अमेरिका हे म्हणू शकते, तर मग भारतातील केंद्रशासन असे का म्हणत नाही आणि तेथील हिंदूंच्या साहाय्यासाठी कृती का करत नाही ?
वॉशिंग्टन : बांगलादेशमधील स्थिती पुष्कळ गुंतागुंतीची आणि धोकादायक आहे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले. बांगलादेशमध्ये गेल्या काही मासांपासून धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडणार्यांची निर्घृण हत्या केली जात आहे. या हत्यांचे दायित्व इसिस आणि अल् कायदासारख्या संघटनांनी स्वीकारली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनर म्हणाले, बांगलादेश शासनाने या घटनांची सखोल चौकशी करावी, अशी आमची इच्छा आहे. यामागे कोणत्या संघटना आणि व्यक्ती आहेत, त्यांचेही अन्वेषण करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत अनेक संघटनांनी या आक्रमणांचे दायित्व स्वीकारल्याचे दावे केले आहेत. गेल्या काही मासांत तेथे निर्घृण हत्या झाल्या आहेत. बांगलादेशच्या शासनाने त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचललीच पाहिजेत.
अल् कायदा आणि इसिसने या आक्रमणांचे दायित्व स्वीकारले असले, तरीही बांगलादेशच्या शासनाने त्यांचे दावे फेटाळले आहेत. या हत्यासत्रांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी दूरभाषवरून चर्चाही केली. या वेळी आतंकवादी घटकांना निपटून काढण्यासाठी आणि या हत्यासत्रांच्या अन्वेषणासाठी जॉन केरी यांनी बांगलादेशला अमेरिकी यंत्रणांचे साहाय्य देण्याची सिद्धताही दर्शवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात