सोलापूर येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन
सोलापूर – भारतात बहुसंख्य हिंदू आहेत; मात्र ते पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे कोट्यवधी भारतियांमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. भारतीय संस्कृतीत १ दिवसच नव्हे; तर वर्षभरातील ३६५ दिवस प्रेम करायला शिकवले आहे. संतांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) हे वचन सांगितले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे सध्या शेकडो हिंदू धर्मांतराला बळी पडत आहेत. त्यामुळे हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयात स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे युवा पिढीने ‘व्हॅलेंटाइन डे’ सारख्या कुप्रथांना बळी न पडता छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन प्रत्येक हिंदूमध्ये धर्माविषयी जागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले.
१४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार थांबावेत, यासाठी प्रबोधनपर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन ६ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १०० हून अधिक जिज्ञासू ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी झाले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनीही धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले, तसेच सूत्रसंचालन धर्मप्रेमी श्री. ओंकार बाबर यांनी केले.
क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेऊन राष्ट्र आणि धर्म यांचे पालन करूया ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती
सध्या भारतीय संस्कृतीचा र्हास होत चालला आहे. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे देशात ‘व्हॅलेंटाइन डे’ हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून यामागे कोणतेही शास्त्र नाही. या दिवशी अनेक हिंदू युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले जाते. यासमवेतच अश्लील कृती करणे, बळजोरी करणे, फूस लावून पळवून नेणे, हिंदु युवतींचे बळाने धर्मांतर करणे, असे प्रकार ‘व्हॅलेंटाइन डे’ सारख्या विकृतीमुळे घडत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी युवा वयात राष्ट्ररक्षणार्थ स्वत:चे प्राण त्यागले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन राष्ट्र आणि धर्म यांचे पालन करूया.
विशेष
धर्मप्रेमींनी व्याख्यान ऐकून ‘व्हॅलेंटाइन डे’विषयी जनजागृती करण्याचा केला निश्चय !
धर्मप्रेमींनी व्याख्यान ऐकल्यावर ‘व्हॅलेंटाइन डे’विषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी कृती करण्याचा निश्चय केला. यामध्ये हस्तपत्रकाद्वारे प्रबोधन करणे, युवक आणि युवती यांच्या प्रबोधनासाठी बैठका घेऊन जागृती करणे; महाविद्यालय, पोलीस आणि प्रशासन यांना गैरप्रकार रोखण्यासाठी निवेदन देणे, असे प्रयत्न करण्याचे ठरवले.
अभिप्राय
१. श्रीमती स्वाती शिंदे, सातारा – ‘व्हॅलेंटाइन डे’ विषयी प्रबोधन करणारा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. सर्व विषय योग्य पद्धतीने सादर करण्यात आला. या मार्गदर्शनासाठी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये आणि त्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद !
२. सौ. वनिता पारपेल्ली, संभाजीनगर – व्याख्यानातील विषय प्रथमच ऐकला. त्यामुळे महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.