Menu Close

बांगलादेशातील वैद्यकीय महाविद्यालयात सर्व धर्माच्या विद्यार्थिनींसाठी हिजाब अनिवार्य !

हा फतवा म्हणजे बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचा हिंदु संघटनांचा दावा

  • भारत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून बांगलादेला हा निर्णय रहित करण्यास भाग पाडले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • कर्नाटकमधील हिजाबविरोधी आंदोलनांवरून भारतात अल्पसंख्यांचे धार्मिक अधिकार चिरडले जात असल्याची ओरड करणारे इस्लामी देश बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या चिरडल्या जाणार्‍या धार्मिक अधिकारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

‘अद्-दीन सकीना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल’ने सर्व धर्माच्या विद्यार्थिंनींना हिजाब घालणे बंधनकारक केले

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील जेस्सोर येथील ‘अद्-दीन सकीना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल’ने आता तेथे शिकणार्‍या सर्व धर्माच्या विद्यार्थिंनींना हिजाब घालणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता मुसलमानेतर विद्यार्थिनींनाही हिजाब घालावा लागणार आहे. हिजाब न घातल्यास त्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. ‘अकीज ग्रुप्स लिमिटेड’ संचालित सर्व महाविद्यालयांमध्येही हिजाब अनिवार्य करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ४ ऑक्टोबर २०१० मध्ये बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये ‘कोणत्याही व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध धार्मिक पोषाख परिधान करण्यासाठी बाध्य केले जाऊ शकत नाही’, असे म्हटले आहे.

हिंदु संघटनांचा विरोध

हिंदु संघटनांनी मात्र यास विरोध केला आहे. या प्रकरणी पंतप्रधान शेख हसीना यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी हिंदु संघटनांनी केली आहे. बांगलादेशातील हिंदु संघटना ‘बांगलादेश जातीय हिंदु महाजोट’ने म्हटले आहे की, देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये मुसलमानेतरांना इस्लामी कपडे घालण्यासाठी बाध्य करू नये. बांगलादेशातील अल्पसंख्यांक विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी यांना छळण्यामागे ‘अद्-दीन सकीना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल’चे शेख अफिलुद्दीन यांचा हात आहे.

‘बांग्लादेश हिंदु नॅशनल ग्रँड अलायन्स’चे प्रवक्ते पलाश कांती डे यांनी सांगितले की, हा निर्णय बांगलादेश न्यायपालिकेच्या विरोधात आहे. शैक्षणिक संस्था विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना इस्लामी पोषाख घालण्यास बाध्य करू शकत नाहीत. आता महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना त्यांच्याकडून इस्लामी पोषाख घालण्याविषयी लिखित अनुमती घेत आहे. अनुमती न देणार्‍यांना प्रवेश नाकारला जात आहे. या महाविद्यालयाच्या संस्थापकांचे वडील शेख मोहिउद्दीन वर्ष १९७१ च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्याही विरोधात होते. ते तेव्हा ‘जमात-ए-इस्लामी’ची विद्यार्थी संघटना ‘छात्र शिबिर’चे सदस्य होते. त्यांच्या कुटुंबियांवर वर्ष १९७१ मध्ये हिंदु शरणार्थींची लूटमार केल्याचाही आरोप होता.

निर्णय जुनाच असल्याचा प्रशासनाचा दावा

महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी सुब्रता बासक यांनी दावा केला आहे की, हा नियम वर्ष २०११ मध्ये हे महाविद्यालय स्थापन झाले, तेव्हापासून लागू आहे.’ त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविषयी विचारणा केल्यावर त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही.

धर्मांधांनी यापूर्वीच दिली आहे हिजाबविषयी धमकी !

बांगलादेशातील धर्मांधांनी यापूर्वीच हिंदूंना धमकी दिली आहे की, जर भारतात मुसलमानांना शिक्षणसंस्थांनमध्ये हिजाब घालण्यास अनुमती देण्यात आली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *