Menu Close

धर्मांधांच्या लांगूलचालनासाठी कल्याण येथील दुर्गाडी गडावर मंदिराच्या वास्तूचा निर्णय होऊनही नमाजपठणाला अनुमती !

  • तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांकडून हिंदूंच्या उत्सवाला आडकाठी आणि अर्ध्या गडावर हिंदूंना प्रवेशबंदी !
  • ईदगाहचा विषय ४८ वर्षे न्यायप्रविष्ट असूनही तेथे जाणार्‍या मार्गाचे ‘ईदगाह मार्ग’ असे नामकरण !
दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिर

ठाणे – कल्याण येथील शिवकालीन दुर्गाडी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले श्री दुर्गादेवीचे मंदिर आणि त्याच्या मागे धर्मांध दावा करत असलेला ‘ईदगाह’ आहे. येथील श्री दुर्गादेवीचे ‘मंदिर’ हे ‘मशीद’ असल्याचा दावा वर्ष १९६८ मध्ये कल्याणमधील काही धर्मांधांनी केला. याविषयी वर्ष १९७० मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने ठाण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचा आदेश दिला. चौकशीनंतर एक नोटीस काढून ‘दुर्गाडी गडावरील वास्तू मंदिरच आहे’, असा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र धर्मांधांसाठी ‘मंदिराच्या मागील बाजूला ईदच्या दिवशी वर्षातून २ वेळा नमाजपठण करावे’, यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी अनुमती दिली. नमाजपठण होत असल्यामुळे त्या कालावधीत गडावर उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस हिंदूंनाच आडकाठी करत आहेत, तसेच गडाच्या अर्ध्या भागावर हिंदूंना प्रवेशबंदीही करण्यात आली आहे. (जर मंदिरच आहे, तर नमाजपठण करण्याचा प्रश्नच येत नाही. मंदिर असूनही शेजारी नमाजपठणाची अनुमती दिली जाणे, हा निवळ मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा प्रकार तत्कालीन प्रशासनाने सरकारच्या सांगण्यावरून केला असणार, हे कुणी वेगळे सांगायला नको ! – संपादक)

विधीमंडळातील प्रश्नोत्तरातून दुर्गाडी येथे मंदिरच असल्याचे स्पष्ट

दुर्गाडी किल्यावरील ‘श्री दुर्गादेवीचे मंदिर ही मशीद आहे का ?’, असा प्रश्न तत्कालीन आमदार ग.भा. कानिटकर यांनी त्या वेळी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर २२ मार्च १९७३ या दिवशी तत्कालीन महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी ‘दुर्गाडी गडावरील वास्तू ‘मंदिर’ आहे’, असे उत्तर दिले होते. तसेच ‘ही वास्तू ‘देऊळ’ म्हणून वापरण्याची हिंदु जमातीची परंपरा आहे’, असे सांगितले. वर्तक यांच्या उत्तरातून सरकारची भूमिका स्पष्ट झाली होती.

गडावर ‘ईदगाह’ असल्याचा दावा ४८ वर्षांनंतरही प्रलंबित !

मंदिराच्या मागच्या बाजूला असलेली जागा ‘ईदगाह’

दुर्गाडी गडावरील वास्तू मंदिर असल्याचा जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय न पटल्याने धर्मांधांनी त्या विरोधात कल्याण जिल्हा न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यामध्ये मंदिराच्या मागच्या बाजूला असलेली जागा ‘ईदगाह’ असल्याचा दावाही त्यांनी केला. विशेष म्हणजे ‘ईदगाह’च्या भिंतीला दोन्ही बाजूला मिनार (मनोरे) असतात, तसेच उपस्थित मुसलमानांना संबोधित करण्यासाठी मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) उभे रहाता यावे, यासाठी जागा केलेली असते. यांतील कोणताही भाग येथे नाही. दुर्गाडी गडावर पूर्वापार चालत आलेल्या हिंदूंच्या उत्सवांची छायाचित्रेही हिंदूंनी न्यायालयात सादर केली आहेत; मात्र मागील ४८ वर्षांनंतरही हा दावा न्यायालयात रखडला आहे. (गडावर ‘ईदगाह’ असल्याविषयी कोणताही ठोस पुरावा नसतांना, तसेच गडावर केवळ हिंदूंचेच उत्सव साजरे होत असल्याचे सर्व पुरावे सादर करूनही इतकी वर्षे खटला प्रलंबित रहाणे, हा याचिकाकर्त्यांवर एकप्रकारे अन्यायच आहे ! – संपादक)

विषय न्यायप्रविष्ट असूनही धर्मांधांकडून गडाच्या बाजूच्या मार्गाचे ‘ईदगाह मार्ग’ असे नामकरण !

दुर्गाडी गडावरील ही भिंत ‘ईदगाह’ आहे कि नाही ? हा विषय न्यायप्रविष्ट आहे. असे असतांना दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूच्या मार्गाचे ‘ईदगाह मार्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवक महंमत तानकी यांचे नाव असलेला तसा फलकही रस्त्याच्या बाजूला लावण्यात आला आहे. (प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना मार्गाला ‘ईदगाह’ असे नामकरण करणे, हा धर्मांधांचा उद्दामपणा आहे. सर्वपक्षीय सरकारने आतापर्यंत केलेल्या लांगूलचालनाचा हा परिणाम होय ! धर्मांधांना घाबरून त्यांच्यावर कुणी कारवाई करायला धजत नाही, हेच सत्य आहे ! – संपादक)

मंदिराविषयी ठोस ऐतिहासिक पुरावे असूनही धर्मांधांचा तेथे मशीद असल्याचा दावा !

दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवी मंदिराचे शिवकालापासूनचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. वर्ष १६८९ मध्ये मातबरखान याने कल्याण जिंकल्यावर लिहिलेल्या पत्रात दुर्गाडी गड जिंकल्याचा उल्लेख आहे. वर्ष १७१९ मध्ये रामचंद्र जोशी यांनी मोगलांकडून दुर्गाडी गड परत जिंकून घेतला. वर्ष १७४९ मध्ये कल्याणचे सुभेदार वासुदेव जोशी यांनी दुर्गाडी गडावर दुर्गादेवीचा उत्सव केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. पेशव्यांच्या इतिहासात दुर्गाडी गडावरील दुर्गादेवीच्या पूजेसाठी वेदमूर्ती महादेव गोडबोले यांची नियुक्ती केल्याचाही उल्लेख आहे. असे अनेक संदर्भ असूनही, तसेच मंदिराची स्पष्ट वास्तू दिसत असूनही धर्मांधांनी हे मंदिर म्हणजे मशीद असल्याचा दावा केला. यातून हिंदूंची धार्मिक स्थळे, गड-दुर्ग यांवर दावा करून ते बळकवण्याचा धर्मांधांचा हेतू दिसून येतो.

धर्मांधांच्या दाव्यापायी सर्वपक्षीय सरकारकडून हिंदूंना वेठीस धरण्याचा प्रकार !

वर्ष १९६८ मध्ये कल्याण येथील धर्मांधांनी दुर्गाडी गडावरील मंदिरावर हक्क सांगितल्यावर त्याला कोणताही आधार नसतांना पोलिसांनी मंदिरात उत्सव साजरा करण्यावर निर्बंध आणले, ते अद्यापही चालूच आहेत. सद्य:स्थितीत मंदिराच्या मागील भिंतीच्या ठिकाणी बकरी ईद आणि रमजान ईद या दिवशी धर्मांध गडावर नमाजपठण करण्यासाठी येतात. त्या वेळी हिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येतो. मंदिरातील पुजार्‍यालाही पोलीस मंदिरात सोडत नाहीत. मंदिराची घंटाही बांधून ठेवली जाते. मागील ४० हून अधिक वर्षे ही भिंत असलेल्या गडाच्या अर्ध्या भागात हिंदूंना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. (एखाद्या मशिदीवर हिंदूंनी दावा केला असता, तर पोलिसांनी तेथे प्रवेश करायला हिंदूंना आडकाठी केली असती. येथे कोणताही आधार नसतांना धर्मांध हे हिंदूंच्या धार्मिक ठिकाणावर अधिकार सांगत असतांना त्यांना आडकाठी करण्याऐवजी पोलीस आणि सरकार हिंदूंवर आडकाठी आणत आहेत. यातून पोलीस आणि राजकारणी यांचा मुसलमानधार्जिणेपणाच दिसून येतो. देशात बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या समाजाला अशी दुय्यमतेची वागणूक केवळ भारतात मिळते, हे लक्षात घ्या ! – संपादक)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *