Menu Close

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

  • हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !

  • हिंदु जनजागृती समितीचे राधानगरी आणि कागल येथे निवेदन

कागल येथील डी.आर्. माने महाविद्यालयात एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतांना कु. शिवलीला गुब्याड

कोल्हापूर – मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले असून त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत महाराष्ट्र शासनानेही राज्यात ‘प्लास्टिक बंदी’चा निर्णय घेतल्याने त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’ हे कायदाविरोधी आहे. तरी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन १० जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राधानगरी आणि कागल येथे देण्यात आले.

राधानगरी तहसीलदार श्रीमती मीना निंबाळकर यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी
कागल येथील शिल्पा ठोकडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

कागल येथे तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री दशरथ डोंगळे, रूद्राप्पा पाटील, समर्थ सणगर आणि समितीचे श्री. संतोष सणगर सहभागी होते. राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती मीना निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री सागर डवरी, आदित्य केसरकर, सौरभ केसरकर, पद्युम्न भाकरे उपस्थित होते.

कागल येथील शिल्पा ठोकडे (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा उपक्रम राबवा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध शाळांमध्ये निवेदन

कोल्हापूर – भावी पिढी राष्ट्राभिमानी व्हावी, या उदात्त हेतूने समिती गेली १९ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वाटणे, फ्लेक्स लावणे, रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री रोखणे आदी कृती करत आहे. या दृष्टीने शासनाचे सर्व नियम पाळून शाळेत प्रत्यक्ष अथवा ‘ऑनलाईन’च्या माध्यमांतून याविषयी जागृती करण्याची अनुमती मिळावी, या मागणीचे निवेदन कागल आणि मत्तीवडे येथे विविध शाळांमध्येही देण्यात आले.

मत्तीवडे येथील सरकारी मराठी विद्यालयात विद्यार्थ्यांना विषय सांगतांना कु. शिवलीला गुब्याड

१. ५ शाळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कु. शिवलीला गुब्याड यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यात ‘एन्.सी.सी.’च्या (राष्ट्रीय छात्र सेना) विद्यार्थ्यांचाही समावेश होता. याचा लाभ १४० विद्यार्थ्यांनी घेतला. निवेदन देण्याच्या उपक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील ६ धर्मप्रेमी युवती सहभागी झाल्या होत्या.

२. सर्वच शाळांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक करून ‘तुम्ही पुष्कळ चांगले कार्य करता’, असे सांगितले. कागल येथील ‘डी.आर्. माने महाविद्यालयात’ निवेदन स्वीकारल्यावर तेथील शिक्षकांनी ‘तुमचे निवेदन काचफलकात लावू आणि ‘व्हॉटस्ॲप गटा’द्वारे सर्वत्र पाठवू’, असे सांगितले.

पट्टणकोडोली ग्रामपंचायत येथे निवेदन देतांना धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

३. सांगवडे, हालसवडे, वसगडे आणि पट्टणकोडोली आणि सांगवडेवाडी येथील ५ शाळा आणि ४ ग्रामपंचायती यांमध्ये निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. ऋषिकेश खोचगे, श्री. अभिषेक  सुतार, श्री. सुशांत कांबळे उपस्थित होते.


समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाच्या प्रबोधनाच्या संदर्भात सिद्ध करण्यात आलेली ध्वनीचित्रफीत प्रसारित करण्याचा प्रयत्न करू ! – स्नेहलता कुंभार, मुख्याधिकारी, हुपरी, कोल्हापूर

हुपरी (जिल्हा कोल्हापूर ) – ‘हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात राबवत असलेला उपक्रम योग्य असून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाच्या प्रबोधनाच्या संदर्भात सिद्ध करण्यात आलेली ध्वनीचित्रफीत केबलद्वारे, तसेच अन्य ठिकाणी प्रसारित करण्याचा प्रयत्न करू’, असे आश्वासन हुपरी येथे मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना निवेदन दिल्यावर त्यांनी हे आश्वासन दिले. या वेळी हुपरी नगराध्यक्षा जयश्री गाठ, उपनगराध्यक्ष राजाभाऊ वाईंगडे, तसेच स्वीकृत नगरसेवक सुभाष कागले उपस्थित होते.

महाविद्यालयात निवेदन दिल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देण्याचे महाविद्यालयांचे आश्वासन !

समितीच्या वतीने हुपरी येथे शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल आणि परीसन्ना इंग्रोळी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी.आर्. भिसे यांना निवेदन देण्यात आल्यावर त्यांनी ‘उपक्रम चांगला असून या सूचना विद्यार्थ्यांना देऊ’, असे सांगितले. जनता विद्यालय हुपरीचे मुख्याध्यापक डी.ए. पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यावर उपक्रमाचे कौतुक करून ‘महाविद्यालयांचे कामकाज पूर्ववत् झाल्यावर समितीच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्यावर व्याख्यान घेऊ’, असे सांगितले. चंद्रबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती पाटील यांना निवेदन दिल्यावर त्यांनी त्वरित उपप्राचार्यांना बोलावून सदरच्या विषय ‘व्हॉटस्ॲप’च्या माध्यमातून गटांमध्ये पाठवण्याच्या सूचना केल्या, तसेच लवकरच ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेऊ, असे सांगितले.

हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खराडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी ‘असे प्लास्टिक ध्वज अथवा ‘तिरंगा मास्क’ आढळल्यास कारवाई करू’, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी साप्ताहिक ‘कलादर्पण’चे संपादक संजय पाटील, ‘लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थे’चे शहराध्यक्ष नितीन काकडे, ‘सद्गुरु बहुउद्देशीय’ संस्थेचे रवींद्र गायकवाड, धर्मप्रेमी सर्वश्री रामभाऊ मेथे, संभाजी काटकर, प्रसाद देसाई, गणेश घोरपडे, ओंकार फडतारे, हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *