Menu Close

महिला आणि बाल लैगिक दृष्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला !

सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा चित्रपट बनवणार्‍या महेश मांजरेकर यांनी मराठीजनांची माफी मागावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा आगामी चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर पाहिल्यावर मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात इतक्या खालच्या दर्ज्याची कलाकृती कदाचित झाली नसेल, असे लक्षात येते. चित्रपटाच्या ट्रेलरमधून गिरणी कामगारांच्या स्त्रिया आणि त्यांची मुले यांच्याबद्दल अत्यंत चुकीची दृश्ये आणि संवाद दाखवण्यात आले आहेत. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे आणि मराठीचा स्वाभिमान जागवणारे हेच ते महेश मांजरेकर आहेत का, असा प्रश्‍न यानिमित्ताने आम्हाला पडला आहे. अत्यंत घाणेरड्या शिव्या, बालगुन्हेगारी, लहान मुलांसह अश्‍लील दृश्ये अशा अनेक गोष्टी या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसून येतात. सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा चित्रपट बनवणार्‍या महेश मांजरेकरांनी समस्त मराठीजनांची माफी मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर पाहून महाराष्ट्रसह देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग’, ‘राष्ट्रीय महिला आयोग’ आणि ‘राज्य महिला आयोग, महाराष्ट्र’ यांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवत केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याची सेन्सॉर बोर्डाने अनुमती कशी काय दिली, असा प्रश्‍न असून याची चौकशी झाली पाहिजे. तसेच या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट आजिबात देता कामा नये, अशी मागणीही समितीने केली आहे.

मद्यविक्री करणार्‍या दुकानांना महापुरुषांची नावे न देण्याच्या शासन निर्णयाचे स्वागत !

दुकाने आणि आस्थापने यांच्यावरील नामफलक मराठी भाषेत असण्याची सक्ती करणारा, तसेच बिअरबार अन् दारूची दुकाने यांना राष्ट्रपुरुष, महनीय महिला अन् गड-किल्ले यांची नावे न देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. गेली अनेक वर्षे देवता, राष्ट्रपुरुष, संत आणि श्रद्धास्थाने यांची नावे दारूची दुकाने अन् बिअर बार यांना देण्यात येऊ नयेत, म्हणून हिंदु जनजागृती समितीने सरकार दरबारी आवाज उठवत मागणी केली होती. गेल्या 10 वर्षांत समितीने सर्वपक्षीय अनेक लोकप्रतिनिधींना या संदर्भात निवेदने दिली होती. आमची ही मागणी मान्य करत सरकारने महापुरुषांचा अपमान रोखण्यासाठी एक पाऊल उचलले आहे, असे आम्ही मानतो आणि ठाकरे सरकारचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *