Menu Close

भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्ध सामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला हवा ! – नि. ब्रिगेडियर हेमंत महाजन

ऑनलाईन विशेष संवाद : ‘रशिया-युक्रेन युद्ध : तृतीय महायुद्धाची नांदी ?’

‘रशिया-युक्रेन यांमध्ये युद्ध झाल्यास युक्रेनला पूर्ण साहाय्य करू’ असे अनेक पाश्‍चिमात्त्य देश सांगत होते; मात्र प्रत्यक्षात रशियाने युक्रेनच्या सैन्यासह नागरी वस्त्यांवर आक्रमण केल्यावरही कोणत्याही देशाने युक्रेनच्या साहाय्यासाठी प्रत्यक्ष कोणतीही सैन्य कारवाई केली नाही. त्यामुळे या युद्धात युक्रेन एकटा पडला आहे. या सर्वांचा परिणाम उद्या चीनही अमेरिका आणि पाश्‍चिमात्त्य देशांच्या धमक्यांना न घाबरता थेट तैवान देशाला स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी युद्ध करू शकतो. तैवाननंतर चीनचे पुढील लक्ष्य भारत असू शकतो. रशिया हा चीनचा सर्वांत मोठा मित्र असल्यामुळे भारतालाही पुढील काळात कोणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल. त्यासाठी भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्ध सामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘रशिया-युक्रेन युद्ध : तृतीय महायुद्धाची नांदी ?’ या ‘विशेष ऑनलाईन संवादा’’त ते बोलत होते.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी ब्रिगेडियर महाजन यांच्याशी संवाद साधला. या वेळी विविध प्रश्‍नांना उत्तर देतांना ब्रिगेडियर महाजन पुढे म्हणाले की, युक्रेनच्या साहाय्यासाठी ‘नाटो’चे सदस्य असलेले देश ‘नाटो सैन्य’ पाठवण्यास तयार नाही. ‘नाटो सैन्य’ हे विश्‍वातील सर्वांत सक्षम आणि आधुनिकीकरण झालेले सैन्य आहे. ते कोणतेही युद्ध लढण्यास सक्षम आहे; मात्र पाश्‍चिमात्त्य देशांनी वैज्ञानिक प्रगती करून अनेक बाबतीत आधुनिक झाले असले, तरी त्यांच्यात युद्ध लढण्याची हिंमत नाही. यामुळे विश्‍वभरात ‘नाटो’चे सदस्य’ असलेले देश केवळ धमक्या देतात; पण प्रत्यक्षात काही करत नाहीत, असे चित्र निर्माण होणार आहे. त्यामुळे उद्या चीनकडूनही रशियासारखे अनुकरण होऊन तैवानवर सांगत असलेला अधिकार प्राप्त करण्यासाठी चीन तैवानवर आक्रमण करू शकतो. गेली 8 वर्षे चीनने ‘ग्रे वॉर फेअर झोन’ (प्रत्यक्ष युद्ध न करता सतत युद्धाची स्थिती निर्माण करणे) निर्माण केलेला आहे. यात चीन हा रशियापेक्षा खूप पुढे आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. अन्य वस्तूंचेही भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात आपल्याला अंतर्गत वादविवाद, राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबवून देशाला सर्वच बाबतीत आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, बनावट नोटांचा कारभार, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, नार्को टेरिरिझम आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही, असेही महाजन यांनी शेवटी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *