Menu Close

पंजाबला भारतापासून तोडण्यासाठी खलिस्तानवाद्यांना सोबत घेऊन छुपे युद्ध चालू ! – श्री. प्रविण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र

‘पंजाबला भारतापासून तोडण्याचे षड्यंत्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

पंजाबमधील एका न्यायालयात एका माजी पोलीस कर्मचार्‍यांद्वारे बाँबस्फोट घडवला जातो, सीमावर्ती क्षेत्रात आर्.डी.एक्स.ने भरलेली बस सापडते, पाकमधून ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थ पंजाबमध्ये पाठवली जात आहेत, हे सर्व पाहता पंजाबमध्ये काही देशविरोधी तत्त्वे कार्यरत आहेत. त्यांनी खलिस्तानवाद्यांना सोबत घेतले आहे. देशाच्या विरोधात छुपे युद्ध (‘प्रॉक्सी वॉर’) प्रारंभ केले आहे. मात्र ते या युद्धात कधी यशस्वी होणार नाहीत; कारण पंजाबमधील जनता भारतासोबत आहे. पंजाब सरकारने जागृत होऊन राज्य आणि सीमावर्ती भाग सुरक्षित ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक तथा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे अध्यक्ष श्री. प्रवीण दीक्षित यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘पंजाबला भारतापासून तोडण्याचे षड्यंत्र !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

या वेळी ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ता तथा सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, खलिस्तानी चळवळीने चीन, पाकिस्तान आणि इस्लामी आतंकवादी यांच्याशी हात मिळवला असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे. भारताच्या इतिहासात शिखांचे मोठे योगदान आहे; मात्र शेतकरी आंदोलनाच्या माध्यमांतून शिखांना उतरवून सरकारने त्यांच्यावर गोळीबार करावा, असे वातावरण अनेकदा खलिस्तानवाद्यांनी निर्माण केले; मात्र सरकारने बळाचा वापर केला नाही. पण तसे झाले असते, तर त्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा मोठा डाव होता. पंतप्रधानांची गाडी अडवण्यामागेही मोठे षड्यंत्र आखले गेले होते. या वेळी अमेरिका येथील मां राज्यलक्ष्मी म्हणाल्या की, ‘भारताला धर्मांतरित करा आणि नंतर भारताला नियंत्रित करून भारताला तोडा’, यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून षड्यंत्रे चालू आहेत. मिशनरी, पाकिस्तानी, चीन, आंतरराष्ट्रीय समूह आदी कार्यरत आहे. त्यात खलिस्तानी चळवळ, इस्लामी आतंकवाद, ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद, ‘सीएए’विरोधी आंदोलने, शेतकारी आंदोलने, हिंदूंच्या देवतांचा जाणीवपूर्वक अवमान करणे आदी अनेक कृत्ये जाणीवपूर्वक केली जात आहेत. हे एक वैश्‍विक षड्यंत्र आहे.

या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले की, वर्ष 1984 ची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. शीख पंथ हा जातीयवादी वा देशद्रोही नाही. विविध जातींना सन्मान देऊन ‘पंचप्यारे’ ही संकल्पना शिखांचे गुरु गोविंदसिंह यांनी मांडली; मात्र काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी हे दलित शीख असल्याचा प्रचार करून काँग्रेसने साक्षात् गुरु गोविंदसिंह यांचा अपमान केला आहे. वर्ष 2014 पर्यंत शिख आणि त्यांच्या गुरूंचा छळ करणार्‍या औरंगजेबाच्या नावाने दिल्लीत एक महामार्ग होता. कधी काँग्रेसने ते नाव पालटले नाही. काँग्रेसने एकप्रकारे शिखांचा अपमानच केला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *