Menu Close

‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणून भागत नाही : उद्धव ठाकरे, शिवसेना

pu_sambhajirao_bhide_guruji
प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली : शिवरायांनी कोणाचे जबरदस्तीने धर्मांतर केले नाही की कधीही मशिदी पाडल्या नाहीत. त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की तंजावरला जाताना वाटेत मंदिरांच्या मशिदी होत असलेल्या त्यांनी पाहिल्या आणि त्यांचा जिर्णोध्दार करून तेथे त्यांनी पुर्ववत मंदिरे उभी केली. मंदिर वही बनायेंगे असे ते म्हणत बसले नाहीत आणि तसे म्हणून भागतही नाही. हा शिवशाहीचा न्याय होता. राजकारणाच्या सोयीसाठी नव्हे तर आमच्या रक्तातच भगवा आहे. हिंदूस्थानवर भगवा फडकवण्याच्या ध्येयासाठी आम्ही कदापि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही. आम्ही हे स्वप्न साकार करु अशी ग्वाही शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यानिमित्ताने शहरात आज शिवप्रतिष्ठान आणि शिवसेनेच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन झाले. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रात्री झालेल्या या सभेसाठी मोठी गर्दी होती.

ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकार व पुरोगामी निधर्मीवाद्यांवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, “राजकारणात काम करताना आम्ही जरुर काही चुका केल्या असतील. मात्र त्यामागे हिंदुत्वाशी कधीही प्रतारणा हा मुद्दाच नव्हता. आमच्या रक्तातच शिवरायांचा भगवा आहे. अन्य कुठल्या रंगाची कपडे शिल्लक नव्हती म्हणून शिवरायांनी भगवा निवडला ध्वज निवडलेला नाही. हा हिंदुत्वाचा रंग आहे. सर्व जाती धर्मांना, हिंदुस्थानला एकत्र बांधणारा हा रंग आहे. शिवरायांचा हा विचार मानूनच आम्ही जगतो. शिवरायांनी आम्हाला कधीही कुणा धर्माचा-जातीचा द्वेष करायला शिकवेले नाही.

अफजलखानाचा कोथळा फाडताना त्याला शिवरायांनी दगा दिला असे म्हटले जाते तेव्हा त्याने पाठीत खुपसलेला खंजीर विसरला जातो. शिवरायांनी जरुर शत्रूंना दगा दिला असेल. मात्र त्यांनी कधीही मित्रांना दगा दिला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. राजकारणात मागे पुढे होतेच. शिवरायांनाही माघार घ्यावी लागली. मिर्झा जयसिंगासोबत त्यांना तह करावा लागला. कदाचित त्यावेळी प्रसारमाध्यमे असती तर म्हणाली असती की शिवरायांनी माघार घेतली. संपले त्यांचे हिंदुत्व. हिंदूस्थानवर भगवा फडकवण्याच्या ध्येयापासून ते तसूभरही मागे हटले नाहीत. शिवसेना भगव्याची वारसदार आहे. आम्ही हा वारसा घेऊनच राजकारणात आहोत. शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांनी व्यक्त केलेली अपेक्षा आम्ही निश्‍चित पूर्ण करू. या हिंदूस्थानवर आणि महाराष्ट्रावर फक्त भगव्याची सत्ता उभी करू.‘‘

ते म्हणाले, “शिवसेनेला मुस्लिमविरोधी ठरवाताना आमची भूमिका कधीही समजून घेतली जात नाही. या देशाचा शत्रू तो आमचा शत्रू ही भूमिका मुसलमानांची असली पाहिजे. औरंगजेबाच्या किंवा अफजखानाच्या कबरीवर डोके टेकवण्यासाठी जाणाऱ्यांशी आमचे भांडण आहे. आमच्याविरोधात सतत कारस्थान करणाऱ्या पाकिस्तानशी ममत्व बाळगणाऱ्यांशी आमचे भांडण आहे. रोज घुसखोर पाठवणाऱ्यांशी चर्चा कसली करता ? त्यांच्या गीतकारांना आम्ही का येऊ द्यावे ? त्याला विरोध केला की कलेच्या प्रांतात असले भेदभाव नसतात असे तत्वज्ञान आम्हाला शिकवले जाते. जगाच्या पाठीवर एकमेव असा देश असेल की या देशात घुसखोरांना शिक्षा नव्हे तर रेशनकार्ड, आधार कार्ड दिले जाती. बिर्याणी दिली जाते. कदाचित उमेदवारीही दिली जाते.‘‘

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरूजी म्हणाले, “आजकाल शिवरायांची जयंतीचा खूप मोठा उत्साह असतो मात्र अशा जयंती उत्सवांतून शिवरायांचे विचार पुढे जाऊ शकत नाही. शिवरायांचे ध्येय्य काय होते हे समजून घेणारा समाज उभा केला पाहिजे. ते स्वप्न देशातील १२३ कोटी जनतेचे झाले पाहिजे. संपूर्ण देश भगव्याखाली आणण्याचे शिवरायांचे स्वप्न आपण कधीही विसरता कामा नये. त्यासाठी समाजाचे एकत्रित उथ्थान व्हावे आणि संपुर्ण समाज शिवरायांना मानवंदना देण्यासाठी एकत्र यावा यासाठी अशा सभा यापुढे सर्वत्र घेतल्या जाव्यात. त्याची ही सुरवात ठरावी.‘‘

पू. भिडे गुरूजी म्हणाले, “अखंड हिंदूस्थानात भगवा ध्वज फडकवण्याची क्षमता फक्त शिवसेनेतच आहे. हिंदुत्वाच्या गप्पा मारुन भगव्यात हिरवी पाचर मारणाऱ्या काही तथाकथित हिंदुत्ववादी पक्षांमुळे हिंदुत्वाचा विचार पुढे जाणार नाही. शक्तीहिन शिवजयंतीने किंवा केवळ शिवरायांच्या जय जयकारानेही हा विचार पुढे जाणार नाही. १२३ कोटी जनतेचा हिंदुत्वाचा एक प्रवाह झाला पाहिजे.‘‘

यावेळी शिवप्रतिष्ठानच्यावतीने ठाकरे यांना कवड्याची माळ व तलवार देऊन मानपत्र प्रदाण करण्यात आले. त्याचे वाचन हरिहर तानवडे यांनी केले.

संदर्भ : सकाळ

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *