|
-
गोरक्षक आणि पोलीस गंभीर घायाळ
-
नगरसेवक खलिफा कुरेशीसह ४ जणांवर गुन्हा नोंद
धाराशिव – येथील खिरमणीमळा भागामध्ये ५ फेब्रुवारीच्या रात्री अवैध पशूवधगृहावर कारवाई करण्यासाठी गेलेले ३० ते ४० पोलिसांचे पथक आणि गोरक्षक यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले. यामध्ये मानद पशूकल्याण अधिकारी धन्यकुमार पटवा, अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे प्रशांत परदेशी, सतीश सिरसिल्ला, तसेच बजरंग दलाचे गोसेवा जिल्हाध्यक्ष सिद्राम चरकुपल्ली, बजरंग दलाचे सहसंयोजक पवनकुमार कोमटी यांच्यासह पोलीस कर्मचारी गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
१. या प्रकरणी नगरसेवक खलिफा कुरेशी, त्याचा भाऊ कलीम कुरेशी आणि अन्य ४ जण यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले असून खलिफा आणि कलीम कुरेशी पसार झाल्याची माहिती आहे. गोवंशियांची हत्या करण्यासाठी वापरण्यात येणार्या हत्याराने गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केल्याने ते गंभीर घायाळ झाले आहेत.
२. धाड टाकलेल्या पशूवधगृहामध्ये २५० गोवंशीय कापलेल्या अवस्थेत आढळून आले, तर गोमांसाची वाहतूक करण्यासाठी ८ ते १० वाहने उभी होती. ही कारवाई करण्यासाठी महिला पोलीस अधीक्षक नीवा जैन यांचे मोलाचे साहाय्य लाभले. त्यांच्यामुळेच गोरक्षकांचे प्राण वाचले.
कसायांना कुणाचेही भय राहिले नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ! – महेश भंडारी, पीपल फॉर ॲनिमल सोलापूर
काही दिवसांपूर्वी मुंबई येथे पशूकल्याण अधिकारी आशिश बारीक यांच्यावरही प्राणघातक आक्रमण करण्यात आले होते. ही घटना ताजी असतांनाच धाराशिव येथेही अशाच प्रकारची घटना घडली. हे प्रकार वाढले असून कसायांना कुणाचेही भय राहिलेले नाही. कसायांची ही प्रवृत्ती वाढत असून शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. |