Menu Close

ऐतिहासिक रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंद करा !

हिंदु जनजागृती समितीचे रायगड उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

रायगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधकारी श्रीमती स्नेहा उबाळे (सर्वांत डावीकडे) यांना निवेदन देतांना डावीकडून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विशाखा आठवले, श्री. गिरीश जोशी आणि श्री. उदय तेली

रायगड – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ‘किल्ले रायगडा’वर धर्मांधांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले. या प्रकरणी त्वरित आवाज उठवल्याने हे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले असले, तरी हे बांधकाम कुणी केले अन् कोणत्या उद्देशाने केले, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. या दृष्टीने दोषींवर गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने रायगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून गुन्हा नोंद का करत नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) या वेळी समितीच्या सौ. विशाखा आठवले, श्री. गिरीश जोशी आणि श्री. उदय तेली हे उपस्थित होते.

मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,

१. सामाजिक माध्यमांवर याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. किल्ल्यावरील ‘मदार मोर्चा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागी ‘मशीद मोर्चा’ असल्याचा अपप्रचार करून त्या जागेला पांढरा रंग फासून तेथे हिरवी-लाल चादर चढवण्यात आली होती. रायगडावरील ‘टकमक टोका’ला समांतर राहून गडाखाली आल्यावर शत्रूवर मारा करण्यासाठी पूर्वी एक चौकी होती, त्या भागाला आता ‘मदार मोर्चा’ म्हणतात.

२. ऐतिहासिक स्थळांवर असे प्रकार होणे, हे अत्यंत संतापजनक असून रायगड किल्ल्याचे पावित्र्य भंग करण्याचा हा प्रकार आहे. तसेच यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न दिसून येतो.

३. किल्ले विशाळगडावर पुरातत्व विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे १०० हून अधिक लहान-मोठी अतिक्रमणे झालेली आहेत. दुसरीकडे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी उघड्यावर आहेत. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर होत असलेले अतिक्रमण हा गंभीर विषय आहे. ही अतिक्रमणे तात्काळ हटवणे, हे प्रशासनाचे कर्तव्यच आहे.

४. या प्रकरणी ज्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे घडले, त्यांच्यावर आणि ज्या धर्मांधांनी हे कृत्य केले, त्या सर्वांवर तात्काळ गुन्हे नोंद झाले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे, तसेच किल्ले रायगडाप्रमाणे राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का ? याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी.

५. आमच्या मागण्यांवर पुरातत्व  विभाग आणि प्रशासन यांनी कृती न केल्यास हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी राज्यभरात आंदोलन छेडेल. छत्रपती शिवरायांच्या वास्तूंवर होत असलेली अतिक्रमणे कदापि सहन केली जाणार नाहीत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *