रशिया-युक्रेन युद्ध : भारतावर काय होणार परिणाम ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद
रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच भारताच्या बाजूने भूमिका मांडली आहे. संकटकाळात भारताला साहाय्य केले आहे. अगदी काश्मीर सीमावाद, कलम 370 यांविषयीही भारताचे समर्थन केले आहे. भारताला नेहमी शस्त्रास्त्रे दिली आहेत. याउलट युक्रेनने नेहमी भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सध्या युक्रेनवर भीषण हल्ले होत असल्यामुळे ‘युक्रेनची बाजू घ्या’, असा भारतावर दबाव येत असला, तरी थेट तसे करता येत नाही. तसेच युक्रेनमध्ये आपले हजारो विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांना वाचवणे महत्त्वाचे असल्यामुळे भारताला रशिया-युक्रेन युद्धाविषयी काळजीपूर्वक भूमिका घेतली पाहिजे आणि भारताचे हित पाहूनच पुढील पावले उचलली पाहिजेत, असे मत भारतीय सेनेतील निवृत्त मेजर जनरल जगतबीर सिंह यांनी व्यक्त केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘रशिया-युक्रेन युद्ध : भारतावर काय होणार परिणाम?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.
या वेळी भारतीय सेनेतील निवृत्त मेजर जनरल वी.के. सिंह म्हणाले की, रशियावर नाटो (NATO) मधील सहभागी देशांनी लादलेले कडक आर्थिक निर्बंध आणि व्यापाराच्या बाबतीत घातलेल्या बहिष्काराला प्रत्युत्तर म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अणवस्त्र हल्ला करण्याची चेतावणी दिली आहे. जेणेकरून शत्रू राष्ट्रांनी त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी एकत्र येऊ नये. जसे पाकिस्तानही भारताला पाकमध्ये घुसून युद्ध केल्यास अणवस्त्रे वापरण्याची धमकी देत असतो. त्याप्रमाणे रशियाने केले आहे.
या वेळी भारतीय सेनेतील निवृत्त कर्नल राजेंद्र शुक्ला म्हणाले की, सध्या सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे येणारा युद्धसामुग्रीवरील खर्च आणि त्यानंतर पाश्चिमात्त्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध यामुळे रशियाला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. जागतिक स्तरावर रशियाची मोठा हानी होणार आहे. रशियावरील आर्थिक निर्बंधामुळे रशियाकडून भारताला येणारे ‘एस् 400’ हे विमान तथा क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञान, तसेच अन्य युद्धसामुग्री भारताला मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कदाचित युद्धामुळे ती प्राप्त होण्यास थोडा विलंब होईल; मात्र पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची स्थिती जागतिक स्तरावर पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली आहे. ते समतोल राखून भूमिका घेत आहेत. रशिया आणि भारत यांची परंपरागत मैत्री आहे अन् कठीण काळात रशियाने भारताला मदत केली आहे, हेही भारताने लक्षात घ्यायला हवे.