साम्यवाद्यांच्या केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का ?
अलप्पुझा (केरळ) – येथे सरथ चंद्रन् या भाजपच्या कार्यकर्त्याची १६ फेब्रुवारीच्या रात्री हरिपद भागामध्ये चाकू भोसकून हत्या करण्यात आली. सरथ हे कुमारपूरम्च्या जवळ असलेल्या वरयंकोडे येथे रहाणारे होते. एका मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या वादावरून ही हत्या करण्यात आली. ‘नंदू प्रकाश हा हत्येचा मुख्य आरोपी आहे. या हत्येमागे अमली पदार्थ माफियांचा हात आहे’, असे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी या माफियांनी येथील २ तरुणांचीही हत्या केली होती. अलप्पुझामध्येच गेल्या वर्षी १९ डिसेंबरला भाजपचे ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजीत श्रीनिवासन् यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ या धर्मांध संघटनेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.