Menu Close

बुरखा आणि हिजाब हे मुसलमान महिलांवरील अत्याचार अन् अपमान यांचे प्रतीक ! – तस्लिमा नसरीन

उजवीकडे बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – बुरख्याद्वारे स्वत:ला झाकणे, हा मी अधिकार समजत नाही, तर ते स्त्रीवरील अत्याचाराचे प्रतीक आहे. बुरखा आणि हिजाब (मुसलमान महिलांचा गळा अन् मान झाकण्याचे वस्त्र) यांचा ‘महिलांना लैंगिक वस्तू बनवणे’, हा एकच उद्देश आहे. हे कपड्यांचे तुकडे मुसलमान महिलांवरील अत्याचार आणि अपमान यांचे प्रतीक आहेत. स्त्रियांना पहाताच लाळ गाळणार्‍या पुरुषांपासून स्त्रियांना स्वत:ला लपवावे लागते, ही वस्तूस्थिती स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही सन्माननीय नाही, असे मत बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘द प्रिंट’ या वृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखात व्यक्त केले आहे.

तस्लिमा नसरीन यांनी लेखात मांडलेली सूत्रे

१. जेव्हा एखाद्या महिलेला हिजाब घालण्यास बाध्य केले जाते, अशा वेळी मी हिजाब फेकून देण्याच्या बाजूने उभी असते. व्यक्तीश: मी हिजाब आणि बुरखा यांच्या विरोधात आहे. ‘महिलांना बुरखा घालण्यास भाग पाडणारे हे पितृसत्ताक षड्यंत्र आहे’, असे मला वाटते.

२. हिजाबवरून होत असलेला संघर्ष रोखण्यासाठी समान नागरी कायदा आणि एकसमान गणवेश आवश्यक आहे. धर्माचा अधिकार हा शिक्षणाच्या अधिकारापेक्षा वरचा नाही.

३. बुरखा आणि हिजाब ही स्त्रीची निवड कधीच असू शकत नाही. निवडी काढून घेतल्यावरच ते परिधान करावे लागतात. राजकीय इस्लामप्रमाणेच बुरखा आणि हिजाब हेदेखील आज राजकीय आहे. कुटुंबातील लोक महिलेला बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडतात. हे लहान वयापासून सतत बुद्धीभेद केल्याचा परिणाम आहे. बुरखा आणि हिजाब यांसारखे धार्मिक पोशाख, ही व्यक्तीची ओळख कधीच असू शकत नाही.

४. फाळणीच्या ७४ वर्षांनंतरही हिंदु आणि मुसलमान यांच्यामधील अंतर अल्प झालेले नाही. पाकिस्तान भारतापासून वेगळे होऊन ‘धार्मिक राष्ट्र’ बनले आहे; पण भारताला कधीच ‘पाकिस्तान’ व्हायचे नव्हते. ते ७४ वर्षांपूर्वी सहज ‘हिंदु राज्य’ बनू शकले असते. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करते, धर्माचे नाही. बहुसंख्य हिंदू लोकसंख्या असलेला भारत जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुसलमान लोकसंख्या असलेला देश आहे. भारताचे कायदे सर्व धर्म, जाती, भाषा, पंथ आणि संस्कृती यांतील लोकांना समान अधिकार देतात.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *