Menu Close

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास कारवाई ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, कोल्हापूर

अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकांकडून विविध अन्न व्यावसायिकांची पडताळणी मोहीम राबण्यात येणार !

कोल्हापूर – अन्न व्यावसायिक विविध खाद्यपदार्थ सिद्ध करून ते ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पृष्ठांमधून देतांना आढळल्यास त्यांच्यावर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत’ कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या कागदाची शाई आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असल्याने अशा कागदांच्या वापरास कायद्यानुसार बंदी आहे. या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे व्यावसायिक हे तरतुदींचे पालन करत असल्याची शहानिशा करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षा अधिकारी यांची पथके तैनात केली असून सध्या विविध अन्न व्यावसायिकांची पडताळणी मोहीम चालू आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

श्री. मोहन केंबळकर

गृहिणींनीही पोळी ठेवण्याच्या बुट्टी/भांड्यामध्ये वर्तमानपत्राचा अथवा मासिकाचा कागद वापरू नये. त्याऐवजी स्वच्छ कापडाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आरोग्य साहाय्य समितीच्या निवेदनावर अन्न आणि औषध प्रशासन साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक !

या विषयाच्या संदर्भात मागणीचे निवेदन आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांना ४ जानेवारी या दिवशी देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर ‘या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू आणि प्रसिद्धी पत्रक काढून संबंधितांना सूचित करू’, असे आश्वासन साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिले होते. त्यानुसार तात्काळ कार्यवाही करत मोहन केंबळकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढले.

(आरोग्य साहाय्य समितीने निवेदन दिल्यानंतर तात्काळ कार्यवाही करत प्रसिद्धीपत्रक काढणारे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांचे अभिनंदन ! असे कर्तव्यदक्ष अधिकारी सर्वत्र हवेत आणि यांचे अनुकरण इतर प्रशासकीय अधिकारी यांनी करावे, ही अपेक्षा ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *