जे धर्माभिमानी हिंदूंच्या लक्षात येते, ते पोलिसांच्या लक्षात का येत नाही ? तक्रार नोंदवल्यावर पोलीस गुन्हा नोंदवतात; मात्र समोर गुन्हा घडत असतांनाही पोलीस काहीच कृती का करत नाहीत ? अशा घटनांच्या विरोधात पोलिसांकडून आधीच प्रतिबंधात्मक कारवाई का केली जात नाही ?
कन्हैया कुमारच्या मुंबई येथील सभेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अपकीर्ती करणार्या पुस्तकाचे वितरण केल्याचे प्रकरण
मुंबई : भांडवलाचा ब्राह्मणी देव बाळ ठाकरे या सुधीर ढवळे नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण कन्हैया कुमार याने त्याच्या कुर्ला (मुंबई) येथील आदर्श हायस्कूलमध्ये २३ एप्रिल २०१६ या दिवशी झालेल्या सभेत करून समाजात तेढ माजवण्याचा प्रयत्न केला. याविषयी सुधीर ढवळे, कन्हैया कुमार आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना शिक्षा करण्याविषयी येथील नेहरूनगर पोलीस ठाण्यात शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळीचे श्री. प्रभाकर भोसले यांनी तक्रार केली आहे.
तक्रार करतांना श्री. भोसले यांनी म्हटले आहे की,
१. हे पुस्तक म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेली गलीच्छ टीका आहे. त्याला कोणताही पुरावा अथवा आधार नाही.
२. या पुस्तकाची एकूणच भाषा, रोख आणि माहिती बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांवर नाहक अन् पुराव्याशिवायची टीका करणारी आहे.
३. या पुस्तकात पान क्रमांक २० वर असे लिहिलेले आहे की, निष्ठावंतांना हिंसेद्वारे आपल्या भावना व्यक्त करण्याचे हक्क बहाल करण्यात आलेले आहेत.
४. पान क्रमांक ३० वर जय भवानी जय शिवाजीच्या नावावर बाळ ठाकर्यांचा सैनिक माणसं कापत सुटला, असे म्हटले आहे, तसेच पान ३१ वर लेखकाने शिवसैनिकांना हातात दगड घेतलेल्या टोळ्यांचे नाव दिले आहे.
५. पुस्तकाच्या ३२, ३३ आणि ३४ व्या पानावरच्या लिखाणातून शिवसेनेला आणि शिवसैनिकांना हिंसेने रोखावे लागेल, असा संदेश लेखकाने दिला आहे; जो थेट शब्दांत आलेला नसला, तरी एकूण लिखाणातून व्यक्त होतो.
६. शब्दांमध्ये थेट हिंसा दाखवायची नाही; परंतु अप्रत्यक्षपणे हिंसेला आणि गटांमध्ये तेढ लावण्याचा प्रयत्न करायचा अन् त्याला चिथावणी द्यायची, या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक आहे.
७. त्यातून शिवसेनेला मानणारे आणि या पुस्तकाने चिथावलेले, असे दोन गट पडू शकतात. त्यातून दंगली होऊ शकतात. समाजात भेदभाव निर्माण करणे, गट करून भांडणे लावणे हा लेखकाचा उद्देश आहे.
८. लेखक सुधीर ढवळे यांच्याविषयीची माहिती इंटरनेटवर शोधली असता, याआधीही ढवळे यांच्यावर अशाच पद्धतीचा गुन्हा दाखल होता; मात्र पुराव्याअभावी त्यांची न्यायालयाने सुटका केल्याचे कळते. याचाच अर्थ, लेखकाची वृत्ती गुन्हेगारी असण्याची शक्यता दाट आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात