विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समिती, विजयदुर्ग ग्रामविकास समिती आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी
Share On :
देवगड (जि. सिंधुदुर्ग) – विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी काही निधी पुरातत्व विभागाकडे वर्ग करण्याची आवश्यकता आहे; मात्र हा निधी कशा प्रकारे द्यायचा, याविषयी खात्याशी चर्चा करण्यात येईल. याविषयी लवकरच धोरण ठरवण्यात येईल, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांच्या शिष्टमंडळाशी विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाविषयी चर्चा करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.
हिंदु जनजागृती समितीने गडकोट रक्षण आणि संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. ७ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्यासह विजयदुर्ग किल्ल्याची पहाणी केली. त्या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. या वेळी हिंदु जनजागृती समितीने किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाची प्रत के. मंजुलक्ष्मी यांना दाखवली.