मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावरील ‘नाय वरण भात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रसारित !
मुंबई – मुंबईतील कापड गिरण्या बंद झाल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित ‘नाय वरण भात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये अश्लील आणि हिंसक दृश्यांचा भडीमार करण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मराठी मुलांना निर्दयी हत्यारे आणि वासनांध दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ इतका हिंसक आणि व्यभिचारी दृश्यांनी भरलेला आहे की, यातून गिरणी कामगारांच्या मुलांचे चुकीचे चित्रण समाजात पोचण्याची शक्यता अनेकांनी सामाजिक माध्यमांवर व्यक्त केली आहे.
लेखक जयंत पवार यांच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट १४ जानेवारी या दिवशी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रौढांसाठी असला, तरी त्यामधील भडक आणि हिंसक दृश्ये सामाजिक माध्यमांतून प्रसारित होण्यामुळे गुन्हेगारी आणि व्यभिचार यांना प्रोत्साहन देणारी ठरतील, अशी शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.
सोलापूर जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे ‘ऑनलाईन’ तक्रार !सोलापूर – मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावरील ‘नाय वरण भात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नरेंद्र हिरावत, श्रेयस हिरावत, सहनिर्माता विजय शिंदे, एन्.एच्. स्टुडिओ, नाईनटी नाईन प्रॉडक्शन यांसह अन्य संबंधितांवर गुन्हा नोंद करावा, अशी ‘ऑनलाईन’ तक्रार सौ. अलका प्रभाकर कोळेकर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, चित्रपटात बालकांचा अयोग्य वापर करून त्याद्वारे अर्थार्जन करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांवर लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण २०१२ या कायद्याअंतर्गत आणि अन्य संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा. |