Menu Close

भारतियांना पराभूत करणार्‍या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

श्री. अजयसिंह सेंगर

मुंबई – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ हा भारतियांच्या पराभवाचे प्रतीक आहे.  भारतियांना पराभूत करणार्‍या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. १ जानेवारी या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन या स्तंभाला अभिवादन केले. या वेळी त्यांच्यासमवेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.

याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे, ‘भारतात सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते; मात्र काही विघातक प्रवृत्तींची लोक उच्चवर्णीय अन् बहुजन यांमध्ये वाद पेटवून स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत. हिंदूंमध्ये  वाद पेटून हिंसाचार व्हावा, यासाठी या राष्ट्रविघातक शक्ती कार्यरत आहेत. वर्ष २०१८ मध्ये या ठिकाणी दंगल होऊन एका मराठा युवकाला प्राण गमवावा लागला होता. बहुजनांची माथी भडकवणे, हिंदु धर्माच्या विरोधात विखारी भाषणे करणे, ब्राह्मणांना शिवीगाळ करणे, हाच यामागील हेतू आहे. सरकारने अशा देशविरोधी कार्यक्रमांना अनुमती देऊ नये.’

वर्ष १८१८ मध्ये इंग्रज आणि भारतीय यांच्या झालेल्या लढाईमध्ये इंग्रजांच्या बाजूने लढणार्‍या ज्या बहुजनांचा या युद्धात मृत्यू झाला, त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी हा स्तंभ उभारला आहे. या इंग्रजांच्या विरोधातील युद्धात पेशवे, मराठे यांसह समाजातील सर्व जातीवर्गाचे सैनिक सहभागी झाले होते. या युद्धात इंग्रजांनी पेशव्यांचा म्हणजे भारतियांचा पराभव केला; परंतु काहींनी जाणीवपूर्वक हे युद्ध ‘इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये झाले’, असा विपर्यास करून त्याला जातीयवादी स्वरूप दिले, असे सेंगर यांनी त्यांच्या पत्रकात पुढे म्हटले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *