा हाच न्यायाधीश, स्वर्ग किंवा नरक असतो.

(संदर्भ : बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड ८, पृष्ठ क्र.१७-१८ आणि साप्ताहिक ‘जनता’, १४-१-५०)

मनुस्मृतीचे दहन करणारे; मात्र कालांतराने अभ्यास केल्यावर तिचा सन्मान करणारे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

अ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीच्याच आधारे ‘हिंदू कोड बिल’ सिद्ध केले असणे :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले होते, हे खरे आहे; पण पुढे त्याच डॉ. आंबेडकरांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचाच आधार घेऊन ‘हिंदू कोड बिल’ बनवले. २५ डिसेंबर १९५२ या दिवशी राजाराम चित्रपटगृहात बोलतांना डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘‘माझ्या ‘बिला’च्या टीकाकारांनी ‘बिल हिंदु धर्मशास्त्रास सोडून आहे’, अशी टीका केली; पण तसे म्हणणार्‍यांना माझे आव्हान आहे की, मनुस्मृतीचा आधार नाही, असे त्यात कोणते कलम आहे, ते त्यांनी दाखवून द्यावे.’’

आ. राज्यघटना सिद्ध करतांना विविध स्मृतींचा आधार घेतलेले डॉ. आंबेडकर : ‘११ जानेवारी १९५० या दिवशी मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलतांना बाबासाहेब म्हणाले की, मी जातीनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पराशर-स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्मृतीचा आधार घेतला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा-हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.’

(संदर्भ : बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड ८, पृष्ठ क्र.१७-१८ आणि साप्ताहिक ‘जनता’, १४-१-५०)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *